Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पोलीस असल्याचे सांगत लुटणाऱ्या तिघांना अटक
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पोलीस असल्याची बतावणी करून साडेतीन हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्या तिघा तरुणांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. सातारा रस्त्यावर कोजागरी इमारतीसमोर आज पहाटे सव्वाच्या सुमारास ही

 

घटना घडली. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तुषार भीमराव कापरे (वय ३२, रा. २३०, जनवाडी), बबलु अर्जुनसिंग (वय ३१, रा. वारीस अपार्टमेंट, एलोरा पॅलेस, धनकवडी) आणि रमेश इराण्णा गौडा (वय २४, रा. बिबवेवाडी ओटा) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गौरव प्रकाश गायकवाड (वय २१, रा. संयोगिता अपार्टमेंट, शिरोळे रस्ता) यांनी याबाबत सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड व त्यांचे मित्र हे काल दुपारी सातारा रस्त्यावरील कोजागरी सोसायटीसमोर थांबले होते. मोटारसायकलवरून आलेल्या तिघा आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून गायकवाड व त्यांच्या मित्रांकडील मोबाईल व रोख रक्कम असा एकूण तीन हजार सातशे रुपयांचा ऐवज हिसकावून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गायकवाड व त्यांचे मित्र चोरटय़ांचा प्रतिकार करीत असताना, नजीकच असलेल्या सहकारनगर पोलिसांनी तिघा चोरटय़ांना पकडले व अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस.डी. पाटील याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
७४ हजारांची चोरी
मोटारचालकाचे लक्ष विचलित करून खासगी कंपनीच्या संचालकाची ७४ हजारांचा ऐवज असलेली व मोटारीत ठेवलेली बॅग अज्ञात चोरटय़ाने चोरून नेली. फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावर सागर आर्केडजवळ काल दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
महेश बाळकृष्ण कुरूप (वय ३७, रा. मिलियम स्टार, ढोले-पाटील रस्ता) यांनी याबाबत डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरूप हे एका खासगी कंपनीचे संचालक असून पुण्यामध्ये आल्यावर ते भाडेतत्त्वावर घेतलेल्या मोटारीतून फिरत. नेहमीप्रमाणे ते आज अशाच एका खासगी मोटारीतून फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावरील सागर आर्केडजवळ एका हॉटेलमध्ये त्यांच्या सहकार्याबरोबर जेवणासाठी गेले. त्या वेळी त्यांचा लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, घडय़ाळ असा एकूण ७४ हजारांचा ऐवज मोटारीत होता. त्या वेळी तेथे आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने मोटारचालकाला पैसे पडल्याचे सांगितले. पैसे उचलताना मोटारचालकाचे लक्ष नसल्याचे पाहून चोरटय़ाने मोटारीतील बॅग चोरून नेली. डेक्कन ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. डी. पाटील या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.