Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

ताराचंद रु ग्णालयाचा आता चेहरामोहरचा बदलतोय..!
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

रुग्णालयाची दगडी इमारत, त्यात आयुष्य संपलेल्या जुना खाटा, खराब झालेल्या भिंती किंबहुना त्याचा

 

मूळचा रंगच नाहीसा झालेला आणि रुग्णालयातील औषधोपचाराचा दरुगधीचा वासही तुम्ही अनुभवला असेल.. पण आता जाऊन पाहाल तर तुम्ही अवाक्च व्हाल..! हे चित्र आहे तब्बल ८२ वर्षांच्या तारांचद आयुर्वेद रुग्णालयाचे. मात्र आता तेथे जाऊन पाहाल तर तुम्हाला एका खासगी रुग्णालयासारखेच त्याचे चित्र पाहायला मिळेल..!
गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे तसेच काही नव्या सुविधा उपलब्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पाच कोटी रुपयांच्या खर्चाचे हे काम आहे. सध्या दोन कोटींचे काम झाले असून आता रुग्णालयास निधीची गरज भासत आहे. रुग्णालयाची २४० खाटांची सध्या क्षमता आहे. नूतनीकरणाचे काम झाल्यानंतर त्याची क्षमताही तीनशेच्या घरात जाईल. नूतनीकरणामध्ये जनरल सर्जरी, डोळे, कान-नाक-घसा आणि स्त्रीरोग, संसर्ग आजारांसाठी नवा शस्त्रक्रिया विभाग बांधण्यात येत आहे, अशी माहिती रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. सुहास परचुरे, नियामक मंडळाचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, अधीक्षक डॉ. रमेश गांगल यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
नूतनीकरण केलेल्या काही भागांचे नामकरण तसेच उद्घाटन येत्या शुक्रवारी (२० फेब्रुवारी) प्रीती सुधाजी महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी त्यांचे व्याख्यानही होईल. या प्रसंगी विजयकांत कोठारी यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार आहे. सध्या शस्त्रक्रिया विभाग आणि बाळंतपण विभागाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तसेच अतिदक्षता विभागाचे काम करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले. रुग्णांच्या उपचाराविषयी गोखले इन्स्टिटय़ूटने केलेल्या पाहणीत ८४ टक्क्य़ांची नोंद करण्यात आली. दरवर्षी पंचकर्म आयुर्वेदाच्या उपचारांसाठी देशभरातून सुमारे चाळीस हजार रुग्ण येथे येतात. राज्य शासनाकडून केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच रुग्णालयास मदत होते. मात्र अन्य सुविधांसाठी खासगी संस्थांकडून मदत घेण्याची वेळ रुग्णालयावर येते, अशीही खंत व्यक्त करण्यात आली.
आयुषकडून प्रस्तावास तत्त्वत: मान्यता
आयुर्वेद महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक उपचारपद्धतीच्या प्रकल्पासाठी आयुषकडून योजना राबविली जाते. प्रस्ताव मान्य झाल्यास संबंधित महाविद्यालयास पाच कोटींचा निधी मिळणार आहे. टिळक आयुर्वेद महाविद्यालयाने असा प्रस्ताव आयुषकडे पाठविला आहे. या प्रस्तावासाठी राज्याच्या आयुर्वेद संचालकांची शिफारस महत्त्वाची ठरते. प्रामुख्याने हा प्रस्ताव आयुषकडे सादर झाला आहे. आता केवळ शिफारसपत्र पाठविणे बाकी आहे. प्रस्तावास तत्त्वत: मान्यता मिळाल्याचे संकेत आहेत. महाविद्यालय संलग्नित रुग्णालयात आयुर्वेदसह अॅलोपॅथीचे उपचार मिळावेत. रुग्णाच्या आजाराचे निदान आधुनिक सामग्रीद्वारे करून उपचार आयुर्वेदाद्वारे करण्यात यावेत. पाच कोटीपैकी तीन कोटी इमारत तसेच दोन कोटी साहित्यसामग्रीसाठी असणार आहेत, अशी माहिती डॉ. परचुरे यांनी दिली.