Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘एनएमएमटी’च्या ताफ्यातही वातानुकूलित बसेस
नवी मुंबई/प्रतिनिधी :
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांना सीएनजीत रूपांतरित करण्याच्या निर्णयाला जेमतेम महिन्याभराचा कालावधी उलटत नाही, तोच आता

 

‘एनएमएमटी’च्या ताफ्यात वातानुकूलित बसेसचा समावेश करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. येत्या वर्षभरात १५० नव्या बसेस खरेदी करण्याचा संकल्प व्यवस्थापनाने सोडला असतानाच, दिल्लीतून जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून सुमारे ४२ कोटी रुपयांच्या प्रकल्पास हिरवा कंदील मिळाल्याने, सध्या ‘एनएमएमटी’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या अनुदानातून खरेदी कराव्या लागणाऱ्या बसेसपैकी तब्बल २० टक्के गाडय़ा ‘लो फ्लोअर’ असाव्यात, अशी अट दिल्लीश्वरांनी घातली आहे. यामुळे वातानुकूलित बसेसची कल्पना पुढे आली असून, भविष्यात होऊ घातलेल्या ‘दादर-वाशी’, तसेच वाशी-वांद्रे या मार्गांवर ‘एनएमएमटी’च्या एसी बसेस धावतील, अशा पद्धतीचे नियोजन केले जात आहे.
नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार तसेच ‘एनएमएमटी’चे मुख्य व्यवस्थापक जितेंद्र पाफळकर यांनी २०० बसेसच्या खरेदीसाठी सुमारे ९९ कोटी ४२ लाख रुपयांचा एक प्रकल्प दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून दिल्लीत सादर केला आहे. यापैकी १५० बसेसपैकी ४२ कोटी रुपयांच्या प्रकल्पास केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे. यापैकी २१ कोटी रुपये केंद्र, तसेच राज्याच्या माध्यमातून ‘एनएमएमटी’च्या तिजोरीत जमा होण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या नऊ मार्गावर ‘एनएमएमटी’च्या बसेसना यापूर्वीच हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. परिवहन उपक्रमाचे आदेश येताच ‘एनएमएमटी’चा मुंबई प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे. दिल्लीतून मिळणाऱ्या अनुदानापैकी २० टक्के बसेस या ‘लो-फ्लोअर’ असणे बंधनकारक ठरणार आहे. यामुळे या बसेसपैकी काहींचा वापर वातानुकूलित बससेवेसाठी केला जावा, असा उपक्रमाचा प्रयत्न आहे, अशी माहिती पाफळकर यांनी ‘वृत्तान्त’ला दिली.