Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

आदिवासींच्या मागण्यांसाठी माकपचे यशस्वी आंदोलन
डहाणू, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

मार्क्सवादी कम्युनिस्टपक्षातर्फे आदिवासीच्या विविध मागण्यासाठी डहाणू उपविभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. डहाणू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आमदार राजाराम ओझरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून आदिवासींच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करून ठिय्या आंदोलन दिवसभर करण्यात आले. यात एडवर्थ वरठा, धनगर आदी सुमारे दोन हजार आदिवासी स्त्री-पुरुष सामील झाले होते. मोर्चातर्फे देण्यात आलेले निवेदन तहसीलदार सुकेशिनी पगारे, शिरस्तेदार मानिवडेकर यांनी स्वीकारले. शिष्टमंडळामार्फत देण्यात आलेल्या निवेदनात २००५ च्या वनहक्क कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी, स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्टाचार दूर करावा, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयी उपलब्ध कराव्यात. वीज भारनियमन कमी करावे, धामणी धरणाचे पाणी डहाणूला उपलब्ध करून द्यावे, रोजगार हमीची कामे सुरू करावीत, दारिद्रय़रेषेखालील कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा ५० हजारांपर्यंत करण्यात यावी आणि सर्वत्र रस्ते करण्यात यावेत, या प्रमुख मागण्या होत्या. या ठिय्या आंदोलनात भाग घेण्यासाठी सकाळपासूनच कडेवर लहान-लहान तान्ही मुले घेऊन काही आदिवासी महिला आल्या होत्या. त्या उन्हातही बसून होत्या, हे या आंदोलनाचे वैशिष्टय़ होते.