Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘हिंदू समाजाला टार्गेट करणाऱ्यांना वेळीच धडा शिकवा’
सावंतवाडी, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

अंधश्रद्धा निर्मूलन बिल शिवसेना-भाजप सत्ता राज्यात आल्याशिवाय रद्द होणार नसल्याचा निर्वाळा आमदार शिवराम दळवी यांनी दिला. हिंदू समाजाला टार्गेट करणाऱ्यांना वेळीच धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी केले.
हिंदू जनजागृती जाहीर सभेत येथे आमदार शिवराम दळवी बोलत होते. यावेळी दोडामार्ग तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, धर्मसेना अध्यक्ष विनय पानवळीकर, हिंदू जनजागृती गोवा अध्यक्ष जय स्थळी, सनातन संस्थेचे मदन सावंत उपस्थित होते.
हिंदूंची मंदिरे अधिग्रहण कायदा काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारने आणण्याचा प्रयत्न केला तसेच अंधश्रद्धा निर्मूलन बिल या सरकारने आणले. त्याला शिवसेना- भाजप आमदारांनी जोरदार विरोध केल्याने ते विधान परिषदेत रोखले गेले आहे, असे आमदार दळवी म्हणाले. यापुढे अंधश्रद्धा निर्मूलन बिल रद्द व्हावे, असे वाटत असेल तर हिंदूंनी शिवसेना- भाजपला सत्तेत आणावे अन्यथा हिंदूंची कोंडी करण्याचे काँग्रेसी सरकार निर्णय घेईल, असे आमदार दळवी म्हणाले.
हिंदू समाजातील प्रत्येकाने धर्मशिक्षण घ्यावे. हिंदूंचा धर्म पवित्र असून हिंदूत जागृती नसल्यानेच दहशतवादी हिंदूंना लक्ष करीत आहेत, असे धर्मसेना अध्यक्ष विनय पानवलकर यांनी सांगितले. हिंदू धर्माचे रक्षण हेच कर्तव्य प्रत्येकाने आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जय स्थळी, मदन सावंत यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व शिकवणीचे विचार मांडले.