Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

‘थरमॅक्स’मध्ये २९ लाखांचा घोटाळा ; दोघे पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

चिंचवड येथील थरमॅक्स कंपनीत माजी खरेदी विभाग प्रमुख व सुरक्षा रक्षक यांनी संगनमताने बनावट आदेशाद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या चिंचवड शाखेचे प्रमुख अनंत गोपाळ क्षीरसागर (वय ४८, रा. ईशानी गार्डन रो हाऊस नं.१,सेक्टर २९ प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आचारसंहितेच्या शक्यतेने कार्यक्रमांची घाई
पिंपरी, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बहुचर्चित योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याचा निर्णय सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार संपूर्ण दिवसभर पिंपरी-चिंचवडमध्ये तळ ठोकून राहणार आहेत.

जीवनदायी आणि माणुसकीशून्यही!
मुस्तफा आतार, पुणे, १७ फेब्रुवारी

रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रात्री-अपरात्री धडपडणारी.. डॉक्टरांबरोबर, किंबहुना त्यांच्या आधीच शुश्रूषेसाठी सज्ज असणारी.. रात्रपाळीला बारा वाजता जेवताना रुग्णाच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून पळत सुटणारी सिस्टर अर्थात परिचारिकाच रुग्णांसाठी बहुतांशवेळा ‘जीवनदायिनी’ ठरते.. पण काही वेळा तिचे दुर्लक्ष आणि माणुसकीशून्य वागणुकीचा फटकाही रुग्णाला बसून त्याला जीव गमवावा लागतो.

‘गाव तसं चांगलं’ पण वेशीला टांगल्याचा प्रकार
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटाचे निर्माते आनंद डावरे व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अ. भा. चित्रपट महामंडळाकडे परस्परांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार केली आहे. या जाहीर मतभेदांमुळे ‘गाव तसं चांगलं’पण वेशीला टांगलं असा प्रकार घडला आहे. निर्माते आनंद डावरे यांनी या संदर्भात दिग्दर्शक टिळेकर यांच्याविरोधात तक्रार करताना म्हटले आहे की, ‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक व समन्वयक म्हणून टिळेकर यांच्यावर जबाबदारी सोपविली होती.परंतु ठरलेल्या व्यवहारानुसार त्यांनी आपली कोणतीही जबाबदारी पूर्ण केली नाही.

गुंड फिरोज बंगालीविरुद्ध आणखी एक गुन्हा
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

जागामालकांना जीवे मारण्याची धमकी देऊन कोंढव्यातील कोटय़वधी रुपयांची मालमत्ता बळकावल्याप्रकरणी गुंड फिरोज रहीम बंगाली याच्याविरुद्ध पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला. यापूर्वी बंगाली याच्याविरुद्ध अशाचप्रकारचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सय्यद सरहान साबीर (वय २४, रा. घोरपडे पेठ) यांनी याबाबत कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून बंगाली याच्यासह त्याच्या चार नातेवाईकांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोंढवा खुर्द येथे सव्र्हे क्रमांक ५०/१/६/१ येथे चार गुंठे जागेवर साबीर यांच्या वडिलांनी महापालिकेच्या परवानगीने २००६ मध्ये ‘ग्रॅनडा पॅलेस’ ही इमारत बांधली होती. फिरोज बंगाली याचा नातेवाईक मुबारक शेख याने त्यातील सदनिका क्रमांक सहा, शाबीर खान याने सदनिका क्रमांक सात व आठ, मोईज शेख व सादीक पटेल याने सदनिका क्रमांक दोन व चार जबरदस्तीने बळकाविल्या होत्या. कोणताही करार न करता बंगाली याने बळकावलेल्या या सदनिकांचे भाडेकरार करण्याबाबत साबीर यांनी सुचविले असता, त्यांना बंगाली याने जीवे मारण्याची धमकी दिली होती.

‘द्वारिका’तर्फे २२ फेब्रुवारीला डॉक्टरांसाठी कार्यशाळा
पुणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

द्वारिका संगमनेरकर फाऊंडेशनतर्फे येत्या २२ फेब्रुवारी रोजी सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूटच्या विश्वभवन सभागृहात प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि जनरल प्रॅक्टिशनर्स यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, कार्यशाळेचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे. फाऊंडेशनचे संचालक अरविंद संगमनेरकर यांनी ही माहिती दिली. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली जाते. त्यात डॉ. शरद मुतालिक, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. सुहास प्रभू यांचा प्रमुख सहभाग असेल. यादिवशी सायंकाळी ७ ते १० या वेळेत अवधूत गुप्ते आणि वैशाली सावंत यांचा मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी डॉ. संगमनेरकर यांना ०२०-२४५३२५५५ येथे संपर्क साधावा.

‘सरहद’तर्फे दहशतग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख भारताची’ उपक्रम
पुणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सरहद संस्थेतर्फे काश्मीर खोऱ्याच्या सीमेवर असलेल्या दहशतग्रस्त गावांमधील सात ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख भारताची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक संजय नहार यांनी दिली. दहशतग्रस्त गावातील मुलांना देशवासीयांशी असलेले नाते दृढ व्हावे यासाठी आठ वर्षांपासून संस्था हा उपक्रम राबवते. यावर्षी काश्मीर खोऱ्यातील ५० अनाथ विद्यार्थी १७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पुणेभेटीवर येत आहेत. त्यांना येथील जीवनपद्धती समजण्यासाठी विविध कुटुंबांमध्ये चार दिवस ठेवण्याची कल्पना आहे. तसेच विविध शाळा, सायन्स सेंटर्स, लाल किल्ला व कलाकारांची भेट आयोजित केली आहे. उपक्रमात सहभागी होण्यास इच्छूक शाळा व कुटुंबांनी ९८५०९१४३९३ किंवा ०२०-२४३६८६२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

शुभम् साहित्याच्या वतीने महोत्सवी पुस्तक प्रदर्शन
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

शुभम् साहित्याच्या वतीने २५१ वे महोत्सवी पुस्तक प्रदर्शन आचार्य अत्रे सभागृहात नुकतेच सुरू झाले आहे. संस्थेने आपल्या परंपरेनुसार या प्रदर्शनाची आकर्षक मांडणी केली आहे. पुस्तक प्रदर्शनात एका वेळी जुनी व नवीन पुस्तके आपणास पाहावयास मिळत असून यामध्ये अनेक लोकप्रिय लेखक, प्रकाशन संस्था, विविध विषयांनुसार आपल्याला जी हवी ती पुस्तके नेमकेपणाने मिळण्यासाठी स्वतंत्र अशी वेगवेगळी दालने सुबकरीत्या मांडलेली येथे पाहण्यास मिळत आहेत. पॉकेटबुक, पेपरबुक हेही या प्रदर्शनात उपलब्ध आहे. या प्रदर्शनात खरेदीनुसार १० ते २० टक्के सवलत उपलब्ध आहे. २५ टक्के सवलतीचे स्वतंत्र दालनही आपल्याला खरेदीला उद्युक्त करेल. एप्रिल अखेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी ९.३० ते रा. ९.०० वाजेपर्यंत खुले राहील.

पत्रकारांसाठी शोधनिबंध स्पर्धा
पुणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार श्रीधर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’तर्फे पुण्यातील पत्रकारांसाठी ‘शोधनिबंध स्पर्धा-२००८’ आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी जागतिक मंदी आणि भारत, दहशतवाद : जगापुढे उग्र आव्हान, महिला सबलीकरण : उपेक्षा आणि वास्तव या विषयांचा समावेश असून, शोधनिबंध इंग्रजी किंवा मराठीत २५०० शब्दांत लिहिता येतील. आवश्यक कात्रणे, छायाचित्रे, आकडेवारी जोडता येईल. प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये, द्वितिय ३ हजार, तृतीय २ हजार, तर तीन उत्तेजनार्थ प्रत्येकी १ हजार रुपये असतील. शोधनिबंध १५ मार्चपूर्वी पत्रकार भवन, नवी पेठ येथे सादर करावेत, अथवा २४५३४१९०, २४५३०२१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाऊसाहेब चासकर यांना ‘श्रीगमा कृतिशीलता पुरस्कार’
पुणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘माणूस प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणारा ‘श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार’ यंदा अहमदनगर जिल्ह्य़ातील पत्रकार भाऊसाहेब चासकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्या स्मृतिदिनी २० फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार दिला जातो. रोख ११ हजार रुपये व सन्मानपत्र असे स्वरूप असते. विकासात्मक पत्रकारितेत सातत्याने लिखाण करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. आदिवासी, शेतकरी यांचे प्रश्न, तसेच धरणग्रस्त लोकांचे पुनर्वसन या विषयांचा चासकर गेली १२ वर्षे आपल्या लेखनातून पाठपुरावा करीत असून, त्यांचे प्रश्न तडीस नेण्याचा नेटाने प्रयत्न करीत आहेत. ते स्वत: उत्तम छायाचित्रकार आहेत आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये पर्यावरण साक्षरतेबाबत प्रसारही ते हिरीरीने करीत असतात. प्रतिष्ठानकडे असणाऱ्या शलाका सोमण यांच्या ठेवीतून दिली जाणारी शिष्यवृत्ती यंदा अश्विनी कांबळे या पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला जाहीर केली आहे.

भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. दामले यांचे निधन
पुणे, १७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रज्ञानंद शंकर दामले (वय ७६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. डॉ. दामले हे १९८४ ते ८७ या कालावधीमध्ये विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांनी भौतिकशास्त्र व जैवभौतिकशास्त्र अशा दोन विषयांमध्ये पीएच.डी. प्राप्त केली होती. विद्यापीठामध्ये जैवभौतिकशास्त्र शाखा सुरू करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्याच प्रयत्नामुळे या शाखेच्या अध्यापन-संशोधनाचा प्रसार झाला. विद्यापीठ वर्तुळामध्ये ते भाऊ या नावाने विद्यार्थिप्रिय होते. डॉ. दामले यांनी निसर्गोपचाराचा विशेष अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीत, निसर्ग छायाचित्रण अशा विषयांमध्येही त्यांना रस होता. ‘भौतिकशास्त्राचा थोर अभ्यासक व विद्यार्थिप्रिय शिक्षकास आपण पारखे झालो आहोत,’ अशा भावना व्यक्त करीत विभागाच्या वतीने डॉ. दामले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिवनेरीवर बंदी घातल्यास ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा
पुणे, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना १८ व १९ फेब्रुवरी रोजी शिवनेरी किल्ल्यावर जाण्यास शासनाने मनाई केल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विलास पासलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. सुरक्षेच्या कारणास्तव १८ व १९ फेब्रुवारी रोजी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना जुन्नर तालुका बंदीचा शासकीय आदेश धुडकावून ठरल्याप्रमाणे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारतील, असे त्यांनी सांगितले.

मुलाला गंभीर जखमी करणाऱ्या मोटारचालकास कैद
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या पाच वर्षांच्या मुलास गंभीर जखमी करणाऱ्या तरुणास सहा महिन्यांच्या कैदेची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ज्योती पूरकर यांनी शिक्षा सुनावली. तसेच जखमी मुलास नुकसानभरपाई म्हणून वीस हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. नवनाथ मनोहर नगदे (वय २९, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुनील सुदामा शर्मा (वय २०, रा. रामनगर, वडगावशेरी) यांनी ही तक्रार दिली. ही घटना एक ऑक्टोबर २००६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. ऋतिक हा शर्मा यांच्या भावाचा मुलगा आहे. तो घराबाहेर उभा होता. त्यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या इंडिका कारमधील चालक नगदे याने वाहनांच्या नियमाकडे दुर्लक्ष केले आणि मुलास धडक दिली. त्यात हा मुलगा जबर जखमी झाला. सहायक सरकारी वकील अॅड. शिल्पा महातेकर यांनी सात साक्षीदार तपासले.