Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वस्तुसंग्रहालयास उत्पन्नाचा स्रोत मिळवून देऊ - थोरात
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय सुरेश जोशी यांच्या तपश्चर्येचे फळ आहे. संग्रहालयासाठी कायमवरूपी उत्पन्नाचा स्त्रोत मिळवून देण्यास, तसेच संस्थेच्या संवर्धनासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे कृषिमंत्री थोरात यांनी येथे सांगितले.राज्य सरकारने दिलेला ४० हजार रुपयांचा धनादेश जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी श्री. थोरात यांनी आज संग्रहालयाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. मुंबईतील महिलेने दिलेला २५ हजारांच्या देणगीचा धनादेशही थोरात यांच्या हस्ते जोशी यांनी स्वीकारला.
संग्रहालयाचे विश्वस्त-अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन, आमदार शिवाजी कर्डिले, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, माजी महापौर संदीप कोतकर, माजी खासदार दादापाटील शेळके, ज्ञानदेव वाफारे, भास्करराव डिक्कर या वेळी उपस्थित होते.
वस्तुसंग्रहालयाची जडणघडण हाच एक इतिहास आहे. मात्र, एवढय़ा मोठय़ा संस्थेचे ‘मार्केटिंग’, ‘प्रेझेंटेशन’ करण्यात आपण कमी पडतो आहोत. नगरकरांनी एकत्र येऊन या संस्थेसाठीच्या योगदानाबद्दल ८०वर्षीय जोशी यांची कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा करावा, अशी सूचना श्री. थोरात यांनी केली.
डॉ. अन्बलगन म्हणाले की, सन २०१०पर्यंत संग्रहालय अद्ययावत ‘म्युझियम’ म्हणून उभे करू. शिर्डी संस्थानने जाहीर केलेला ५० लाखांचा निधी मिळताच संग्रहालय अद्ययावत करण्याचे काम सुरू करू. याबाबतचा आराखडा तयार आहे. वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ. जिल्ह्य़ाच्या पर्यटन योजनेत संग्रहालयाचा समावेश करून केंद्र-राज्य सरकारांचा निधी मिळविण्याचाही प्रयत्न आहे. या वेळी जोशी यांचेही भाषण झाले. मिलिंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.