Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

नवनीत

जी व न द र्श न
केनोपनिषद

 

सामवेदाच्या तलवकार शाखेचे हे उपनिषद आहे. हे चार खंडांत आहे. पहिले दोन खंड पद्यात्मक आहेत. यात शुद्ध आत्मरूपाचे उत्तम निरूपण आहे. दुसरे दोन खंड गद्यात्मक आहेत. यामध्ये ईश्वराचे स्वरूप, त्याची उपासना आणि शमदमादी साधने विवेचिली आहेत. या उपनिषदात आत्मज्ञान हे जीवनाचे ध्येय असावे असे निक्षून सांगितले आहे. यासाठी ऋषींनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातले काही प्रश्न आजही तसेच आहेत. उदा., कुणाच्या इच्छेने प्रेरित झालेले मन बाहय़ वस्तूंकडे धावते? कुणाच्या प्रेरणेने प्राण आपला व्यापार करतो? वाणी कोणत्या प्रेरणेने बोलते? डोळे आणि कान यांच्या साक्षीने माणूस खरी कर्मे करतो? यासाठी अंतर्यामी वसलेल्या आत्म्याचा शोध घेतला पाहिजे. प्रत्यक्ष आणि अनुमान यांनी आत्मा जाणता येत नाही. आत्मतत्त्व अनंत आहे. मानवी बुद्धी आधीच मर्यादित आहे. त्यात विकारांच्या नादी लागून माणूस आपली बुद्धी संकुचित नि अहंकारी करतो. त्यामुळे त्याला खरा आत्मा आणि परमात्मा उमजत नाही. यासाठी ज्ञानाची कास सोडता कामा नये. ज्ञानाचा अति विक्रय झाला की मानसिक मंदी येते. माणूस शिथिल बनतो. हे घालवायलाच हवे. म्हणून आत्मसाक्षात्कारींना समाजात मान हवा. त्यांच्यातली प्रतिभा वेगळे तेज घेऊन येते. बुद्धी जागृत राहाते. सारासार विवेक जागतो. यातून ईश्वराविषयी प्रेम वाढते. विश्वाला प्रेमदानातून नवे जीवन लाभते. आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ मूल्य होते. तप, दम, कर्म हे सहायक बनतात. वेद हे शरीर होते. सत्य हे वसतिस्थान होते. चित्तशुद्धी सातत्याने होते. याचा भावार्थ एकच, तो, आपण स्वत:ला घासूनपुसून जाणावे. जगण्याबाबत सावधान असावे. कोणताही निर्णय कुजवला की समाज भोगंळ बनतो. कळपांच्या दलदली चिवडतो नि वळवळींना चळवळी मानतो. यातून प्रगती शून्य होते. हे सारे घालविण्यासाठी खऱ्याखोटय़ाचा उचित निवाडा करायची शक्ती ज्या आत्मज्ञानात आहे, ते जाणावे असे केनोपनिषदात सुंदरपणे समजावून सांगितले आहे. धन्य आहे त्या ऋषींची! यावरच आपले संतवाङ्मय उभे आहे.
यशवंत पाठक

कु तू ह ल
धूमकेतूंची रचना
धूमकेतूंची रचना कशी असते?
धूमकेतूचे मुख्य दोन भाग असतात. गाभा किंवा केंद्र आणि पुच्छ किंवा शेपूट. धूमकेतूचा गाभा १०० मीटरपासून ४० ते ५० कि.मी. इतक्या व्यासाचा असू शकतो. ओबडधोबड आकाराचा हा गाभा मुख्यत्वे करून धूलिकण, खडक, बर्फ आणि गोठलेल्या स्वरूपातील कार्बन मोनॉक्साइड, मिथेन, अमोनिया इत्यादी वायू यांचा बनलेला असतो. याशिवाय मिथेनॉल, हायड्रोजन सायनाइड, इथेनॉल, इथेनसारख्या सेंद्रिय पदार्थाचे अस्तित्वही धूमकेतूंच्या गाभ्यात सापडले आहे. एका सिद्धान्तानुसार पृथ्वीवर आढळणारे मुबलक पाणी आणि सेंद्रिय पदार्थ हे पृथ्वीच्या जन्माच्या वेळी झालेल्या असंख्य धूमकेतूंच्या टकरींतूनच पृथ्वीवर आले असावेत. धूमकेतू जोपर्यंत मंगळाच्या कक्षेच्या बाहेर असतात तोपर्यंत त्यांना शेपूट नसते. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणेही कठीण असते. मंगळाच्या कक्षेच्या आत आणि सूर्याजवळ येताच सूर्याच्या उष्णतेने गाभ्यातील बर्फ, गोठलेले वायू आणि इतर संप्लवनशील पदार्थाचे बाष्पीभवन होते. वायू अवस्थेतील हे पदार्थ गाभ्याच्या आतून जोरात बाहेर पडतात आणि स्वत:बरोबर धूलिकणांनाही अवकाशात नेतात. यामुळे गाभ्याभोवती धूळ आणि वायूचे वातावरण निर्माण होते. याला शीर्ष किंवा ‘कोमा’ म्हणतात. सूर्याच्या प्रारणांमुळे ‘कोमा’मधले वायू आणि धूलिकण विरुद्ध दिशेला फेकले जातात आणि धूमकेतूचे शेपूट तयार होते. यातील धूलिकण सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि धूमकेतू तेजस्वी दिसू लागतो. आकाराने काही किलोमीटर असलेल्या धूमकेतूचा गाभा सूर्यापेक्षा मोठा आणि शेपूट १५ कोटी कि.मी. इतके लांब असू शकते. धूमकेतूच्या सर्वसाधारण व्याख्येनुसार सगळय़ाच धूमकेतूंना शेपूट असते. परंतु काही धूमकेतूंना शेपूट निर्माण होऊ शकत नाही असे धूमकेतू लघुग्रहांसारखे दिसतात.
योगेश सोमण
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
टोनी मॉरिसन

इंग्लंडविरुद्ध संघर्ष करून स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिणाऱ्या अमेरिकेने विसावे शतक मावळायला लागले होते, तरीही आपल्या देशातील कृष्णवर्णीयांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवले होते. या दुटप्पी वागणुकीविरुद्ध परखडपणे लिखाण केले टोनी मॉरिसनने! टोनी मॉरिसनचा जन्म १८ फेब्रुवारी १९३१ रोजी अमेरिकेतील ओघयो स्टेटमधील लॉरेन येथे झाला. आपल्याकडे जसे उच्चवर्णीयांच्या पारंपरिक साहित्याला फाटा देऊन दलित साहित्य निर्माण झाले तसेच टोनी मॉरिसनने आपल्या लेखनातून आफ्रिकन-अमेरिकनांचे दुरवस्थेतले जिणे जगासमोर आणले. ‘द ब्ल्यू एस्ट आय’ ही तिची पहिली कादंबरी. एक आफ्रिकन-अमेरिकन मुलगी आपण निळे डोळे मिळवू शकलो तरच सुंदर दिसू असा समज करून घेते. या वेडापायी तिचा कसा नाश होतो याची कथा या कादंबरीत आहे. ‘सुला’मध्ये समाजाविरुद्ध बंड करणाऱ्या एका स्त्रीची कथा आहे. याशिवाय ‘साँग ऑफ सालोमन’, ‘टार बेबी’, ‘बिलव्हेड’ याही कादंबऱ्या गाजल्या. ‘द अ‍ॅन्सेन्टर अ‍ॅज फाऊंडेशन’ हा टीकात्मक निबंधही गाजला. ‘दि ब्लॅक बुक’मधून तिने गुलामगिरीच्या काळापासूनचे कृष्णवर्णीयांचे संघर्षमय जीवन चित्रित केले आहे. ‘रेसिटाप’ या कादंबरीतून तिने स्वत:चे जीवन साकारलेय. ‘बिलव्हेड’ या कादंबरीने इतिहास घडविला. एक गुलाम स्त्री पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण पकडली जाते. तत्पूर्वी ती मुलांना मारते, कारण आपल्या मुलांच्या वाटय़ाला गुलामगिरीचे जिणे येऊ नये म्हणून. एका सत्यघटनेवर आधारलेली ही कादंबरी खूप गाजली. साहित्य हे समाजासाठी असावे, असे तिचे मत होते.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
शहर सोडून आडगावात!

शाळेला सुटी लागली. रोहन बाबांच्या बदलीच्या गावी आईबरोबर आला होता. तिथल्या साखर कारखान्यात बाबा मोठे अधिकारी होते. बाबा कारखान्यात गेल्यावर रोहनला प्रश्न पडला, ‘घरी बसून काय करू? कुठं जायचं? शी, सगळंच टपरी आहे इथं. उगाच आलो शहर सोडून या आडगावात.’ अंगणातल्या चिंचेच्या भल्याथोरल्या झाडाखाली पारावर बसून तो विचार करत होता. मळकी विजार, सदरा, डोक्यावर गांधी टोपी घातलेला सखाराम येताना त्याला दिसला. त्याची डय़ुटी बंगल्यावर आहे असं बाबा म्हणाले होते. सखाराम त्याच्याजवळ आला. हसून म्हणाला,‘‘छोटे मालक, माझ्या घरी येता का? आमचा शंकर, मंगल खेळायला बोलवताहेत.’’ रोहनचा काही मूड नव्हता. शंकर-मंगलशी आपण काय खेळणार? तेवढय़ात बाहेर अंगणात येत आई म्हणाली, ‘‘विचारतोय तर जा की! घुम्यासारखा घरी कशाला बसतोस?’’ रोहनच्या चेहरा ढीम्म होता. महादेवही पारावर बसला. ‘‘दुपारी ओढय़ावर पोहायला जाणार का?’’ त्यानं विचारलं. ही आयडिया रोहनला आवडली. दुपारी शंकर, मंगल, रोहन ओढय़ावर गेले. आजूबाजूला दाट झाडी होती. वाळूतून चालताना मजेदार आवाज होत होता. एक कुत्रा त्यांच्यावर भुंकायला लागला. रोहननं दगड उचलला आणि भिरकावला. कुत्रा दूर जाऊन, वाळूत बसून शेपूट हालवत त्यांच्याकडे पाहू लागला. महादेव रोहनला म्हणाला,‘‘तुम्ही दगड उचललात ना तेव्हा वाटलं मुक्या जनावराला मारायला निघालात, पण तुम्ही त्याला फक्त घाबरवलंत.’’ रोहन म्हणाला, ’‘कशाला मारायचं, त्यानं काय केलंय माझं?’’ ‘कळतंय कुठं हे सगळय़ांना. गलोलीनं पाखरं मारतात. कुत्र्याची शेपटी पिरगाळतात. मांजराच्या शेपटीला डबडं बांधतात. नाकतोडे, चतुर पकडून पायाला दोरी बांधून फिरवतात. पाणनिवळय़ा, किडे पकडून डब्यात कोंडतात..’ दु:खी स्वरात महादेव सांगत राहिला. तेवढय़ात फांदीवरून एक कावळा मोठय़ांदा ओरडला. तिघे वर पाहायला लागले तर एक माकड फांदीवरून दुसऱ्या फांदीवर घाबरून, गोंधळून वेडय़ावाकडय़ा उडय़ा मारत होते आणि कावळा त्वेषानं त्याला टोची मारत ओरडत होता. एवढं माकड, एवढासा कावळा, तरी असं कसं? रोहनला कळेना. महादेव म्हणाला,‘‘या माकडानं कावळय़ाची अंडी पळवण्याचा प्रयत्न केला असणार. कावळी चिडून हल्ला करून त्याला दूर पळवेल.’’ मंगल म्हणाली,‘‘प्राण्यांच्या, पाखरांच्या आया पोरांचं फार रक्षण करतात. लहान पाखरू मोठय़ा पाखरांनासुद्धा पळून लावतात. अशा वेळी खूप ताकद येते त्यांच्यात!’’रोहनला सगळं विलक्षण होतं. पूर्वी कधी न अनुभवलेलं विश्व त्याला जीवनाचं नवं ज्ञान देत होतं. शर्ट काढून तो पाण्यात उतरला. महादेवनंही पाठोपाठ उडी ठोकली. पाण्यात डुंबताना रोहन म्हणाला, ‘महादेव, मंगल तुमच्यासारखे मित्र मला आजपर्यंत कधी मिळाले नव्हते.’
चांगल्या मित्रांमुळे आपलं आयुष्य संपन्न आणि आनंदी होतं. बऱ्याचदा आपण त्यांना गृहीत धरतो. त्यांना दुखावतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहा. ते कायम तुमची साथ देतील.
आजचा संकल्प - मी मित्रांविषयी कृतज्ञ राहीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com