Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. विजय साठे यांच्या बंदिशींनी रसिक मंत्रमुग्ध
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

गायक डॉ. विजय साठे यांनी आपल्या खास शैलीत राग अहिर भैरव, भैरवी रागातील ‘हरिको हरीने देखा..’ ही बंदिश, अभोगी रागातील संत कबीरांचे ‘मत कर मोह..’ हे भजन तर बडा ख्याल व छोटा

 

ख्यालमधील ‘आज तो आनंद..’ अशा बंदिशी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले.
निमित्त होते अभिजात कला निकेतन संस्थेतर्फे आयोजित ५०५ व्या कार्यक्रमाचे. साठे यांनी बहारदार बंदिशी गाऊन रसिकांना खिळवून ठेवले. या वेळी ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम उपस्थित होते.
शास्त्रोक्त संगीताच्या या मैफलीत साठे यांनी हवेली संगीताचे पारंपरिक भजन ‘लाल गोपाल..’ व नटभैरव रागात ‘चलिये मुलख सुल्तान..’ व ‘देहू विचारे सगुणा..’ अशी पदे आकर्षकरीत्या सादर केली. त्यांनी गायनाची सांगता ‘पंढरीच्या दारी..’ हे भजन सादर करून केली. या वेळी त्यांना तबल्यावर संजय देशपांडे व हार्मोनियमवर चिन्मय कोल्हटकर यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा रहाणे यांनी केले. संस्थेच्या वतीने येत्या २२ फेब्रुवारी रोजी भरत नाटय़ मंदिर येथे रतीश तागडे यांचे व्हायोलिन व गौरी पाठारे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी महापौर राजलक्ष्मी भोसले उपस्थित राहणार आहेत.