Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

चांदबिबी महाल वृक्षतोडप्रकरणी हजारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

शहराजवळील ऐतिहासिक चांदबिबी महालावरील अनाधिकृतवृक्षतोड प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे मान्य केले. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतहून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असेही मत हजारे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
काही दिवसांपूर्वी चांदबिबीच्या महालावर वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत झालेल्या शासकीय कार्यक्रमात वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर अनाधिकृतपणे वृक्षतोड केल्याचा आरोप श्री. हराळ व इतरांनी केला होता. त्यानंतर त्यांनी व माजी सभापती सूर्यभान पोटे, श्री. भगवानराव बेरड यांच्यासह काल हजारे यांची भेट घेतली.
सन १९६०पासून वनखात्याची हजारो हेक्टर जमीन गायब झाली असून, यासंदर्भात केंद्र सरकारने चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे.
समिती लवकरच नगर जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहे. त्यावेळी महालावरील बेकायदा वृक्षतोडीचे पुरावे समितीस सादर करावे, तसेच पर्यावरणवादी नागरिकांनीही त्यांच्याकडे यासंदर्भात पुरावे असल्यास ते समिती व हजारे यांच्याकडे सादर करावीत, असेही आवाहन हराळ यांनी केले. वनमंत्री पदाची सूत्रे पाचपुते यांनी स्वीकारल्यानंतर वनखात्याच्या जमिनी गायब होण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोपही हराळ यांनी पत्रकात केला.