Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘थरमॅक्स’मध्ये २९ लाखांचा घोटाळा ; दोघे पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

चिंचवड येथील थरमॅक्स कंपनीत माजी खरेदी विभाग प्रमुख व सुरक्षा रक्षक यांनी संगनमताने बनावट आदेशाद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.याप्रकरणी निगडी

 

पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या चिंचवड शाखेचे प्रमुख अनंत गोपाळ क्षीरसागर (वय ४८, रा. ईशानी गार्डन रो हाऊस नं.१,सेक्टर २९ प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंपनीच्या माजी खरेदी विभाग प्रमुख व एका ट्रेडिंग कंपनीच्या मालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मयूर शांताराम जाधव (रा.आदित्य बिल्डिंग, फ्लॅट नं. ४८/४९, पुणे) हे ऑक्टोबर २००८ पर्यंत कंपनीमध्ये खरेदी विभाग प्रमुख म्हणून कामाला होते.त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सात बनावट आदेशांची अंमलबजावणी करून काही सुरक्षा रक्षकांच्या मदतीने २९ लाख २० हजार ३७० रुपयांचा माल कंपनीत आल्याचे भासविले.
तथापि कंपनीस या मालाची गरज नसताना देखील बेकायदेशीर आदेश काढले व कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक केली. कंपनीचे धनादेश विकास ट्रेडिंग कंपनीच्या नावावर वटविण्यात आले आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकणात जाधव यांच्या शिवाय कंपनीतील अधिकारी व कर्मचारी हरिश्चंद्र तुकाराम म्हस्के,नंदकुमार शिवाजी कोडागे,परशुराम बालाजी चाळके,संग्राम संपत आल्हाट व विकास ट्रेडिंग कंपनी( ४८२ कसबा पेठ, पुणे) यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.अद्याप त्यांना अटक केलेली नाही.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बी.एस.टेळे पुढील तपास करत आहेत.
या प्रकरणात कंपनीतील आणखी काही मोठे अधिकारी असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ऐन मंदीच्या काळात हे प्रकरण उघडकीस आल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.