Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

संभाजी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ३४ लाखांचा निधी मंजूर
संगमेश्वर, १७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

गेली १९ वर्षे पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील छत्रपती संभाजी स्मारकाचे सुशोभीकरण व अन्य कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यावर्षी एप्रिलअखेर ही सर्व कामे मार्गी लावायची आहेत. संभाजी स्मारकाचे काम मार्गी लागावे, यासाठी ‘लोकसत्ता’ने सातत्याने शासनाचे लक्ष वेधले होते.
११ मार्च १९८९ रोजी भूमिपूजन झाल्यावर छत्रपती संभाजी स्मारक पूर्णत्वास नेण्यास स्मारक समितीला अपयश आले व अनेक वर्षे हे स्मारक अपूर्णावस्थेत एखाद्या पुरातन पडीक वास्तूप्रमाणे उभे होते. संभाजी महाराजांना कसबा-संगमेश्वर या गावी दगाबाजीने पकडले गेले, ही गोष्ट इतिहासाच्या दृष्टीने कलंकित आहे. तरीही या गावी संभाजी राजांच्या स्मृती सर्वासमोर व विशेषत: येथे हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांसमोर चिरंतन राहाव्यात, यासाठी २० वर्षांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर जाखमाता मंदिराजवळ भव्य-दिव्य स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले.
हे स्मारक पूर्ण करण्यासाठी स्मारक समिती निधी संकलित करण्यास कमी पडली. यावर ‘मोहीम फत्ते होणार नव्हती तर हाती कशाला घेतली’ असे वृत्त प्रसिद्ध करताच कोकण पॅकेजमधून शासनाने स्मारक उभारणीसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्मारकाचे काम नव्या दमाने हाती घेण्यात आले खरे; परंतु स्मारक समितीने या कामाकडे दुर्लक्ष केल्याने स्मारकाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. याबाबत थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर चौकशीचे सर्व फार्स झाले, परंतु दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
एवढय़ावरच स्मारकाचे दुर्दैव संपले नाही तर खिडक्या-दरवाजांच्या काचा फोडून प्रेमीयुगुलांनी स्मारकाचा उपयोग आडोसा म्हणूनही केला व मद्यपींनी तेथे आपला अड्डाच बनविला. एवढे प्रकार घडून स्मारकाकडे न फिरकलेल्या स्मारक समितीबाबत संभाजीप्रेमींनी संताप व्यक्त केला व स्मारकाची साफसफाई करून येथील पावित्र्य जपण्यासाठी करडी नजरही ठेवली.
संभाजी स्मारकाच्या दुर्दैवाचे वृत्त वाचून तत्कालीन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनी लक्ष घातले व स्वत: स्मारकाला भेट देऊन पाहणी केली. पर्यटनाच्या माध्यमातून स्मारकाला निधी मंजूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या संभाजी स्मारकास तब्बल ३४ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या निधीमधून स्मारक परिसराचे सुशोभीकरण, बंदिस्ती, भव्य कमान, स्वच्छतागृह, कर्मचारी निवास आदी कामे पूर्ण केली जातील. ही सर्व कामे एप्रिल २००९ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्मारकाच्या अंतर्गत कामाची जबाबदारी सर्वस्वी स्मारक समितीची असल्याने यासाठी शासनाकडून कोणताही निधी देण्यात आलेला नाही. संभाजी स्मारकासाठी जरी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले असले, तरी हे स्मारक मे २००९ अखेर पर्यटकांसाठी खुले होणे शक्य नाही. कारण पुढील सर्व कामांची जबाबदारी स्मारक समितीवर असल्याने स्मारक समितीचा आजवरचा उत्साह लक्षात घेता स्मारकाच्या पुढील भवितव्याविषयी भविष्यात बोलणे उचित नसल्याचे संभाजीप्रेमींचे म्हणणे आहे.