Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगल्या’चा प्रकार
चित्रपट निर्माते-दिग्दर्शकाच्या परस्परविरोधी तक्रारी
पुणे, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटाचे निर्माते आनंद डावरे व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अ. भा. चित्रपट महामंडळाकडे परस्परांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार केली आहे. या जाहीर मतभेदांमुळे ‘गाव तसं चांगलं’पण वेशीला टांगलं असा प्रकार घडला आहे.
निर्माते आनंद डावरे यांनी या संदर्भात दिग्दर्शक टिळेकर यांच्याविरोधात तक्रार करताना म्हटले आहे की, ‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक व समन्वयक म्हणून टिळेकर यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. परंतु ठरलेल्या व्यवहारानुसार त्यांनी आपली कोणतीही जबाबदारी पूर्ण केली नाही. हा चित्रपट प्रारंभीच ‘सिनेमास्कोप’ करण्याचे ठरले होते. परंतु श्री. टिळेकर यांनी तो सिनेमास्कोप न करता ३५ एम. एम. मध्येच केला व त्याला कोणतेही कारण दिले नाही. तसेच त्यांनी, कलावंतांचे मानधन व इतर खर्चाच्या रकमेचा हिशोब आजपर्यंत दिलेला नाही. या शिवाय टिळेकर यांनी पुणे तसेच मुंबईत झालेल्या चित्रपटाच्या ‘प्रीमिअर’च्या वेळी प्रमुख कलावंतांना, प्रसिद्धीचे कारण देऊन ‘प्रीमिअर खेळा’वर बहिष्कार घालण्यास भाग पाडले. या संदर्भात अ. भा. चित्रपट महामंडळाने श्री. टिळेकर यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही डावरे यांनी केली आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना निर्माते आनंद डावरे यांच्या आरोपाचे खंडन केले. ते म्हणाले की, श्री. डावरे हे सांगली जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांना आमदारकी मिळविण्यासाठी प्रसिद्धी हवी होती म्हणून त्यांनी मला हाताशी धरून हा चित्रपट निर्माण करण्याचा घाट घातला. चित्रपटनिर्मितीमध्ये मला पूर्ण स्वातंत्र्य हवे असे मी त्यांना सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात चित्रीकरण सुरू झाल्यानंतर डावरे यांनी कामात ढवळाढवळ करायला सुरुवात केली व माझ्या काही नातेवाइकांना चित्रपटात भूमिका द्या, अशी त्यांनी मागणी केली. मात्र मी ती पूर्ण केली नाही. चित्रपट ग्रामीण असल्यामुळे त्याला ‘सिनेमास्कोप’ करण्याची गरज नाही असे मी त्यांना प्रारंभीच सांगितले होते, असा दावा टिळेकर यांनी केला. तसेच निर्माते म्हणून त्यांनी ठरलेल्या मुदतीत कधीच वेळेवर पैसे दिले नाहीत. अभिनेत्री कांती रेडकर, देबू देवधर आदी कलावंतांचे मानधन त्यांनी रखडविले असाही आरोप टिळेकर यांनी केला. चित्रपटावर खर्च झालेल्या रकमेपैकी ३५ टक्के रक्कम येणे बाकी आहे व आतापर्यंत झालेल्या सर्व खर्चाचा पूर्ण हिशोब मी त्यांच्याकडे दिला आहे, असेही ते म्हणाले. सेन्सॉरच्या प्रमाणपत्रासाठी दिग्दर्शकाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी माझ्या खोटय़ा सहीचा वापर केला, असाही आरोप टिळेकर यांनी केला आहे. वरील निर्माते-दिग्दर्शकाच्या परस्परविरोधातील तक्रारीबाबत आता अ. भा. चित्रपट महामंडळ कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.