Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

भ्रष्ट राजकारण्यांना गाडून टाका - नाना पाटेकर
कोल्हापूर,१७ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

 

काल निवडून आलेले राजकारणी थोडय़ाच काळात कसे करोडपती होतात, त्यांच्याकडे एवढा पैसा कसा येतो, याचा जाब जोपर्यंत आपण विचारणार नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार सुरूच राहिल. यासाठी पक्षाला मत न देता चांगली व्यक्ती पाहून मत द्या आणि भ्रष्ट राजकारण्यांना गाडून टाका, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे केले.प्रत्येक गोष्टीत आज टक्का घेतला जातो. अधिकारी व राजकारणी मिळून भ्रष्टाचार करतात आणि आम्ही त्यांना साधा जाबही विचारत नाही. मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात आपले कर्तव्य जबावताना शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटे श्रद्धांजली वाहिली की आपले काम संपले का, असा सवाल उपस्थित करून त्यांनी काय म्हणून आपले प्राण दिले असा प्रश्न मला पडतो, असे उद्गार नाना पाटेकर यांनी काढताच कोल्हापूरच्या बिंदू चौकात जमा झालेले शेकडो नागरिक हेलावून गेले. देश हाच धर्म माना. आपला धर्म घरातच ठेवा. जर असे आपण वागलो नाही तर बाहेरून येथे कोणी येण्याची गरजच नाही , अशी जाणीवही नानाने उपस्थितांना करून दिली. माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या ‘केंट क्लब हिल रिसॉर्ट’च्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांच्य स्मृत्यर्थ शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृती चषक व सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘केंट क्लब हिल रिसॉर्टने’ जमा केलेला आठ लाख रुपयांचा धनादेश नाना पाटेकर यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला शहीद विजय साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर, एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचे बंधू शिरीष करकरे, दिग्विजय खानविलकर, जयसिंगराव मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, आमच्याकडे
प्रत्येक गोष्टीसाठी मरावे लागते त्यानंतरच अशोकचक्र मिळते. प्रत्येकाला शिवाजी हवा आहे पण तो शेजारच्या घरी हवा आहे. आपले कर्तव्य व आपला धर्म आपण आज विसरलो आहोत. प्रत्येकाने जात,पात आणि धर्म घरी ठेवून देश हाच धर्म मानला पाहिजे. पूर्वी शेजारधर्म होता आता शेजारी कोण राहतो हेही आपल्याला माहित नसते, असे सांगून बाहेरच्या १०० अतिरेक्यांपेक्षा एका घरभेद्याचा धोका जास्त असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. पोलीस कोठेपर्यंत पूरे पडणार असा सवाल करून आपले डोळे उघडे ठेवून आपण जबाबदारी पार पाडणे हीच खरी शहीदांना श्रद्धांजली ठरेल असे नाना पाटेकर म्हणाले.देशभक्तीचे बिज पुढल्या पिढय़ांमध्ये रुजविण्यासाठी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि ओंबळे या शहीदांच्या नावाने स्मृती चषक देण्याचा निर्णय घेतल्याचे दिग्विजय खानविलकर यांनी सांगितले. मुंबईवरील हल्ला हा देशावरील हल्ला होता. भविष्यात असे हल्ले होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरुक राहणे आवश्यक आहे. भविष्यातील पिढीला या शहिदांच्या त्यागाची व त्यांनी केलेल्या बलीदानाची आठवण राहावी यासाठीच कोल्हापूरकरांच्यावतीने शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी पाच वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व सुवर्ण पदक देऊन सन्मान करण्याची ही योजना असल्याचे खानविलकर म्हणाले. दहशतवादविरोधी लढा यापुढेही बराचकाळ लढावा लागेल, असे स्मिता साळसकर यांनी यावेळी सांगितले. मुंबईवर अतिरेक्यांनी केलेला हल्ला तुम्ही विसरू नका असे सांगून हल्ला होण्यामागच्या कारणाविरोधात लढा जारी ठवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर दहशतवादाला जात नसते असे सांगून एटीएसचे प्रमुख म्हणून नव्हे तर लहानपणापासून हाती घेतलेल्या प्रत्येक कामात हेमंत करकरे यांनी आपला ठसा उमटवला होता, असे त्यांचे बंधू शिरीष करकरे यांनी सांगितले. देशाच्या सार्वभौमत्वावर झालेल्या या हल्ल्यात शेकडो निरपराध नागरिकही मारले गेले असे सांगून यापुढे तरी आपण सावध राहिले पाहिजे कारण फुटणारा बॉम्ब हा माणूस गरीब आहे का श्रीमंत आहे आणि त्याची जात काय आहे याचा विचार करत नसतो शिरीष करकरे यांनी सांगितले. हेमंत करकरे यांना वाचनाची व अभ्यासाची प्रचंड आवड होती. ते अमेरिकेला गेले होते त्यावेळी हावर्ड विद्यापीठातून गणित अथवा दहशतवाद या विषयावर पीएचडी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचे करकरे यांनी सांगितले.