Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

आयपीएल स्पर्धेसाठी नाशिकच्या अभिषेक राऊतची निवड
प्रतिनिधी / नाशिक

मुंबईत डी. वाय. पाटील ट्वेन्टी २० क्रिकेट स्पर्धा रंगलेली. प्रत्येक सामन्यागणिक स्पर्धेतील वाढणारी चूरस प्रेक्षकांना क्रिकेटच्या अनिश्चिततेचा अनुभव देत होती. इतर सर्व संघांना चकवित डी. वाय. पाटील संघाने अंतिम फेरी गाठली, आणि स्वप्नील अस्नोडकरच्या उत्कृष्ठ खेळीने विजेतेपदाला गवसणीही घातली. विजयी संघातील प्रत्येक खेळाडूवर अभिनंदनाचा वर्षांव होत असताना राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक डेव्हिड बेरी यांच्या पारखी नजरेने एक हिरा निवडला होता.

पथके तीन, दिवस पाच आणि दोषी प्रवासी दहा
‘फ्रण्ट सीट’ विरोधात आरटीओच्या मोहिमेची फलनिष्पत्ती

प्रतिनिधी / नाशिक

रिक्षाचालकाशेजारी बसणाऱ्या प्रवाशांविरोधात (फ्रंट सीट) प्रारंभी कठोर कारवाईची घोषणा करून नंतर काहिशी मवाळ भूमिका स्वीकारणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागाने (आर.टी.ओ.) अखेर एकदाची कारवाई सुरू केली असली तरी ही मोहीम म्हणजे निव्वळ फार्स ठरल्याचे स्पष्ट होत आहे. या विभागाच्या तीन पथकांनी जंग-जंग पछाडूनही म्हणे गेल्या पाच दिवसात शहरात जेमतेम दहा प्रवासीच रिक्षाचालकाशेजारी बसून प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकाकी महिलांना ‘एकी सपोर्ट ग्रुप’चा आधार
चारुशीला कुलकर्णी / नाशिक

आयुष्याच्या एका वळणावर आपल्याही नकळत कोणीतरी आपल्या भावविश्वात डोकवावे, त्याच्या सुरात सूर मिसळत आयुष्याची स्वप्ने पाहावी हे प्रत्येकीचे उमलत्या वयातील पापणीआड दडलेले एक स्वप्न. काहींची स्वप्ने पूर्णत्वास जातात, काही मात्र परंपरा, जबाबदाऱ्यांमध्ये अडकत त्याच एका परिघात एकटे फिरत राहतात, काही मात्र जोडीदाराचा हात धरून चार पावले चालतातही, मात्र नशिबाचे फासे पलटतात आणि एकाकीपण त्यांच्या वाटेला येते.

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत मेसचे उद्घाटन
नाशिक, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील अत्याधुनिक मेस इमारतीचे उद्घाटन प्रबोधिनीच्या संचालक श्रीदेवी गोयल यांच्या हस्ते व उपसंचालक रितेशकुमार यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी पोलीस अधीक्षक (प्रशिक्षण) नंदकुमार ठाकूर, सहाय्यक संचालक (कवायत) धनराज कोसे, सहाय्यक संचालक व्ही. एल. गडकरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. गांगुर्डे व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.या मेसमध्ये एकावेळी ४०० पोलीस अधिकारी जेवायला बसू शकतील. पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असून ती मागील १०३ वर्षांपासून कार्यरत आहे.

ऑर्किड स्कूलचे ‘कलर कॉन्टेस्ट’मध्ये यश
नाशिक येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलने नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया कॅमल कलर कॉन्टेस्ट २००८ स्पर्धेमध्ये विभागात ‘द बेस्ट परफॉर्मन्स’ पारितोषिक पटकावले आहे.
विभागातून स्पर्धेत सहभागी झालेल्या १२९ विद्यालयांमधून या स्कूलची निवड करण्यात आली.
‘ग्रुप सी’मध्ये कैवल्य दीक्षितने प्रथम, ‘ग्रुप डी’मध्ये सदाफ उष्नवाला आणि कल्पेश मालपाणी यांनी द्वितीय, ‘ग्रुप ए’मध्ये तन्मय पाटणकर आणि ‘ग्रुप सी’मध्ये चैतन्य होसमाने यांनी व्दितीय तसेच ‘ग्रुप डी’मध्ये प्रतिक सारडाने तृतीय क्रमांक पटकावला.
प्रतिनिधी, नाशिक.

चांदवड मर्चन्ट बँकेचे संचालक अशोक फलके यांचे निधन
चांदवड / वार्ताहर

येथील चांदवड मर्चन्ट बँकेचे संचालक अशोक माधव फलके (४४) यांचे मोटार सायकल अपघातात भोयेगाव शिवारात निधन झाले. फलके हे १५ फेब्रुवारी रोजी रात्री १.३० च्या सुमारास मोटारसायकलने भोयेगावकडे निघाले असता वळणावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल झाडावर आदळळी व ते जागीच ठार झाले. सकाळी ग्रामस्थांनी नाशिक जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिरीष कोतवाल यांना सदर घटनेचे वृत्त देताच ते तात्काळ घटनास्थळी गेले. त्यानंतर दुपारी एक वाजता येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी चांदवड र्मचन्ट बँकेचे अध्यक्ष दत्तात्रय राऊत, अशोक व्यवहारे, प्रकाश शेळके, मारुती ठोंबरे यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. फलके यांच्या पषात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

कवी अरूण काळे स्मृतिदिनानिमित्त कवी संमेलन
नाशिक, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

प्रख्यात विद्रोही कवी ‘रॉक गॉर्डन’कार अरूण काळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रिपब्लिकन पँथर्स- जातीअंताची चळवळ या संघटनेतर्फे १९ फेब्रुवारी येथे कवी संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे प्रदेश निमंत्रक विजय बागूल यांनी दिली. गडकरी चौकातील माता रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात सायंकाळी चारला आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गंगाधर अहिरे हे राहणार आहेत. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते करूणासागर पगारे हे ‘पँथरची चळवळ आणि अरूण काळे’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. कवी संमेलनास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे रवी चौरे, निलेश सोनवणे, सुनील पटेकर आदींनी केले आहे.

देवळा पंचायत समिती सभापतीवरील अविश्वास प्रस्ताव बारगळला
देवळा / वार्ताहर

तालुका पंचायत समिती सभापतींवर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव एकही सदस्य हजर न राहिल्याने निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी फेटाळून लावला.
तालुका पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई शेवाळे या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात असा आरोप करीत उपसभापती रतन देवरे, सदस्य बापू देवरे, राहुल केदारे, अहिल्या पवार, सुकदेव अहिरे या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आठ दिवसांपूर्वी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी पंचायत समिती सभागृहात सदस्यांची बैठक उपविभागीय अधिकारी काकुस्ते, तहसीलदार सी. एच. वैष्णव यांच्या उपस्थितीत बोलविण्यात आली होती. मात्र सदर बैठकीस अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या सदस्यांपैकी एकही हजर न झाल्याने तो ठराव फेटाळण्यात आला.

विद्यार्थी सेनेचा मेळावा
नाशिक / प्रतिनिधी

भारतीय विद्यार्थी सेनेच्या महानगर शाखेचा मेळावा १९ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराला परशुराम साईखेडकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेनेचे संपर्कनेते विश्वनाथ नेरूरकर मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्यास माजी खासदार उत्तम ढिकले, उपनेते आ. बबन घोलप, सहसंपर्कप्रमुख सुनील बागूल, जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महापौर विनायक पांडे, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क संघटक सत्यभामा गाडेकर, महानगरप्रमुख निलेश चव्हाण, उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यार्थी सेनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महानगरातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मालेगावमध्ये जिल्हास्तरीय साहित्य संमेलन
मालेगाव / वार्ताहर

मालेगाव मराठी साहित्य संघातर्फे येत्या एक मार्च रोजी येथील आय. एम. ए. हॉलमध्ये जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनास प्रा. रेखा भंडारे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने परिसंवाद, कविसंमेलन व काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनास साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष रमेश उचित, कार्याध्यक्ष रविराज सोनार व सचिव अशोक पाटील यांनी केले आहे.