Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

दिल्लीवरील चढाईसाठी राष्ट्रवादीकरवी नाशिकच्या रणांगणाची निवड
नाशिक, १७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिल्लीवर चढाई करतानाच पंतप्रधानपद काबीज करता यावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या रणांगणाची निवड केली आहे. त्यासाठी एक मार्च हा मुहूर्त पक्षश्रेष्ठींनी मुक्रर केला असून याच दिवशी दोन लाखाहून अधिक समर्थकांना एकत्रित करणे व त्यांच्या साक्षीने निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचेही निर्धारित झाले आहे. पक्षाच्या या महाअधिवेशनाचे नेपथ्य, दिवसभरातील कामकाजाची आखणी, राजकीय ठरावांचे स्वरुप, जंगी जाहिरसभा आणि एकूणच पक्ष प्रतिमेला साजेसे हे अधिवेशन भारदस्त व्हावे म्हणून त्याचे दायित्व भुजबळ काका-पुतण्याकडे सोपविण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी नाशिकची निवड होण्यामागे या जागेचे स्थानमहात्म्य कारणीभूत आहे. शिवसेनेचे अधिवेशन १९९५ मध्ये येथे झाले अन् या पक्षाला सत्तेची कवाडे खुली झाली. विधानसभेवर भगवा फडकविण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्नही याच नगरीतून निघालेल्या वाटेवरून पूर्ण होवू शकले होते. भारतीय जनता पक्षाचेही एक अधिवेशन येथे झाले अन् ‘शत् प्रतिशत् भाजप’ ही घोषणाही दिली गेली. या अधिवेशनाच्या निमित्ताने तेव्हा देशातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरचे भव्य अधिवेशन देखील येथे होवून घडय़ाळाच्या काटय़ांना गती देण्यात आली होती. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये हातखंडा असलेल्या भुजबळ काका-पुतण्यानेही त्यावेळी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. अशारितीने राष्ट्रवादीसह जवळपास सर्वच राजकीय पक्षांची कसोटी पाहणारे नाशिकचे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान अर्थात गोल्फ क्लब हे एकाअर्थाने नाशिकचे रणांगण. आतापर्यंत याच रणांगणावरून काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नव्याने उदयाला आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेत्यांच्या गोल्फ क्लब मैदानावर सभा झाल्या आहेत.नाशिक जिल्हा हा तसा शरद पवारांचा पर्यायाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. एकेकाळी याच नाशिक जिल्ह्य़ाने पवारांच्या पदरात जिल्ह्य़ातील चौदाच्या चौदा आमदार एकगठ्ठा टाकल्याचा इतिहास आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता आणि पंतप्रधानपदापर्यंत मजल मारायची असेल तर नाशिकचेच स्थानमहात्म्य उपयोगी ठरू शकते अशी पक्षश्रेष्ठींची श्रद्धा आहे. त्यानुसार पूर्वतयारीची पहिली बैठक आजच भुजबळ नॉलेज सिटीमध्ये पार पडली. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अधिवेशनाच्या तयारीबाबत आढावा घेतला. बैठकीला जिल्ह्य़ातून सुमारे ८०० प्रमुख पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अधिवेशनाचे यजमानपद नाशिककडे असल्याने त्यात कोणतीही कसूर ठेवायची नाही असा निषय यावेळी समीर भुजबळांनी केला. तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करतानाच जाहीर सभेला मोठय़ा संख्येने समर्थक आणायचे असेही ठरले. या सर्व नियोजनासाठी वाहतूक समिती, भोजन समितीसह वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचे वाटपही झाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, पक्षाचे खजिनदार आ. हेमंत टकले आदि उपस्थित होते.