Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

पनवेलमध्ये निनादणार संघशक्तीचा जय‘घोष’!
पनवेल, १७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान पनवेलमधील कर्नाळा क्रीडासंकुलामध्ये भव्य राष्ट्र रक्षा निनाद घोष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. संघाचे किमान एक हजार स्वयंसेवक या शिबिरात सहभागी होणार असून, प्रसिद्ध गायक व संगीतकार श्रीधर फडके शिबिराधिकारी या नात्याने उपस्थित राहणार आहेत. संघाचे कोकण प्रांत प्रचारप्रमुख प्रमोद बापट व कुलाबा जिल्हा संघचालक नंदा ओझे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
देशातील सर्वात मोठे अशासकीय घोषपथक संघाचे आहे. मुंबईवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर समाजात संघटित शक्ती उभी राहावी, या हेतूने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोकण प्रांतात प्रथमच होणाऱ्या या शिबिरात संघाची माहिती देणारे प्रदर्शन, वेगवेगळ्या वाद्यांचे चित्रप्रदर्शन व महिला संमेलन होणार आहे.
२१ फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता आमदार विवेक पाटील या शिबिराचे उद्घाटन करणार आहेत. २२ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता प्रकट कार्यक्रम होणार असून, या संमेलनाला वीरपत्नी स्मिता साळसकर व हेमंत करकरे यांचे बंधू शिरीष करकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी संघाचे सहसरकार्यवाह भय्याजी जोशी मार्गदर्शन करणार आहेत. २३ फेब्रुवारीला सकाळी नवीन पनवेल व खारघर येथे स्वतंत्र पथसंचलने काढण्यात येणार आहेत.
पूर्वी लष्करी बँडवर पाश्चात्य संगीतरचना वाजविण्याची पद्धत रूढ होती. संघाने मात्र यात भारतीय रागसंगीत वापरता येईल का, याचा विचार केला व त्यादृष्टीने प्रथम हरी विनायक दाते व नंतर सुधीर फडके यांनी अनेक रागांवर आधारित रचना करून दिल्या. यातील काही रचना आता भारतीय लष्करातही वाजविल्या जातात, असे बापट यांनी सांगितले.
बाबुजींचा तो वारसा आता श्रीधर फडके चालवीत असून, पनवेलमध्ये होणाऱ्या या शिबिरासाठी त्यांनी एक नवी रचना केली आहे, अशी माहितीही त्यांनीच दिली.