Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘तुकाराम महाराजांच्या विचारांचा ठसा टिकून’
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा ठसा चार शतके झाली तरी टिकून असून, तो सतत वाढत आहे. ही ऐतिहासिक गोष्ट आहे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे

 

व्यक्त केले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्म चतु:शताब्दीनिमित्त शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालयातर्फे प्रकाशित केलेल्या ‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज स्मारक ग्रंथाचे’ प्रकाशन क्षेत्र देहू संस्थानचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉ. मोरे बोलत होते.
याप्रसंगी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, ग्रंथाच्या संपादिका शैलजा मोळक, महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, सुधीर पिंगळे, डॉ. सुरेश गरसोळे, नगरसेविका अलका खाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, की ललित साहित्य हे कल्पनेवर आधारित असल्यामुळे त्या साहित्याला कोणत्याही प्रकारचा आधार नसतो.
त्यामुळे लेखकाला कितीही विचार लेखन स्वातंत्र्य असले तरी लेखकाने लिखाण करताना स्वत:वर अंकुश ठेवूनच लिखाण करावे.
बापूसाहेब मोरे म्हणाले, काळाजी गरज लक्षात घेता आजही संतांच्या विचारांची समाजाला गरज असून, त्याशिवाय शांततामय जीवन जगता येणार नाही. २६/११ सारख्या घटना टाळण्यासाठी संतांच्या विचारांची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलजा मोळक यांनी केले.