Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जीवनदायी आणि माणुसकीशून्यही!
मुस्तफा आतार, पुणे, १७ फेब्रुवारी

रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रात्री-अपरात्री धडपडणारी.. डॉक्टरांबरोबर, किंबहुना त्यांच्या आधीच शुश्रूषेसाठी सज्ज असणारी.. रात्रपाळीला बारा वाजता जेवताना रुग्णाच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून पळत सुटणारी सिस्टर अर्थात परिचारिकाच रुग्णांसाठी बहुतांशवेळा ‘जीवनदायिनी’ ठरते.. पण काही वेळा तिचे दुर्लक्ष आणि माणुसकीशून्य

 

वागणुकीचा फटकाही रुग्णाला बसून त्याला जीव गमवावा लागतो.
..तपासणीसाठी रुग्णाला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर हलविणे.. त्या रुग्णाची फाईल दुसऱ्या एखाद्या डॉक्टरकडे तपासणीसाठी देणे.. कुणाला स्ट्रेचरवरून ‘ओटी’त, तर कुणाला सोनोग्राफीसाठी नेणे.. अशी नानाविध कामे करणारे ‘ब्रदर्स’, वॉर्डबॉईज, मावश्या, मामा ही कामे करतातच, मात्र कामाच्या ओझ्यामुळे बहुतेकवेळा त्यांचे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी वादही होतात. केवळ कामाचे तास भरण्याची त्यांची वृत्तीही दिसून येते. मनापासून रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिका आणि अन्य कर्मचारी एका बाजूने दिसत असताना दुसरीकडे त्यांच्या बेदरकारपणाचाही प्रत्यय येतो.
‘पैसे भरल्याशिवाय रुग्णावर उपचार सुरू करता येणार नाहीत..’ अशी प्रारंभीच तंबी देणाऱ्या रिसेप्शन किंवा अकाउन्ट विभागातील कर्मचाऱ्यांची वागणूक पाहून हे कर्मचारीही धावत्या युगात ‘माणुसकी’ हरवून तर बसले नाही ना, असा प्रश्न मनात डोकावून जातो आणि मन खिन्न होते. असेच अनुभव आपल्यापैकी अनेकांना आलेही असतील.
अपरात्री येणाऱ्या रुग्णाला नेमके काय झाले किंवा दाखल झालेल्या रुग्णांपैकी एखाद्याचा रक्तदाब वाढला, सलाईन बंद झाले, ऑक्सिजन कमी झालाय याची पहिली ‘खबर’ मिळते ती परिचारिकेलाच! त्यानंतरच ती डॉक्टरांना ‘कॉल’ करते. तिच्या तत्परतेमुळेच अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला जीवदान मिळते. एखाद्या रुग्णाला काय हवंय, काय नको याचीही अधिक माहिती तिलाच असते. क ोणत्या वेळी क ोणते औषध द्यायचे किंवा औषध संपल्यावरही डॉक्टरांकडून ‘प्रिस्क्रिप्शन’ घेऊन नातेवाइकांना औषधे आणायला सांगणारीही परिचारिकाच असते.
‘आम्ही नेहमीच रुग्णांचे स्वागत हसतमुखाने करतो आणि तो बरा झाल्यावर त्याला निरोपही आनंदाने देतो,’ परिचारिका लाजवंती घाडगे, सौदामिनी साळवे यांनी ‘लोकसत्ता’कडे आपली भूमिका मांडली. ‘रुग्णांची सेवा करणे हे आमचे ध्येय आहेच, पण त्यांना बरे क रणे हादेखील उद्देश असतो. कोणत्याही रुग्णास काही झाले अथवा पाहिजे असल्यास त्याचे म्हणणे ऐकणे, त्यानुसार कृती करणे हे आमचे काम आहे. हे काम आम्हाला त्रासदायक वाटत नाही.’ रुग्णांशी आपले काहीतरी नाते आहे, असे समजून त्यांची दिवस-रात्र शुश्रूषा करणाऱ्या परिचारिका एकीकडे चांगले काम करत असतातही, पण रात्रपाळीला कामे आटोपून थोडीशी विश्रांती घेत असताना वारंवार हाका मारणाऱ्या रुग्णाला कसलेतरी ‘इंजेक्शन’ टोचून शांत (?) करण्याचा प्रयत्न करणाऱ्याही परिचारिका पाहायला मिळतात, तसेच आपण फ ोनवर बोलत असताना मध्ये ‘डिस्टर्ब’ करणाऱ्या रुग्णाकडे त्या कानाडोळाही करतात, पण जेव्हा डॉक्टरांची खरी गरज असते त्यावेळी त्यांनी लक्ष न दिल्याने रुग्णालाही जीव गमवावा लागतो. अशा घटनाही रुग्णालयांत घडतात, मात्र परिचारिकांचा निष्काळजीपणा किंवा कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाच्या बातम्या रुग्णालयाबाहेर फारशा येतच नाहीत.
किंबहुना रुग्णालयाचा लौकिक आणि व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी रुग्णालयेदेखील ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेत मूग गिळून गप्प असतात. कधी कधी तर स्पर्धेपोटी रुग्णालयांचीही माणुसकी हरवली की काय अशीच शंका येते.
म्हणूनच रुग्णालयांवर हल्ले होतात का, असाही सवाल या निमित्ताने मनाला सतावतो. पण हाताच्या बोटावर मोजता येतील इतके डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये आणि रुग्ण यांच्यात आजही थोडासा भावनिक ओलावा, माणुसकीचा झरा टिकून असल्याचे शहराच्या कु ठच्या तरी क ोपऱ्यात नकळत त्याचे दर्शन घडून जाते.