Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

मराठा समाजाला आर्थिक सवलती देणे गरजेचे - गणेश नाईक
बेलापूर/वार्ताहर
: मराठा समाजाला आर्थिक मदतीची गरज असून या समाजाला आर्थिक सवलती देण्याची मंत्रिमंडळाची अंत:स्थ धारणा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. नवी मुंबईच्या मराठा समाजाच्या वतीने आयोजित रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात नाईक बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मराठा समाज हा सर्वात जास्त संयमी समाज आहे. नवी मुंबईच्या जडणघडणीत या समाजाचा मोठा वाटा आहे. या समाजाच्या मंडळींनी संपूर्ण समाज एकसंध राखण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे, असे सांगत नाईक यांनी मराठा भवनाच्या विकासासाठी १४ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

सेना, राष्ट्रवादीचे मिशन ऐरोली; बेलापुरात शांतता
नवी मुंबई/प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे सर्वत्र वाहू लागले असताना नवी मुंबईतही राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी जोर धरला असून यामुळे शहरातील राजकीय वातावरण हळूहळू तापण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईतील बेलापूर तसेच ऐरोली या दोन विधानसभा मतदारसंघांपैकी कोपरखैरणे ते दिघ्यापर्यंत पसरलेल्या ऐरोली विधानसभा क्षेत्रात या सभा, मेळाव्यांचा जोरदार धुरळा उठण्यास प्रारंभ झाला असून शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांनी वातावरण निर्मितीसाठी ऐरोलीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसू लागले आहे.

‘एनएमएमटी’च्या ताफ्यातही वातानुकूलित बसेस
नवी मुंबई/प्रतिनिधी :
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांना सीएनजीत रूपांतरित करण्याच्या निर्णयाला जेमतेम महिन्याभराचा कालावधी उलटत नाही, तोच आता ‘एनएमएमटी’च्या ताफ्यात वातानुकूलित बसेसचा समावेश करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. येत्या वर्षभरात १५० नव्या बसेस खरेदी करण्याचा संकल्प व्यवस्थापनाने सोडला असतानाच, दिल्लीतून जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून सुमारे ४२ कोटी रुपयांच्या प्रकल्पास हिरवा कंदील मिळाल्याने, सध्या ‘एनएमएमटी’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

रामशेठ ठाकूर यांना मावळमधून उमेदवारीचा ठराव
पनवेल/प्रतिनिधी :
आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना उमेदवारी देण्यात यावी, असा ठराव पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र ओबीसी सेलच्या मेळाव्यात करण्यात आला. काँग्रेस ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष के. सी. लेंका यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सेलच्या राज्य सल्लागार समितीचा मेळावा रविवारी झाला. या मेळाव्यात ही मागणी करण्यात आली. ओबीसी सेल हा काँग्रेसचा कणा असून आपले हक्क मिळविण्यासाठी ओबीसींनी संघटना मजबूत करायला हवी, असे मत अविनाश काकडे यांनी व्यक्त केले. मराठय़ांना आरक्षण देण्याची गरज असली तरी ओबीसींनाही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार म्हणजे ५२ टक्के आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले. राज्यात व देशात ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागरूक राहण्याची तसेच भरीव कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन रामशेठ ठाकूर यांनी केले. काँग्रेसने ओबीसी साठी केलेले कार्य तळागाळातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी ओबीसी सेलतर्फे एक विशेष पुस्तिका काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे रामशेठ ठाकूर यांच्याकडे आल्यापासून या सेलचे कार्य वाढले आहे.

विकासकामांसाठी आमदारांचा पुढाकार
बेलापूर/वार्ताहर :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील विविध समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त विजय नाहटा यांची सोमवारी भेट घेतली. बेलापूरमधील नागरी आरोग्य केंद्र त्वरित कार्यान्वित करण्यात यावे, तुर्भे स्मशानभूमी, कुकशेत गावाला स्मशानभूमी बांधण्यात यावी. बेलापूर गावाजवळ रेल्वे बोगद्याशेजारी पादचारी पूल बांधण्यात यावा, सानपाडा गावाजवळील रेल्वे पादचारी पूल दुरुस्त करण्यात यावा, तुर्भे आंबेडकरनगर येथील पाणीटंचाई दूर करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन म्हात्रे यांनी आयुक्तांना यावेळी दिले.

संकल्पतर्फे समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
बेलापूर/वार्ताहर :
तुर्भे येथील संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेतर्फे प्रभागातील नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांना शासनाचे ओळखपत्र उपलब्ध करून देणे, पॅनकार्ड उपलब्ध करून देणे, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेणे, आदी उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचा लाभ सुमारे दोन हजार विद्यार्थी व रहिवाशांनी घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष व उपविभागप्रमुख अशोक सकपाळ यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना शासकीय ओळखपत्र मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करून ठाणे तहसील कार्यालय गाठावे लागते, मात्र ‘संकल्प’ने ही सर्व किचकट प्रक्रिया स्वत:च्या शिरावर घेत घरपोच ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबवला. तसेच सदर प्रभागातील मध्यमवर्गाला पॅनकार्डचे महत्त्व पटवून पॅनकार्ड काढण्यासाठी रहिवाशांना प्रोत्साहित केले. केवळ शासकीय दराने पॅनकार्डदेखील घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी सुशील चिकणे, विकास पवार आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.