Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘सागरनाका ते सरावलीपर्यंत रस्त्याचे काम १५ दिवसांत करणार’
डहाणू, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

डहाणू नगरपालिका हद्दीतील सागरनाका ते सरावलीपर्यंतचा रस्त्याचे काम १५ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन उपविभागीय अभियंता जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला दिले.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डहाणूतर्फे तालुका अध्यक्ष मिराज खान यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर आणि गडचिंचले गावाला वीज मिळावी म्हणून डहाणू सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयावर धडकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मेस्त्री, अक्षय नाईक, अय्याज खान वगैरे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा प्रथम सागरनाका ते मसोली येथील वीज मंडळाच्या कार्यालयावर नेण्यात आला आणि सहाय्यक अभियंता कोल्हे यांना मोर्चातर्फे निवेदन सादर केले असता, गेल्या कित्येक वर्षांपासून गडचिंचले आणि परिसरात वीज पोहोचलेली नाही ती एका महिन्यात देण्याचे आश्वासन देण्यात आले, तर त्यानंतर मोर्चा डहाणू शासकीय विश्रामगृहाजवळील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर डहाणू सागरनाका ते सरावलीपर्यंतच्या अडीच किलोमीटपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर मोर्चाला सामोरे जाताना उपविभागीय अभियंता जाधव यांनी ८६ लाखांच्या या रस्त्याची दुरुस्ती १५ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर मोर्चाची बरखास्ती झाली. यावेळी अनेकांची भाषणे झाली.