Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

नंदुरबार खरेदी-विक्री संघ निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
वार्ताहर / शहादा

नंदुरबार जिल्हा परिषद व जिल्ह्य़ातील पंचायत समित्यांच्या रणधुमाळीनंतर आता पुन्हा एकदा
खरेदी-विक्री संघ या सहकार क्षेत्रातील महत्वाच्या संस्थेसाठी जिल्ह्य़ात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व नवापूर येथील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवशी तब्बल २४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. विशेष म्हणजे जिल्ह्य़ात अन्यत्र चुरशीचे वातावरण असताना नंदुरबार तालुका खरेदी विक्री संघाच्या १७ जागांसाठी फक्त १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अविरोध होणार हे स्पष्ट आहे.
शहाद्यात सर्वाधिक संख्या
येत्या २२ मार्च रोजी होणाऱ्या शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक ९४ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्य़ातील ही सर्वात मोठी संस्था असून १४ हजाराच्यावर सभासद यानिमित्ताने आपला मतदानाचा हक्क बजावतील.

बेरोजगार तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
वार्ताहर / जळगाव

तरुणाच्या या कृतीने शासकीय योजनांपासून बेरोजगारांना वंचित ठेवणाऱ्या व योजनांचा लाभ पदरात पडू देण्यात अनंत अडचणी निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांची व बेकारांच्या सर्वच मंजूर-नामंजूर प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. शासकीय दिरंगाई व बँक अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे बीज भांडवल योजना कर्जासाठी अनेक वर्षे पायपीट करून वैतागलेल्या राहुल रघुनाथ पाटील या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढय़ातच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने यंत्रणेत प्रचंड खळबळ माजली. सदर तरुणाने बँक अधिकारी व त्यांच्या संबंधीत सर्वच प्रकरणांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. जळगाव शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा व्यवसाय करणाऱ्या राहुलने सोमवारी रॉकेलची कॅन घेवूनच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांची प्रतिक्षा करू लागला. दुपारच्या सुमारस जिल्हाधिकारी महोदय गाडीतून खाली उतरताच राहुलने रॉकेलची कॅन अंगावर ओतली व तो पेटविण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याच्यावर रक्षकाने झडप घातली. त्याला अटक केली व रितसर गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. मात्र तरूणाच्या या कृतीने यंत्रणेची दिरंगाई व बँक अधिकाऱ्यांचे आडमुठे धोरण समोर आले आहे. शासकीय योजनांपासून बेरोजगारांना वंचित ठेवणाऱ्या व योजनांचा लाभ कोणाच्या पदरात पडू देण्यात अनंत अडचणी निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांची व बेकारांच्या सर्वच मंजूर-नामंजूर प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करीत त्याने कठोर कारवाईची मागणी ‘वृत्तान्त’शी बोलताना केली आहे. राहुलवर होणाऱ्या अन्यायाला ‘लोकसत्ता वृत्तान्त’नेच सर्व प्रथम वाचा फोडली होती. राहुलने जिल्हा उद्योग केंद्रात बीज बांडवल योजनेंतर्गत कर्ज प्रकरण केले. ते बडोदा बँकेकडे पाठविल्यानंतर त्याप्रमाणे साऱ्या पूर्तता केल्यावर सुद्धा दोन वर्षे बँक अधिकाऱ्यांनी त्याला फेऱ्या मारायला लावल्या. या प्रकाराला वैतागूनच त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यांनी त्याची दखल घेत बँकेकडून अहवाल मागविला. आता आपल्याला न्याय मिळेल असे वाटत असताना बँक अधिकाऱ्यांनी प्रकल्प रकमेच्या फक्त वीस टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर वैतागलेल्या राहुलने जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा धाव घेतली व अन्याय कथन करून न्याय द्या अन्यथा दोन दिवसात आत्मदहन करणार असा इशारा दिला होता. बडोदा बँकेच्या डी. व्ही. जोशी व शासकीय योजनांची प्रकरणे हाताळणाऱ्या बागले यांनी आपणास नाहक त्रास दिला. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली तसेच वृत्तपत्रात बातमी दिली म्हणून सूडबुद्धीने त्यांनी मानसिक त्रास दिला असा त्याचा आरोप आहे. आपणास कर्जापासून वंचित ठेवले असले तरी यापुढे बेरोजगारांवर अन्याय होऊ नये म्हणून जिल्ह्य़ातील सर्व प्रलंबित व मंजूर प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणीही त्याने केली आहे.