Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आचारसंहितेच्या शक्यतेने कार्यक्रमांची घाई
पिंपरी, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बहुचर्चित योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याचा निर्णय सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार संपूर्ण दिवसभर पिंपरी-चिंचवडमध्ये तळ

 

ठोकून राहणार आहेत.
आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी ‘दीड लाखात घर’ या बहुचर्चित घरकुल योजनेतील सदनिका बांधण्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे.
खासगी रुग्णालयातील उपचार न परवडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सुरू करण्यात आलेला हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग (कॅथ लॅब) पवार यांच्या उपस्थितीत खुला करण्यात येणार आहे. पिंपरी पालिकेचा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून ज्याकडे पाहिले जाते, त्या सायन्स पार्कच्या कोनशिला समारंभाचा मुहूर्तही पालिकेने याच दिवशी काढला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले निगडी यमुनानगर येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन पवार करणार आहेत. याखेरीज, भोसरीचे प्रवेशद्वार ठरणारे लांडेवाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रमुख कार्यक्रमाव्यतिरिक्त नेहरुनगर येथील ‘पीएमपी’च्या बस आगाराच्या इमारतीचे उद्घाटन, थरमॅक्स ते खंडोबा माळ रस्त्याच्या मजबुतीकरणाचा प्रारंभ, महापौर चषक पहिली व्यावसायिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण पवार यांच्या हस्ते होणार आहे. याखेरीज काही खासगी कार्यक्रमांना पवार उपस्थित राहणार आहेत.
त्यामध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना थेरगाव येथे मानपत्र देण्याचा कार्यक्रम होणार असून चिंचवड स्टेशन येथे एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
लोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार, मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे धडाकेबाज पध्दतीने उद्घाटन करण्याचे राष्ट्रवादीचे नियोजन आहे