Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

आयुर्वेदीय औषधे व वनस्पतींवरचे पेटंटचे गंडांतर दूर
भारतीय पारंपरिक ज्ञानाला टी.के.डी.एल.चे संरक्षण कवच
नाशिक, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

त्रिभुवनकीर्ति, त्रिफला चूर्ण अशा आयुर्वेदीक औषधांसह आवळा, हिरडा, बेहडा, सुंठ, शतावरी, अश्वगंधा, कडूनिंब आदि वनस्पतींवर येऊ घातलेले पेटंटचे गंडांतर ट्रेडिशनल नॉलेज डिजीटल लायब्ररीद्वारा (टी.के.डी.एल.) भारताने युरोपिअन पेटंट कार्यालयाशी नुकत्याच केलेल्या करारामुळे टळले असून त्याबद्दल आयुर्वेद क्षेत्राने समाधानाचा सुस्कारा टाकला आहे. या करारामुळे आता कुठलाही देश अथवा कंपनी टी.के.डी.एल. मध्ये वर्णन केलेल्या वनस्पतीचे अथवा औषधाचे पेटंट घेऊ शकणार नाही. परिणामी, आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी या भारतीय वैद्यक शास्त्राची औषधे मक्तेदारीपासून मुक्त राहणार आहेत.जागतिकीकरण आणि बदलत्या पेटंट कायद्याच्या पाश्र्वभूमीवर पाषात्य देशांमध्ये भारतीय वैद्यक शास्त्राशी संबंधित वनस्पतींची पेटंट घेण्याचा सपाटा लागला होता. मध्यंतरी डॉ. रघुनाथ माशेलकरांनी हळदीचे पेटंट रद्द व्हावे म्हणून केलेली लढाई सर्वज्ञात आहे. या अनुभवानंतर केंद्रातील तत्कालीन भाजप-आघाडी सरकारने टी.के.डी.एल. प्रकल्पाला चालना दिली होती. नुकताच हा प्रकल्प पूर्ण झाला असून पाठोपाठ भारताने त्याद्वारे या प्रकल्पातील पारंपरिक ज्ञानाची माहिती युरोपिअन पेटंट कार्यालयाला दिली असून त्याबाबत महत्त्वपूर्ण करारही केला आहे. पारंपरिक ज्ञानाच्या या टी.के.डी.एल. प्रकल्पात सुमारे ३६,००० श्र्लोकांचे इंग्रजीसह जपानी, फ्रेंच, स्पॅनिश व जर्मन या पाच परकीय भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. सुमारे २० आयुर्वेदीय ग्रंथांमधून निवडण्यात आले आहेत. यामध्ये त्रिभुवनकीर्ति, त्रिफळा चूर्ण, आरोग्य वर्धिनी, कमारी आसव अशी अनेक औषधे व त्यांचे गुणधर्म दिले असून अनेकविध वनस्पतींबाबतची माहितीही देण्यात आली आहे.माहितीचा हा खजिना तयार करण्यासाठी आयुर्वेद तसेच संगणक क्षेत्रातील तज्ज्ञांना सुमारे आठ वर्षांचा कालावधी लागला. पारंपरिक ज्ञानाचा समावेश असलेल्या भारतीय बौद्धिक संपदेचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या टी.के.डी.एल. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात डॉ. माशेलकर हेच सरसंचालक होते. तेव्हा सुरू झालेल्या या प्रकल्पाला आता चांगला आकार आला असला तरी अद्याप ग्रामीण व आदिवासी भागात असलेले अशा प्रकारचे बरेच ज्ञान संकलित होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. आयुर्वेद व्यासपीठ आणि वनवासी कल्याण आश्रम यांनी काही काळापूर्वी वनौषधींसदर्भात आवारी गुरूजी यांचे ‘औषधे रानावनातली’ हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. त्या संदर्भात एक चित्रफितही बनविण्यात आली असून अशी अनेक कामे सुरू असल्याची माहिती आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य विजय कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या संदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८२२०-७५०२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.