Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

प्रांतवाद, भाषावाद थांबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - झा
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

धार्मिक उन्मादातून होणाऱ्या हिंसेने पुढे मोठे संकट निर्माण केले. जात, प्रांत, भाषा वादाने त्यात भर पडत आहे. हे थांबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला, तरच देश महासत्ता बनू शकेल, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजीव झा (बिहार) यांनी व्यक्त केला.
युवक काँग्रेसच्या वतीने ३० जानेवारीपासून देशात दहशतवाद, जातियवादाच्या विरोधात युवा जागृती सप्ताह रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बिहारमधील चंपारण्य येथून सुरुवात झालेल्या रॅलीचे विविध राज्यांतून बीडमार्गे आज सायंकाळी नगरमध्ये आगमन झाले. त्यानिमित्ताने बाजार समितीतील आठरे सभागृहात आयोजित युवक मेळाव्यात झा बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष महेश तपासे होते.
महात्मा गांधीजींचे सत्य व अहिंसेचे तत्त्वच देशाचे विघटन थांबवेल. विघटनवादी शक्तींचा मुकाबला करण्याची ताकद केवळ युवकांमध्येच आहे. देशातील सद्य परिस्थिती युवकांनी शांत राहण्याची नाही. त्यांनी पुढाकार घेतला, तरच देश विकासाच्या मार्गावर राहिल. युवा जागृती कार्यक्रम निवडणुकीसाठी नाही, तर देशहितासाठी राबविला जात आहे, असे झा यांनी सांगितले.तपासे म्हणाले की, एकीकडे धार्मिकता, प्रांत, भाषावाद; तर दुसरीकडे सर्वधर्मसमभाव, विकास अशा संक्रमणात युवक आहे. झटपट श्रीमंतीचे मार्ग आणि दगडफेक करणाऱ्यांना मिळणारी प्रसिद्धी यामुळे चांगले रचनात्मक काम दुर्लक्षित राहते. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिकांत राजकारणाबद्दल युवकांनी कोणती भूमिका घ्यावी याचे विचारमंथन घडवणारी ही रॅली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर म्हणाले की, देशात दहशत, हिंसा, तेढ निर्माण करून विकासात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्याची जबाबदारी सर्वावर आहे. हिंदुत्ववादी संघटना, पक्षांनी राममंदिर, बाबरी मशीद वादातून सत्ता मिळविण्याच्या स्वार्थातून दंगली घडवल्या. त्यामुळेच युवकांनी जागृक रहावे.युवकचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कामाची माहिती दिली. नगर तालुकाध्यक्ष श्याम घोलप यांनी स्वागत केले. निरीक्षक राजेंद्र गावडे यांचेही भाषण झाले. या वेळी तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यास उपस्थिती कमी
मेळाव्यास कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती कमी होती, हे पाहून जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी लग्नतिथी मोठी असल्यामुळे उपस्थिती कमी असल्याचा खुलासा भाषणात केला. राजीव झा यांचे भाषण चालू असताना कार्यकर्ते आपापसात गप्पा मारत होते. ते पाहून झा यांनी भाषण थांबवले व तसे जाहीरही केले. मेळावा सायंकाळी ४ वाजता होता. कळमकर वेळेवर आले. तथापि, कार्यक्रमस्थळी एकही कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे ते अर्धा तास एकटेच व्यासपीठावर बसून राहिले.