Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
सावंतवाडी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वतंत्र आकाशवाणी केंद्राचे काम पूर्ण झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी त्याचे उद्घाटन होईल, अशी प्रतीक्षा आहे. सध्या सकाळी १० ते ११ या वळेत एफएम सेवा १०३.६ या फ्रिक्वेन्सीवर प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीला २५ वर्षांंपेक्षा जास्त कालावधी लोटला असून आकाशवाणी केंद्र प्रतीक्षेत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वतंत्र आकाशवाणी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षे लोटला. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सद्य:स्थितीत सेवा सुरू झाली आहे.
सद्य:स्थितीत दक्षिण दिशेला सावंतवाडीपर्यंत, पूर्व दिशेला फोंडाघाटपर्यंत, उत्तर दिशेला खेडपर्यंत तर पश्चिम दिशेला किनारपट्टीतील भागात रत्नागिरीपर्यंत या केंद्राची सेवा उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. या केंद्राचा कार्यभार ऑल इंडिया रेडिओ पणजीकडे आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत हे केंद्र असून कागदपत्रांचा घोळ त्यासाठी जबाबदार ठरल्याचे बोलले जात आहे.
स्वतंत्र आकाशवाणी केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ठेवून आकाशवाणी केंद्राशी निगडित असणाऱ्या श्रोत्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हा डोंगराळ भाग असल्याने मुंबई, रत्नागिरी केंद्राच्या कार्यक्रमापासून श्रोत्यांना वंचित राहावे लागते. आता खुद्द सिंधुदुर्गात आकाशवाणी केंद्र झाल्याने त्याचा फायदा जिल्हावासीयांना होईल.