Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘गांधी घराण्याशी निष्ठा ठेवणाऱ्यालाच उमेदवारी द्यावी’
सावंतवाडी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उचल घेतली आहे. त्यांनी सोमवारी एक मेळावा घेऊन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अवतीभोवती असणाऱ्यांवर एकच प्रहार केला. या अष्टप्रधान मंडळाला राणेंनी आवरावे, असा इशारा दिला. तसेच गांधी घराण्याशी निष्ठा ठेवणाऱ्या व्यक्तीलाच लोकसभा उमेदवारी द्यावी, असा एकमुखी ठराव घेतला.
नारायण राणे तीन वर्षांंपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यानंतर निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते बाहेर फेकले गेले आणि त्यांची जागा राणे समर्थकांनी भरून काढली. हल्लीच नारायण राणे यांना काँग्रेस पार्टीतून निलंबित करण्यात आले. तेव्हापासून जिल्ह्यातील निष्ठावंत व्यासपीठाच्या शोधात होते.
नारायण राणे यांचे निलंबन मागे घेण्याची प्रक्रिया दिल्लीत सुरू असताना सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कुडाळात शक्तीप्रदर्शन करीत एक जाहीर मेळावा घेतला. तो अनधिकृत मेळावा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करूनही निष्ठावंतांनी एक रॅली काढून काँग्रेस पक्ष बचावाचा नारा दिला.
काँग्रेसच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात नारायण राणे यांच्याबद्दल कोणाच्या मनात राग नव्हता. त्यांच्या सभोवती जे अष्टप्रधान मंडळ आहे, ते राणे यांना चुकीची माहिती देत आहे, असा आरोप केला. काँग्रेसमध्ये दुफळी माजविणाऱ्यांपासून राणे यांनी सावध व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश दळवी, बाळू वस्त आदींनी त्यावर भाष्य केले. माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी मेळाव्यास पुढाकार घेतला होता. त्यांना मारहाणीची धमकी आली होती. त्या धर्तीवर त्यांनी प्रतिआव्हान देत काँग्रेसच्या मजबुतीसाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी आपण मरण्यास तयार आहोत, असे जाहीर भाष्य केले.या मेळाव्यास्ो पुष्पसेन सावंत, सुरेश दळवी, विकास सावंत, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, गणपत राऊळ, अभय शिरसाट, दादा परब, आबा मुंज, अमरसेन सावंत, प्रकाश जैतापकर, मनीष दळवी, दीपक कुबल, राजू निंबाळकर अशी अनेकांनी उपस्थिती दर्शविली होती.