Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

वाडिया पार्कमधील लॉनच्या कामास तिसऱ्यांदा मुदतवाढ
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलातील क्रिकेटच्या मैदानावर हिरवळ (लॉन) लावण्याच्या सुमारे ३० लाख खर्चाच्या कामास तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा, तसेच संकुलातील सुविधांच्या वापरासाठी ‘क्लब हाऊस’ निर्माण करण्याचा निर्णय समितीच्या सभेत घेण्यात आला. संकुल समितीची सभा काल सायंकाळी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

४४ बेशिस्त मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाने अखेर आज शिस्तीचा चाबूक उचलला. बेशिस्त वागणाऱ्या तब्बल ४४जणांवर उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कारवाई केली. काहींची १ दिवसाची रजा मांडण्यात आली, तर काहींना १०० रुपये दंड करण्यात आला. कामचुकारपणा करणाऱ्या कोणाचीही यापुढे गय केली जाणार नाही, असे डॉ. जावळे यांनी सांगितले.

राष्ट्रीय कार्याध्यक्ष, प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी युवकमधील गटबाजीचे प्रदर्शन
पक्ष निरीक्षकांच्या अहवालानंतर जिल्हाध्यक्षपदाबाबत निर्णय - तपासे
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा संघटनेतील गटबाजीचे पडसाद आजच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात तीव्रतेने उमटले. कोण, कोठे आहे याचा वस्तूनिष्ठ अहवाल पक्ष निरीक्षक राजेंद्र गावडे यांनी पाठवल्यावर जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय घेण्याचे प्रदेशाध्यक्ष महेश तपासे यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.

अंदाजपत्रकाबाबत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महापालिकेचे सन २००९-१०चे अंदाजपत्रक मांडायचे कोणासमोर हा प्रशासनासमोरचा प्रश्न अजून कायम आहे. सरकारने याबाबत काहीही कळवले नसले, तरी कोल्हापूर महापालिकेतही काहीशी अशीच स्थिती असल्याने लवकरच सरकार या बाबतीत निर्णय घेईल, असे प्रशासनाला वाटते.मनपा निवडणूक होऊन तीन महिने झाले, तरी राजकीय साठमारीमुळे स्थायी समिती अजून अस्तित्त्वात आलेली नाही.

चार वर्षांनंतरही वीज ग्राहक अनभिज्ञच!
संतराम सूळ
जामखेड, १७ फेब्रुवारी

सरकारी आदेशाबाबत लोकांमधील अनभिज्ञतेचा सरकारी कार्यालय गैरफायदा घेऊन कशा प्रकारे लोकांची फसवणूक करू शकते, याचा अनुभव शेतकरी व सामान्य जनता वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत घेत असल्याचे पाहावयास मिळते. राज्य सरकारने २० जानेवारी २००५ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार ‘महावितरण’ ग्राहकांना देत असलेल्या सेवा किती अवधीत द्याव्यात, अवधीत दिल्या न गेल्यास ‘महावितरण’ने जनतेला त्याबद्दल किती नुकसानभरपाई द्यावी, याची मानके ठरवून दिली आहेत.

पाणीपुरवठा विभागरचनेत फेरफार
डायरीत नोंदी करण्याचा व्हॉल्वमनना आदेश
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी
शहर पाणीपुरवठय़ाबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त कल्याण केळकर यांनी आज या विभागाच्या रचनेत काही फेरफार केले. जलवाहिनीची गळती, तसेच ५ हजार रुपये खर्चापर्यंतची किरकोळ कामे करण्याचे अधिकार प्रभाग अभियंता स्तरावरच देण्यात आले. या विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम यांच्यासह आयुक्तांनी आज दुपारी या विभागाची स्वतंत्र बैठक घेतली. उपायुक्त डॉ. पंकज जावळे, शहर अभियंता नंदकुमार मगर, तसेच विभागनिहाय प्रभागांचे सर्व अभियंता बैठकीला उपस्थित होते. निकम यांनी सुरुवातीला या विभागापुढील अडचणी सांगितल्या.

‘सापाचा मुख्य शत्रू माणूसच’
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सापाचा मुख्य शत्रू माणूसच आहे. तस्करांकडून दर वर्षी लाखो सापांची कातडी जप्त करण्यात येते. काही देशांत साप खाण्यासाठी वापरतात. जपानमध्ये सापाच्या चरबीपासून दारू तयार केली जाते. अशा परिस्थितीत सापांना वाचविण्यासाठी सर्वानी पुढे आले पाहिजे, असे आवाहन नाशिक येथून आलेल्या सर्प व पर्यावरण जनजागृती यात्रेत करण्यात येत आहे. या यात्रेचे स्वागत आज पेमराज सारडा महाविद्यालयात प्राचार्य केवल जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

उपनिबंधकांच्या निर्णयामुळे बज यांची उमेदवारी निश्चित
कोपरगाव पीपल्स बँक
कोपरगाव, १७ फेब्रुवारी/वार्ताहर
कोपरगाव पीपल्स बँक निवडणुकीतील सभासद सुधीरकुमार बज यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधक डी. डी. शिंदे यांनी वैध ठरविला. निवडणूक निर्णय अधिकारी ए. बी. कडू यांनी याआधी बज यांचा अर्ज रद्द ठरविला होता. बज यांनी या निर्णयास आव्हान दिले होते.

स्वेच्छा तडजोड योजनेबाबत जिल्हा कारागृहामध्ये चर्चासत्र
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

न्यायालयाने ७ वर्षांपेक्षा कमी अथवा ७ वर्षांपर्यंत शिक्षा दिली असेल, अशा कैद्यांनी गुन्ह्य़ाच्या शिक्षेसंबंधी असलेल्या स्वेच्छा तडजोड योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव व वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश पंकज शहा यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ व सबजेल यांच्या वतीने जिल्हा कारागृहात (सबजेल) गुन्ह्य़ाच्या शिक्षेसंबंधी स्वेच्छा तडजोड योजनेसंदर्भात आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन करताना श्री. शहा बोलत होते. मुख्य न्यायदंडाधिकारी जी. बी. जोगी, सरकारी वकील सुरेश लगड, जी. के. मुसळे, तुरुंग अधीक्षक बी. डी. पिचड, तुरुंग अधिकारी डी. डी. काळे आदी उपस्थित होते.
न्या. जी. बी. जोगी यांनी सांगितले की, कैद्यांनी मनात कुठलीही अपराधी भावना न ठेवता कायद्यातील स्वेच्छा तडजोडीचा लाभ घ्यावा. त्यासाठी विहित नमुन्यात न्यायालयात अर्ज करता येतो. त्यावर सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून निर्णय दिला जातो.तुरुंग अधीक्षक पिचड यांनी सबजेलमधील कैद्यांची माहिती दिली. या वेळी उपस्थित १५७ कैद्यांपैकी अनेकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. न्यायालयीन अधीक्षक श्रीमती आर. जे. दाणी, एस. वाय. कुलकर्णी, कांबळे उपस्थित होते. सबजेलचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सोनार यांनी सूत्रसंचालन केले.

पत्रावळीच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

शहरातील तापकीर गल्लीतील देवीचंद छाजेड यांच्या पत्रावळी विक्रीच्या दुकानास काल रात्री आग लागून लाखोंचे नुकसान झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सोमवारी रात्री छाजेड नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. रात्री बाराच्या सुमारास दुकानास आग लागली. दुकानाशेजारील रखवालदाराने आग लागल्याचे छाजेड यांना कळवले. महापालिकेच्या अग्निशमन विभागास आगीची माहिती देण्यात आली.आगीत पत्रावळींचे गठ्ठे जळून खाक झाले. सध्या लग्नसराई सुरू झाल्याने छाजेड यांनी मोठय़ा प्रमाणावर माल भरून ठेवला होता. आगीमुळे नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकला नाही. मात्र, लाखो रुपयांचा माल होता असे समजते. महापौर संग्राम जगताप यांनी घटनास्थळी जाऊन आग शमविण्यास मदत केली. सुमित वर्मा, राहुल राठी, अमित लढ्ढा, पोलीस जमाल शेख, अज्जू शेख यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन विभागाचे शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी कार्ले यांच्यासह १३ जवानांनी आग शमवली. मनपा व लष्कराच्या प्रत्येकी तीन बंबांनी आग आटोक्यात आणली.

५ लाख ३५ हजारांचा ऐवज मोटारीच्या डिकीतून लंपास
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या प्रवाशाच्या मारुती मोटारीमधील ५ लाख ३५ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. ही चोरी नगर-पुणे रस्त्यावर न्हावरा फाटय़ानजीक रविवारी रात्री नऊच्या सुमारास झाली. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद करून झिरो क्रमांकाने तो शिरूर (पुणे) पोलिसांकडे पाठवला आहे. विजय मंगप्पा हेगडे (रा. नमश्री बंगला, रेणावीकर मंगल कार्यालयामागे, पाईपलाईन रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी ते मारुती मोटारीतून (एमएच १२ सीए ५६८६) मुंबईहून नगरकडे येत होते. रात्री ते न्हावरा फाटय़ानजीक हॉटेल कानिफनाथ येथे जेवणासाठी थांबले. कोणी तरी भामटय़ाने त्यांच्या गाडीच्या डिकीत ठेवलेल्या दोन बॅगा लांबवल्या. या बॅगेत ४ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असा ५ लाख ३५ हजारांचा ऐवज होता. नगरला आल्यावर हेगडे यांना चोरी झाल्याचे समजले.

राजळे यांच्या उमेदवारीची ८ तालुकाध्यक्षांकडून मागणी
पाथडी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

दोन्ही काँग्रेसच्या जागावाटपात नगरची जागा काँग्रेसला देऊन लोकसभेसाठी आमदार राजीव राजळे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जिल्ह्य़ातील नऊ तालुकाध्यक्षांसह शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे नवी दिल्लीत केल्याची माहिती पाथर्डीचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख यांनी दिली.
बाळासाहेब मुरकुटे (नेवासे) पंढरीनाथ पवार (राहुरी), रामभाऊ धांडे (कर्जत), संपत नेमाणे (शेवगाव), संपत म्हस्के (नगर), डी. डी. घोरपडे (श्रीगोंदे), केशव मुर्तडक (संगमनेर) यांचा शिष्टमंडळात समावेश होता. ठाकरे यांच्याशी शिष्टमंडळाने लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. नगर मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेसला अनुकूल असून या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येत आहे. मागील निवडणुकीच्या वेळी जागावाटपात हा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’कडे आला. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख निवडून आले. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरविली. तरुणांना प्राधान्य देण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. त्यामुळे आमदार राजळे यांना उमेदवारी देण्यात यावी. राजळे यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असल्याचे शिष्टमंडळाने ठाकरे यांच्या निदर्शनास आणले.

फ्रूट ग्रोअर्स संस्थेवर येवले, धोंडे बिनविरोध
राहुरी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुका फ्रूट ग्रोअर्स सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय येवले, तर उपाध्यक्षपदी कृष्णा धोंडे यांची बिनविरोध निवड झाली. माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक झाली. येवले यांच्या नावाची सूचना कोंडीराम गुलदगड यांनी, तर धोंडे यांच्या नावाची राजाराम तमनर यांनी मांडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोसले यांनी काम पाहिले. श्री. तनपुरे म्हणाले की, कर्जमाफीचा लाभ फ्रूट ग्रोअर्स संस्थेला मिळाला. यापुढील काळात कर्जमाफीची अपेक्षा न धरता कर्जाची वेळेवर परतफेड करावी. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही संस्था लाभांश देऊ शकेल. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वानी सहकार्य करावे. अध्यक्ष येवले म्हणाले की, तनपुरे यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये आपणावर जबाबदारी टाकली. त्यानंतर कर्जवसुली करून सलग पाच वर्षे लाभांश दिला. यापुढील काळात जास्तीत जास्त कर्जवसुली करून लाभांश दिला जाईल. बैठकीस डॉ. उषाताई तनपुरे, ताराचंद तनपुरे, बाळासाहेब उंडे, बाबासाहेब चौधरी, सोपान तनपुरे, चित्रा तनपुरे, बाबा शेख, मोहन लहारे, रावसाहेब तनपुरे, बाबासाहेब तनपुरे उपस्थित होते.

वेतनश्रेणीतील त्रुटीबाबत मंत्र्यांशी चर्चा
श्रीरामपूर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

जिल्हा परिषद लिपीकवर्गीय संघटनेने चौथ्या व पाचव्या वेतन आयोगातील कमी दर्जाच्या वेतनश्रेणीबाबत ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्याशी नुकतीच चर्चा करून वेतन त्रुटी सकृतदर्शनी मान्य असल्याचे सांगितले. चर्चेच्या वेळी संघटनेने या त्रुटी वेळोवेळी मंत्री स्तरावर निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सन १९९६ व २००१मध्ये दाखल केलेल्या याचिकेची मंत्र्यांना माहिती देण्यात आली. सरकारने नियुक्त केलेल्या हकीम समितीसमोर दिलेले निवेदन व साक्ष याबाबतची माहिती ग्रामविकास व अर्थ विभागाच्या सचिवांशी चर्चेदरम्यान देण्यात आली. सहाव्या वेतन आयोगाचा निर्णय झाल्यानंतर वेतनातील त्रुटीबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री म्हेत्रे यांनी दिल्याचे संघटनेने म्हटले आहे.

राज्यमंत्री बच्छाव उद्या श्रीरामपुरात
श्रीरामपूर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

आरोग्य राज्यमंत्री शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील शिरसगाव हद्दीत २ कोटी रुपये खर्चून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात येणार आहे. रुग्णालयाचे भूमिपूजन बच्छाव यांच्या हस्ते होणार आहे. आमदार जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, नगराध्यक्ष संजय फंड, सभापती आबासाहेब थोरात, सचिन गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, शहराध्यक्ष रमजानी शेख, बाजार समितीचे सभापती नानासाहेब पवार उपस्थित राहणार आहेत.

शिवजयंतीचा उद्या कार्यक्रम
निघोज, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

हिंदवी शिक्षण संस्था संचालित मळगंगा विद्यालयाच्या वतीने गुरुवारी (दि. १९) शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव शिवाजीराव वराळ, तसेच मुख्याध्यापिका रेखा हराळ यांनी दिली. सकाळी ८ वाजता शिवप्रतिमेची मिरवणूक निघेल. त्यानंतर सकाळी १० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजीव राजळे यांच्या हस्ते रूपी बँकेचे संचालक विश्वनाथ कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा, तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे. जि. प. समाजकल्याण समितीचे सभापती पांडुरंग खेडकर, जिल्हा बँकेचे संचालक उदय शेळके, हिंदवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर कवाद, सरपंच गीताराम कवाद, निघोज ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कवाद आदी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा बँकेच्या बारागाव नांदूर शाखेचे आज स्थलांतर
राहुरी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

जिल्हा सहकारी बँकेच्या बारागाव नांदूर शाखेचे उद्या (दि. १९) सकाळी नवीन इमारतीत स्थलांतर होत आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ संचालक प्रसाद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असल्याची माहिती तालुका विकास अधिकारी डी. के. दिघे यांनी दिली.कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजीव राजळे, संचालक रामदास धुमाळ, श्रीरामपूर दूध संघाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब गाढे, सेवा संस्थेचे अध्यक्ष सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक खंडेराव पावसे व शाखाधिकारी जिजाबा गडाख यांनी केले आहे.

ई-नोंदणीसंदर्भात शुक्रवारी चर्चासत्र
राहुरी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुका व्यापारी असोसिएशनने ई-नोंदणी व ई-विवरणपत्रासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येथील हिंदुस्थान अ‍ॅग्रो सभागृहात (नवी पेठ) व्यापारी वर्गासाठी विक्रीकर कार्यालय, नगर व राहुरी तालुका व्यापारी असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता विक्रीकर विभागाची विविध विवरणपत्रे व इतर सेवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ऑनलाईन पुरविण्यास सुरुवात होणार आहे. व्यापाऱ्यांनी ई-नोंदणी व ई-विवरणपत्र चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी केले आहे.

पोलीस उपनिरीक्षकपदी विशाल खैरे यांची निवड
राहुरी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत विशाल चंद्रकांत खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली.श्री. खैरे हे तांदूळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. कृषी विद्यापीठातील कृषी एकता मंचाचे प्रत्येक टप्प्यावर त्यांना मार्गदर्शन मिळाले.
माजी आमदार प्रसाद तनपुरे, आमदार चंद्रशेखर कदम आदींचे त्यांचे अभिनंदन केले.

महाशिवरात्री महोत्सव
पारनेर, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील त्र्यंबकेश्वर महादेव देवस्थान येथे दि. २३ला महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सकाळी सातला अभिषेक, पूजा व महाआरती, साडेनऊ वाजता शितलताईमहाराज साबळे यांचे कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होतील.

विविध परीक्षांमध्ये गणेश विद्यालयाचे यश
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

तबलावादनासाठी अखिल भारतीय गांधर्व मंडळाने डिसेंबर २००८मध्ये घेतलेल्या प्रारंभिक ते विशारद या परीक्षांत गणेश संगीत विद्यालयाचे विशाल येंडे, आदित्य वडवणीकर, कमलेश लवांडे, गौरव पवार, महेश वाघमारे हे विद्यार्थी केंद्रात पहिले आहे.विद्यालयाचे संचालक राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली. परीक्षेचा सविस्तर निकाल याप्रमाणे - प्रारंभिक प्रथम श्रेणी - हरिता गांधी, नीरज देवचके, ज्येष्ठता देवी, अद्वैत गिरगे, वरद पानसरे, प्रतीक ठाणगे, अजिंक्य दराडे, सार्थक डावरे, जयंत धर्माधिकारी, प्रसाद गाडे.प्रवेशिका प्रथम - वेदांत भागवत, चैतन्य पुंड, अविनाश चिंतामणी, सुयश जोशी. प्रवेशिका पूर्ण - नीरज इनामदार, सिद्धार्थ महतले. मध्यमा प्रथम - रोहन उमाप, गौरव कुटे, हर्षल कुलकर्णी, श्रीकांत विटणकर, सतीश कोल्हे.

‘श्रीराम व श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचे दोन डोळे’
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

श्रीराम व श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचे दोन डोळे आहेत. भारतीयांच्या जीवनावर त्यांची छाप आहे, असे प्रतिपादन समर्थ व्यासपीठचे अध्यक्ष सुनील चिंचोलकर यांनी केले. महाजन गल्लीतील गायत्री मंदिराच्या प्रांगणात श्रीपाद ग्रंथ भांडार व उदय एजन्सीजच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा प्रारंभ चिंचोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. सनातन धर्मसभेचे अध्यक्ष दत्तोपंत पाठक, डॉ. सी. बी. कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.सोहळ्याची सुरुवात भागवताचार्य अशोक कुलकर्णी यांच्या रसाळ वाणीतील कथा निरूपणाने झाली. ते म्हणाले की, सतचित्र आनंदाचे मूर्त स्वरूप म्हणजे भगवान आहे. भक्ती, उपासना व ज्ञानाकडे प्रवृत्त होणे हे जीवनाचे सार आहे. अध्यात्म विद्या ही अनुभूतीची विद्या आहे.तत्पूर्वी वेदाचे घनपाठी सागर कुलकर्णी व देवेंद्र मढीकर यांच्या वेदमंत्राने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन श्रीपाद तरडे यांनी केले. समर्थ विद्यापीठाचे कुलगुरू सु. न. दाभोळकर, कॅप्टन श्रीकांत धर्माधिकारी आदींसह भाविक या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवजयंती मिरवणुकांसाठी जिल्ह्य़ात बंदोबस्त तैनात
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

येत्या दि. १९ला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त जिल्ह्य़ात ५६ मिरवणुका निघणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी नियोजन केले असून, सुमारे १ हजार ७०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांच्या आदेशानुसार जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय देशमुख यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जिल्ह्य़ातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत ५६ शिवजयंती मिरवणुका काढल्या जाणार आहेत. बंदोबस्तासाठी ७ उपअधीक्षक, १ हजार २०० पोलीस, ५०० होमगार्ड, २० उपनिरीक्षक, ४० सहायक निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.पोलीस ठाण्यानिहाय मिरवणुकांची संख्या अशी - कोतवाली २, नगर २, पारनेर ४, श्रीगोंदे २, कर्जत २, शेवगाव ५, पाथर्डी ३, नेवासे १, सोनई २, श्रीरामपूर शहर १, तालुका २, राहुरी ५, लोणी ६, राहाता ६, शिर्डी १, संगमनेर शहर २, तालुका ४, अकोले ५, राजूर १.

वकिलांचे आज काम बंद आंदोलन
नगर, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या फौजदारी प्रक्रिया संहितेतील दुरुस्तीला वकिलांनी विरोध दर्शविला आहे. उद्या (बुधवारी) होणाऱ्या वकिलांच्या देशव्यापी आंदोलनास येथील वकिलांनीही पाठिंबा दिला आहे. काम बंद ठेवून वकील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील, अशी माहिती शहर वकील संघाचे उपाध्यक्ष मंगेश दिवाणे यांनी दिली.केंद्र सरकारने फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४१ व ३०मध्ये काही दुरुस्त्या केल्या आहेत. त्यानुसार ७ वर्षांंपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या गुन्ह्य़ात आरोपीस आता थेट अटक करता येणार नाही. त्याला अगोदर नोटीस द्यावी लागेल. त्यामुळे भ्रष्टाचार वाढेल, असे वकिलांना वाटते.