Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बीआरटीच्या विरोधात भाजपचे आंदोलन सुरू
पुणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

बीआरटी योजनेतील त्रुटी दूर न करताच हा प्रकल्प राबवण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आजपासून बीआरटी मार्गावर आंदोलन सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आज

 

बीआरटी मार्गावर सभा घेऊन नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या.
कात्रज ते हडपसर या मार्गावर सुरू असलेल्या बीआरटी योजनेत अनेक त्रुटी असून, दोन वर्षांत हा प्रायोगिक तत्त्वावरील एकमेव मार्गही प्रशासन पूर्ण करू शकलेले नाही. अशा परिस्थितीत अन्य २७ मार्गावरही बीआरटी योजना आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी आणि अस्तित्वातील मार्गातील त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी भाजपतर्फे आज आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार गिरीश बापट, योगेश गोगावले, अनिल शिरोळे, विजय काळे, विश्वास गांगुर्डे, उज्ज्वल केसकर, प्रा. विकास मठकरी, संदीप खर्डेकर, श्रीनाथ भिमाले, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, तसेच ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, मेजर जनरल एस.सी.एन. जटार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
स्वारगेट ते धनकवडी या टप्प्यात सहा प्रमुख चौकांमध्ये या वेळी धरणे आंदोलनही करण्यात आले.
आंदोलनाच्या पुढील टप्प्यात रविवारी (२२ फेब्रुवारी) या मार्गावर मानवी साखळी करण्यात येणार आहे.
आयुक्तांनी उद्या (बुधवार) दुपारी बैठक बोलावली असून, भाजपच्या शिष्टमंडळाबरोबर ते बीआरटीसंबंधी चर्चा करणार आहेत.