Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘घर तेथे शौचालय’ योजनेसाठी लाभार्थींना आवाहन
खोपोली, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

राज्याचा संपूर्ण नागरी भाग २०११ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. तद्नुषंगाने केंद्र शासन पुरस्कृत कमी खर्चाचे वैयक्तिक शौचकूप बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. ‘घर तेथे शौचालय’ या तत्त्वावर नागरी भागातील आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांसाठी प्राधान्याने पुरस्कृत केलेली ही योजना आहे, अशी माहिती खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी दिली. दारिद्रय़रेषेखालील यादीत समाविष्ट असलेले कुटुंब अथवा ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न ३३०० रुपये अथवा वार्षिक उत्पन्न ३९ हजार ६०० पेक्षा कमी आहे व जे कुटुंब वैयक्तिक शौचकूप बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यास तयार आहे, अशा कुटुंबाचीच या योजनेत लाभार्थी म्हणून गणना होणार आहे. निर्धारित केलेल्या वित्तीय आकृतीबंधानुसार लाभार्थी कुटुंबांना एका शौचालयासाठी नाममात्र एक हजार रुपये रक्कम अदा करावी लागणार आहे. रक्कम भरणे शक्य नसल्यास श्रमदानाने हा हिस्सा अदा करण्याची सवलत या योजनेत देण्यात आली आहे. शासनाने प्रती शौचकुपाचा खर्च १० हजार रुपये अपेक्षित धरून कमाल अनुदान नऊ हजार देण्याचे घोषित केले आहे. शासकीय अनुदान सोडून उर्वरित वाढीव खर्च लाभार्थींनाच करावा लागणार आहे, असा खुलासा डॉ. जगताप यांनी पुढे बोलताना केला.
खोपोली नगर परिषद हद्दीतील, सार्वजनिक शौचालयाचा वापर करणारे सुमारी दोन हजार कुटुंबे असून, त्यांची लोकसंख्या सुमारे २० हजारांच्या घरात आहे. या कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यादृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.