Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सेना, राष्ट्रवादीचे मिशन ऐरोली; बेलापुरात शांतता
नवी मुंबई/प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे सर्वत्र वाहू लागले असताना नवी मुंबईतही राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी जोर धरला असून यामुळे शहरातील राजकीय वातावरण हळूहळू तापण्यास सुरुवात झाली

 

आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईतील बेलापूर तसेच ऐरोली या दोन विधानसभा मतदारसंघांपैकी कोपरखैरणे ते दिघ्यापर्यंत पसरलेल्या ऐरोली विधानसभा क्षेत्रात या सभा, मेळाव्यांचा जोरदार धुरळा उठण्यास प्रारंभ झाला असून शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांनी वातावरण निर्मितीसाठी ऐरोलीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसू लागले आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले या दोघांचेही ऐरोली विधानसभा क्षेत्र हे ‘होम पीच’ मानले जाते. ऐरोली हा चौगुले यांचा गड मानला जातो, तर पालकमंत्री नाईक यांचे वास्तव्य कोपरखैरणेत असल्याने त्यांच्यासाठीही हा मतदारसंघ घरातलाच आहे. या पाश्र्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले असून यामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. साधारण आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीने ऐरोलीत युवकांचा मेळावा भरवून ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक हेच पक्षाचे उमेदवार असतील हे स्पष्ट केले. हा मेळावा तसा फ्लॉप शो ठरला असला तरी राष्ट्रवादीने ऐरोली उपनगरात जोरदार मोर्चेबांधणी सुरू करून चौगुले यांची नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे चौगुले यांनीही वाशी ते बेलापूपर्यंत पसरलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघाऐवजी ऐरोलीत जोर लावला आहे. ऐरोलीत जंगी असा महिला मेळावा भरविल्यानंतर या मतदारसंघाचे महत्त्वाचे अंग असणाऱ्या घणसोली या उपनगराकडे आता शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे. येत्या २२ फेब्रुवारीस घणसोली विभागातील शिवसैनिकांचा मेळावा भरवून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा बेत चौगुले यांनी आखला आहे. याच विभागातील उपजिल्हाप्रमुख शिवराम पाटील यांच्याकडे कोपरखैरणे विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून या भागातील महिलांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दुसरीकडे पालकमंत्री नाईक यांनीही ऐरोली मतदारसंघातील वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आपला जास्तीत जास्त वेळ खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे. या तुलनेत बेलापूर विधानसभा क्षेत्रात सध्या सामसूम दिसत असून नाईक आणि चौगुले या दोन्ही नेत्यांनी सध्या ऐरोलीतील फडातच आपली ताकद आजमविण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता असून या पक्षाचे नेते बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत