Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नगरच्या नाटय़गृहासाठी बीडच्या नाटय़ संमेलनात ठराव
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

मागील अनेक वर्षांपासून नाटय़गृहासाठी धडपडणाऱ्या नगरच्या रंगकर्मीनी राज्य सरकार याबाबत दाखवत असलेल्या अनास्थेच्या विरोधात थेट अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या खुल्या अधिवेशनातच दाद मागितली. किमान आता तरी आपला ‘आवाज’ सरकापर्यंत पोहोचेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
बीड येथे नुकत्याच पार पडलेल्या नाटय़ संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात नाटय़ परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष सतीश लोटके यांनी नगर महापालिकेच्या नियोजित नाटय़गृहाचा ठराव मांडला. याबाबतचे सर्व आराखडे प्रस्तावासह सरकारकडे पाठवले असून, आता त्यावर निर्णय अपेक्षित आहे. मात्र, तेच होत नसल्याची खंत लोटके यांनी मांडली.
कलावंतांना नाटय़ परिषदेच्या शिफारशीनंतर एसटी प्रवासभाडय़ात ५० टक्के सवलत द्यावी, सरकारच्या रंगभूमी परिक्षण मंडळावर प्रत्येक जिल्ह्य़ाला प्रतिनिधीत्व मिळावे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना ते करीत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परिषदेचा प्रतिनिधी घेणे सक्तीचे करावे, असे ठराव नगरच्या शाखेतर्फे लोटके यांनी मांडले. त्याला शिवाजी शिंदे, राहुल भिंगारदिवे, शशिकांत नजन यांनी अनुमोदन दिले.
संमेलनात नगर शाखेच्या वतीने ‘माझ्या प्रिय मित्रास’ ही एकांकिका सादर करण्यात आली. त्यात स्वप्नील मुनोत, पुष्कर तांबोळी, राम देशमुख, रवी दळवी यांनी भूमिका केल्या.
नगरच्या सतीश भोपे व डॉ. सुधा कांकरिया यांचा परिसंवादात सहभाग होता. ‘हास्यसम्राट’ स्पर्धेतील उपविजेते नगरचेच कथाकथनकार संजय कळमकर यांचा एकपात्री प्रयोगही नाटय़ संमेलनात झाला, असे लोटके यांनी सांगितले. नगर जि. प.ने घेतलेल्या शालेय नाटय़ स्पर्धेतील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे विजेते बालनाटय़ ‘मी एक बोन्साय’ही संमेलनात सादर झाले.