Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

आता पर्यटक कोकणातही अनुभवणार शिडाच्या बोटीतून समुद्र थरार!
चिपळूण, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

समुद्राच्या आकर्षणापोटी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्रातील प्रत्यक्ष थरार अनुभवता यावा याकरिता विकासात्मक दिशेने वाटचाल करणाऱ्या कोकण भूमी प्रतिष्ठानला यश प्राप्त झाले आहे. संस्थेच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात ‘गणपतीपुळे ते निवडी बंदर’ असा शिडाच्या बोटीतून समुद्र थरार अनुभवता येणार आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील हा पहिलाच प्रयोग असल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.गुहागर तालुक्यातील तवसाळ बंदरात बोटी बनविण्याचा कारखाना चालविणारे प्रसिद्ध उद्योजक राजेश देसाई यांनी ही बोट या अनोख्या उपक्रमासाठी उपलब्ध केली आहे. संपूर्णत: आंतरराष्ट्रीय दर्जाची ही बोट असून, शिडाच्या माध्यमातून समुद्रावरील वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या बळावर ही बोट मार्गक्रमण करते, त्यामुळे विविध इंजिनांच्या माध्यमातून होणारे ध्वनिप्रदूषण पूर्णत: टळते. समुद्र वाऱ्याच्या वेगावर तितक्याच वेगाने बोटीतून प्रवास करताना अनुभवायला मिळणारा ‘थरार’ अवर्णनीय असाच असतो. त्यामुळे आगामी काळात हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरेल, असा विश्वास कोकण भूमीचे कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी व्यक्त केला. कोकणातील पर्यटकांना असलेले समुद्र आकर्षण विचारात घेतानाच त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मुळातच बोटीची रचना ही सुरक्षित आहे. दोन नियमित होडय़ांचा उपयोग करून त्यावर शास्त्रीय पद्धतीने बांधणी करण्यात आली असून आवश्यक सुविधा बोटीत उपलब्ध आहेत, असे राजेश देसाई यांनी स्पष्ट केले. गणपतीपुळे हे पर्यटकांच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लोकप्रिय स्थळ आहे. अनेकजण दर्शन घेऊनच परत फिरतात. मात्र या प्रकल्पामुळे गणपतीपुळे मंदिर व परसिर समुद्रतूम पाहण्याचा अनोखा याग याचमुळे जुळून येणार असल्याचे यादवराव यांनी सांगितले.
या बोटीच्या उपक्रमाची प्रायोगिक तत्वावरील पाहणी नुकतीच ‘तिवरी बंदरातून गणपतीपुळे व परत’ अशा पद्धतीने करण्यात आली. यावेळी बोटीचे मालक देसाई, संजय यादवराव, सागरी सुरक्षा समितीचे पाज्य व राष्ट्रीय सदस्य, कोकणभूमी सागरी पर्यटन व बंदर विकास समितीचे संयोजक, सागरी तज्ज्ञ कॅ. ए.के. करकरे, गणपतीपुळे मंदिर सरपंच विनायक गांगण, गणपतीपुळे पर्यटन संघाचे अध्यक्ष प्रमोद केळकर, हृॉटेल व्यावसायिक विवेक देसाई, ज्येष्ठ पत्रकार सचिन देसाई, कोकण विकास प्रकाशनाते कार्यकारी संचालक धीरज वाटेकर, कोकण क्लबचे सिंधुदुर्ग संयोजक बाळासाहेब परुळेकर उपस्थित होते. अलीकडच्या काळात कोकण किनारपट्टी अतिशय संवेदनशील बनली आहे. देशावर या ठिकाणी सुरक्षा वाढविण्याबरोबरच वर्दळ वाढविणे आवश्यक असल्याचे करकरे यांनी सांगितले. अटलांटिक ओशन पार करणारे जेम्स ओरम यांनी विकसित संशोधनावर आधारित ही अर्क बोट देसाई यांनी बनविली आहे. शिडाच्या सहाय्याने चालत असल्याने प्रदुषणार मात करणे शक्य झाले आहे. नौकेची लांबी ३० फूट असून आत चार खोल्या आहेत. एकाच वेळी १५ प्रवासी यातून प्रवास करू शकतात. एप्रिल महिन्यात तीवरी बंदर ते गणपतीपुळे प्रवास सूरू होणार असला तरी भविष्यात मुंबई ते गोवा पर्यंतचा सागरी प्रवास टप्प्यात येणार आहे.