Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘एफटीआयआय’मध्ये शुक्रवारपासून बांगलादेशी चित्रपटांचा महोत्सव
पुणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

बांगलादेशच्या फाळणीपासून तेथील सद्यस्थितीच्या राजकीय, सामाजिक स्थितीचा वेध घेणाऱ्या विविध चित्रपटांचा महोत्सव फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) वतीने

 

२० फेब्रुवारी, शुक्रवारपासून सुरू होणार आहे. हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सईद मिर्झा, अमोल पालेकर, तसेच दिग्दर्शक तारीक मसूद, अबू सईद, तन्वीर मुकम्मिल, पार्वथी बौल आणि सौनक चक्रवर्ती यांचीही उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन वेळी तपन सिन्हा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवांतर्गत उपस्थित दिग्दर्शक, फिल्ममेकर यांचे गाजलेले चित्रपट, तसेच माहितीपटही दाखविण्यात येणार आहेत. मसूद (मातीर मोईना), सईद (निरोंतर), मुकम्मिल (चित्रा नादीर पारे), शमीम अख्तर (इतिहास कोन्या) या चित्रपटांचा समावेश आहे. त्यानंतर संबंधित दिग्दर्शकांसह याबाबत संवाद साधला जाणार आहे. मुकम्मिल यांचा ‘स्वप्नभूमी’, मसूद यांचा ‘मुक्तीर गान’ हा माहितीपटही दाखविण्यात येईल, अशी माहिती फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन ऑफ इंडियाचे संचालक पंकज राग आणि फिल्म डायरेक्शनच्या बाह्य़विभागाच्या गायत्री चटर्जी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात बांगलादेशच्या राजकीय, सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या महोत्सवात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांसह सर्वाना प्रवेश खुला आहे. बहुधा हा देशातील बांगलादेशी चित्रपटांचा पहिलाच महोत्सव असावा, असा अंदाज राग यांनी या वेळी वर्तविला.
अभ्यासक्रमांचा आढावा घेणार
एफटीआयआय मार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचा येत्या दोन महिन्यांत नव्याने आढावा घेण्यात येणार आहे. प्रामुख्याने एडिटिंग, डायरेकशन, अॅनिमेशन या अभ्यासक्रमांचा प्रामुख्याने त्यात समावेश असेल. त्यानंतर नवी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत विचार क रू, असेही संचालक पंकज राग यांनी एका प्रश्नास उत्तर देताना विचारले.