Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

लहुजी वस्ताद यांचे स्मारक संगमवाडी येथे उभारण्याचा निर्णय
पुणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची संगमवाडी येथील समाधी उद्ध्वस्त करण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला असून याच जागेवर लहुजी वस्तादांचे भव्य स्मारक उभारण्याचा ठराव

 

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत आज तातडीने मंजूर करण्यात आला.
संगमवाडी सर्वेक्षण क्र. ५४ येथे एका बिल्डरने सुरू केलेल्या बांधकामात लहुजी वस्ताद यांची त्या जागेत असलेली समाधी उद्ध्वस्त करण्याचा प्रकार मंगळवारी घडला. एका थोर पुरुषाच्या समाधीस्थळाची ही विटंबना निषेधार्ह असून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आज केली.
दरम्यान, संगमवाडी येथील सध्याच्या जागेपैकी एक एकर जागा मालकाकडून ताब्यात घेऊन त्या जागेवर लहुजी वस्ताद यांचे भव्य स्मारक उभारण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव तातडीची बाब म्हणून उद्या (बुधवार) मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. स्मारकासाठी भूसंपदानाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असाही आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षातर्फे आमदार गिरीश बापट, तसेच योगेश गोगावले, अण्णा जोशी, विश्वास गांगुर्डे, अनिल शिरोळे, प्रा. विकास मठकरी, उज्ज्वल केसकर व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना आज निवेदन दिले.
संबंधित स्थानावर ज्या बांधकाम व्यावसायिकाने समाधीची मोडतोड केली त्याच्या सर्व कामांना स्थगिती द्यावी, या जागेवर महापालिकेने भव्य स्मारक बांधावे आणि संबंधित बिल्डर नदीपात्रात राडारोडा टाकून पात्र बुजवत आहे, त्या प्रकाराबाबतही कठोर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.
लोकजनशक्ती पार्टीचीही तातडीची बैठक होऊन तीत संबंधित बिल्डरचा तीव्र निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी अशोक कांबळे होते. राम रेड्डी, विनोद चव्हाण, पप्पू पडवळ, बबन कांबळे, दीपक पिल्ले, उत्तम बनसोडे यांची यावेळी भाषणे झाली. या जागेवर लहुजींचे भव्य स्मारक व पुतळा उभारावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सामाजिक समरसता मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात गंज पेठ येथील लहुजी वस्ताद तालमीत लहुजी वस्तादांना अभिवादन करण्यात आले. राम तोरकडी, विशाल मनेरे, सुनील भंडगे, विजयराव कापरे, रवी ननावरे, नंदकुमार राऊत, प्रदीप चव्हाण, तालमीचे व्यवस्थापक किसनराव जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.