Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

देवरुखात अपंग कल्याणासाठी सुरू होणार ‘धडपड’
सचिन पटवर्धन
देवरुख, १७ फेब्रुवारी

 

हुशार मुलांच्या कौतुकासाठी लाखो हात पुढे सरसावत असतात, मात्र विकलांग मुलांना असे भाग्याचे क्षण कधीतरीच अनुभवास येतात. अपंग, मतिमंद, बहुविकलांग मुलांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी देवरुख परिसरात काहीतरी सुविधा उभारण्यासाठी ‘धडपड’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
‘धडपड’तर्फे २२ फेब्रुवारीला देवरुखातील पार्वती पॅलेस सभागृहात या पाश्र्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचे धडपडचे अध्यक्ष युयुत्सु आर्ते यांनी सांगितले. संपूर्ण देशात दोन कोटी मुले अपंग, मतिमंद या स्वरूपाची असून अपंगांची राज्यातील आकडेवारी १५ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी केवळ ३०-३५ हजार मुलांनाच शिक्षण वा अन्य काही तरतुदींचा लाभ मिळतो. ही धक्कादायक स्थिती आर्तेनी सामोरी आणली असून अशा मुलांच्या भवितव्यासाठी काहीतरी कृती करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अपंगांसाठी व त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या पुण्याच्या सावली संस्थेचे अध्यक्ष वसंत ठकार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अपंग-बहुविकलांग कायमस्वरूपी शाळा, औषधोपचार केंद्रे, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांतून प्रत्यक्षात अपंग- मतिमंद मुलांना आणि त्यांच्या पालकांना आधार देण्याचे कार्य सावली संस्थेने यशस्वी केले आहे. या प्रकारचे कार्य देवरुखात उभारण्याचा धडपडचा विचार आहे. देवरुख परिसरात अपंगांसाठी यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्यां नलिनी भुवड यांनी पुढाकार घेतला आहे. अपंगांसाठी वसतिगृहे व निवासी शाळांचा त्यांचा जोरदार प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपंग सेलची मदतही त्यासाठी त्यांनी घेतली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अपंगांसाठी शाळा सुरू करण्याचे प्रयत्नही शहरात दोन वर्षांंपासून सुरू झाले आहेत. अपंगांनी स्वत:ला कमी समजू नये,त्यांच्यात न्यूनगंड राहू नये यासाठी अपंगांची संघटनाही देवरुखात सक्रियतेने कार्यरत आहे. या सर्वाला धडपडच्या पुढाकाराने संजीवनी मिळणार आहे. अपंगांसाठी उभारण्याच्या कृतीमध्ये सहभागी होण्यासाठी, या सर्वांमागील भूमिका जाणून घेण्यासाठी अनेकांनी पुढे येण्याचे आवाहन आर्तेनी केले आहे.