Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘सापाचा मुख्य शत्रू माणूसच’
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

सापाचा मुख्य शत्रू माणूसच आहे. तस्करांकडून दर वर्षी लाखो सापांची कातडी जप्त करण्यात येते. काही देशांत साप खाण्यासाठी वापरतात. जपानमध्ये सापाच्या चरबीपासून दारू तयार केली जाते. अशा परिस्थितीत सापांना वाचविण्यासाठी सर्वानी पुढे आले पाहिजे, असे आवाहन नाशिक येथून आलेल्या सर्प व पर्यावरण जनजागृती यात्रेत करण्यात येत आहे. या यात्रेचे स्वागत आज पेमराज सारडा महाविद्यालयात प्राचार्य केवल जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
नाग, मन्यार, फुरसे, घोणस, कवडय़ा, गवत्या, तस्कर, धामण, रूखई, शेलाटी, मांजऱ्या, डुरक्या असे सुमारे २० प्रकारचे साप यात्रेत ठेवण्यात आले आहेत. त्यांची माहिती देणारी भित्तीपत्रकेही आहेत. या यात्रेच्या पथकाचे प्रमुख सर्पतज्ज्ञ राजेश ठोंबरे आहेत. पर्यावरण व सर्पाना वाचविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सापांविषयी खूप अंधश्रद्धा आणि गैरसमजुती आहेत. त्या भीती व भक्तीतूनच आलेल्या दिसतात, असे सांगून ठोंबरे म्हणाले की, जगात २ हजार ७०० प्रकारचे साप आढळतात. भारतात २७८ जाती आहेत. यात काही विषारी, सौम्य विषारी, तर बहुसंख्य बिनविषारी आहेत. योग्य काळजी घेतली, तर विषारी सर्पापासून आपण स्वतला सहज वाचवू शकतो.
या प्रसंगी उपवन संरक्षक दिलीप गुजेला, सहायक वनसंरक्षक नंदकिशोर रामदिन, बी. एस. खंदारे, उपप्राचार्य लाहोटी, प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर दसरे, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा आदी उपस्थित होते. सर्प यात्रा औरंगाबाद महापालिका, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व वन विभागातर्फे आयोजित करण्यात आली आहे. उद्या (बुधवारी) ती श्रीगोंदे व तेथून साताऱ्याला जाणार आहे. ठोंबरे यांची आज विविध महाविद्यालये, विद्यालयात सर्प व पर्यावरणावर व्याख्याने झाली.