Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘प्रदूषणकारी प्रकल्पामुळे कोकण उद्ध्वस्त होईल’

 

सावंतवाडी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर औष्णिक, सेझ, मायनिंग अशा प्रदूषणकारी प्रकल्पामुळे कोकण उद्ध्वस्त होईल, अशी लोकांच्या मनात भीती निर्माण झाल्याने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघातून स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघर्ष समितीकडून उभ्या राहिल्यास त्या निवडून येतील, असे प्रतिपादन राज्य अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्वतंत्र कोकण संघर्ष समितीची बैठक कणकवली येथे झाली. त्यावेळी प्रा. महेंद्र नाटेकर बोलत होते. यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, सरचिटणीस शिवाजी देसाई, वाय. जी. राणे, गणपत वाडकर, कृष्णा खांबे आदी उपस्थित होते.
मेधा पाटकर या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कन्या आहेत. देशपातळीवर त्या करत असलेल्या आंदोलनाबाबत सिंधुदुर्गवासीयांना अभिमान वाटतो. गतवेळच्या निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत होते, असे प्रा. नाटेकर म्हणाले. कोकणात औष्णिक, वीज, सेझ व मायनिंगसारख्या प्रदूषणकारी प्रकल्पामुळे जनता नाराज आहे. त्यात राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. अशावेळी संघर्ष करणाऱ्या मेधा पाटकर यांच्या मागे जनता खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास प्रा. नाटेकर यांनी व्यक्त केला.
स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीच्या वतीने त्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उभ्या राहिल्यास निवडून येतील, असा आत्मविश्वास प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केला.