Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पाणीपुरवठा विभागरचनेत फेरफार
डायरीत नोंदी करण्याचा व्हॉल्वमनना आदेश
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

शहर पाणीपुरवठय़ाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त कल्याण केळकर यांनी आज या विभागाच्या रचनेत काही फेरफार केले. जलवाहिनीची गळती, तसेच ५ हजार रुपये खर्चापर्यंतची किरकोळ कामे करण्याचे अधिकार प्रभाग अभियंता स्तरावरच देण्यात आले.
या विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम यांच्यासह आयुक्तांनी आज दुपारी या विभागाची स्वतंत्र बैठक घेतली. उपायुक्त डॉ. पंकज जावळे, शहर अभियंता नंदकुमार मगर, तसेच विभागनिहाय प्रभागांचे सर्व अभियंता बैठकीला उपस्थित होते. निकम यांनी सुरुवातीला या विभागापुढील अडचणी सांगितल्या.
आयुक्तांनी त्या ऐकून घेऊन या विभागाच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता सावेडी, माळीवाडा, रंगभवन व बुरुडगाव या चारही विभागांचे प्रभाग अभियंता अनुक्रमे एम. डी. काकडे, व्ही. जी. सोनटक्के, श्रीकांत प्रभूणे व निंबाळकर यांच्याकडे पाणीपुरवठा विभागातील किरकोळ दुरुस्ती करून घेण्याचे अधिकार असतील. त्यांना अनुक्रमे पारखे, निशांत नामदे, गायकवाड, गाडळकर, लखापती हे कनिष्ठ अभियंते सहाय्य करतील.
जलवाहिनीचे व्हॉल्व उघडून पाणी सोडणाऱ्या व्हॉल्वमन्सना ‘डायरी’ ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पाणी सोडल्यानंतर त्यांनी डायरीत तशी नोंद करून परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. या डायऱ्यांची दैनंदिन तपासणी पाणीपुरवठा विभागातील मुख्य व्हॉल्वमन व मुख्य फीटर करतील. ही दोन्ही पदे रिक्त होती. आयुक्तांनी त्यावर प्रभारी म्हणून तुकाराम जाधव व शेख अपाक यांना नेमणुका दिल्या.या नव्या रचनेमुळे शहराच्या सर्व भागांत पाणी व्यवस्थित मिळेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. डायरीमध्ये नागरिकांनी ‘पाणी कमी आले’, ‘उशिरा आले’, ‘आलेच नाही’, ‘थोडा वेळच आले’ असे शेरे देणे अपेक्षित आहे. हेड व्हॉल्वमन हे शेरे बघून त्याप्रमाणे प्रभाग अभियंत्यांना कळवेल. त्यानुसार प्रभाग अभियंते प्रत्यक्ष पाहणी करून दोष दूर करतील, असे ते म्हणाले.
शहराची पाणीयोजना सन १९७२ची म्हणजे जुनी आहे. नंतर १२ ग्रामपंचायतींचा समावेश महापालिका हद्दीत झाला. हा सर्व परिसर व एकूणच वाढलेली लोकसंख्या यामुळे पाणीयोजनेवर मोठा ताण आला असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यासाठीच मनपाने केंद्र सरकारच्या लघु व मध्यम शहरे विकास योजनेतून शहर पाणीपुरवठा सुधार योजनेचा प्रस्ताव दिला असून, प्राथमिक मंजुरीही घेतली आहे. उर्वरित सोपस्कार पूर्ण होऊन निधी लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.