Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मराठा समाजाला आर्थिक सवलती देणे गरजेचे - गणेश नाईक
बेलापूर/वार्ताहर :
मराठा समाजाला आर्थिक मदतीची गरज असून या समाजाला आर्थिक सवलती देण्याची मंत्रिमंडळाची अंत:स्थ धारणा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे

 

केले.
नवी मुंबईच्या मराठा समाजाच्या वतीने आयोजित रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात नाईक बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मराठा समाज हा सर्वात जास्त संयमी समाज आहे. नवी मुंबईच्या जडणघडणीत या समाजाचा मोठा वाटा आहे. या समाजाच्या मंडळींनी संपूर्ण समाज एकसंध राखण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे, असे सांगत नाईक यांनी मराठा भवनाच्या विकासासाठी १४ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
जगासमोर अनेक आव्हाने असताना धर्म व जातीच्या आधारावर राजकारण असू नये, असे मत डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केले. जगातील इतर राष्ट्रांप्रमाणेच भारताचा अजेंडा आर्थिक व सामाजिक स्तराचा असला पाहिजे, तरच आपली उन्नती होईल, असे विजय पाटील म्हणाले. मराठा समाज शेतीप्रधान असून आता बदलत्या काळानुसार उत्तम व्यवसाय, मध्यम नोकरी व कनिष्ठ शेती या सूत्राचा अवलंब करण्याचे आवाहन हावरे बिल्डर्सचे संचालक सुरेश हावरे यांनी यावेळी केले. तसेच समाजातील होतकरूंना उद्योगशील करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिले. यावेळी बी. जी. शिर्के कंपनीचे संचालक जे. एस. जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते नरेंद्र पाटील, शिवम परिवाराचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद भोसले, गिरीश इंटरप्रायजेसचे संचालक गिरीश खंडागळे, महाराष्ट्र पेट्रोकेमिकलचे अध्यक्ष चंदू राणे आदी मान्यवर तसेच मराठा समाजाचे ना. भि. नाईक, शामराव महाडिक, अमरजा चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.