Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

क्रीडा

रिचर्डस्, रॉबर्ट्स, होल्डिंगचा ‘हॉल ऑफ फेम कॅप’ने गौरव
दुबई, १७ फेब्रुवारी / पीटीआय

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिवियन रिचर्डस्, अ‍ॅण्डी रॉबर्ट्स आणि मायकेल होल्डिंग यांना आयसीसी क्रिकेट ‘हॉल ऑफ फेम’ कॅप देऊन गौरविण्यात आले. विंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डॉ. ज्युलियन हंट यांच्या हस्ते या खेळाडूंना या कॅप सन्मानपूर्वक देण्यात आल्या. यजमान विंडीज व इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी लढतीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारादरम्यान अ‍ॅण्टीगा रिक्रिएशन मैदानात हा सोहळा पार पडला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद म्हणजे ५६ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम रिचर्डस्च्या नावावर आहे.

विद्यमान ऑस्ट्रेलियन संघ मार्क टेलरच्या संघाच्या तोडीचा - पॉन्टिंग
मेलबर्न, १७ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या आपल्या संघाची तुलना १९९५ मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेल्या मार्क टेलरच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघाशी केली आहे. मार्क टेलरच्या नेतृत्वाखाली १९९५ मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेल्या कांगारूंच्या संघाने त्या मालिकेत विजय मिळविला होता. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर जाऊन पोहोचला. त्या वेळच्या कांगारूंच्या संघातही अनेक अननुभवी खेळाडू होते. विंडीजविरुद्धच्या त्या मालिका विजयानंतर कांगारूंच्या संघाने पुन्हा कधी मागे वळून पाहिलेच नाही.

भारताची गोलंदाजीची बाजू जगात सर्वोत्तम झ्र् राईट
वेलिंग्टन, १७ फेब्रुवारी / पीटीआय

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाजांना सहाय्यक खेळपष्य़ा तयार करण्याची रणनीती न्यूझीलंड संघावर उलटण्याची शक्यता आहे, अशी भीती न्यूझीलंड संघाचे माजी सलामीवीर जॉन राईट यांनी आज व्यक्त केली. वर्तमान भारतीय संघाची गोलंदाजीची बाजू जगात सर्वोत्तम असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

न्यूझीलंडमधील छोटय़ा मैदानांवर धोनी आणि सेहवागला रोखणे कठीण- व्हेटोरी
ख्राईस्टचर्च, १७ फेब्रुवारी/ पीटीआय

भारतीय संघातील आपल्या ताकदीच्या जोरावर गोलंदाजांची त्रेधा उडवून मैदानाबाहेर चेंडू भिरकाविणाऱ्या सलामीवीर विरेंद्र सेम्हवाग आणि कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांना न्यूझीलंडमधील छोटय़ा मैदानांवर रोखणे ही आमच्या संघासाठी सर्वात कठीण गोष्ट असेल, असे मत न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हेटोरीने व्यक्त केले आहे.

पाकिस्तानातील सामन्यांसाठी पर्यायी ठिकाणे आतापासूनच शोधा
लॉरगॅट यांची विश्वचषक स्पर्धेच्या मध्यवर्ती आयोजन समितीला सूचना
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी, वृत्तसंस्था
२०११ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचा पाकिस्तान हाही संयुक्त यजमान असला तरी तेथील परिस्थिती पाहता तेथील सामन्यांसाठी पर्यायी ठिकाणे आत्तापासूनच शोधा, अशी सूचना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरून लॉरगॅट यांनी केली आहे.२०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या मध्यवर्ती आयोजन समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लॉरगॅट बोलत होते.ते म्हणाले की, पाकिस्तानातील सध्याची स्थिती चिंताजनक आहे.

झहीर आणि इशांतला पाठिंब्याची गरज-श्रीनाथ
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान आणि इशांत शर्मा ही जगातील सर्वोत्तम जोडगोळी असून त्यांना यावेळी निवड समितीच्या पाठिंब्याची गरज आहे. हे दोघेही ऐन भरात आलेले असून निवड समितीने यावेळी तिसऱ्या गोलंदाजाची जागा घेणाऱ्या गोलंदाजाचे स्थान नक्की करायला हवे, असे मत भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज जवागल श्रीनाथने राष्ट्रिय क्रिकेट अकादमीमध्ये व्यक्त केले आहे.

कॉलिंगवूडच्या शतकाने इंग्लंडची बाजू मजबूत
अँटिगा, १७ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसने कर्णधाराला साजेशी खेळी करत इंग्लंड संघात नवचैतन्य निर्माण केल्याची प्रचिती पॉल कॉलिंगवूडने झळकावलेल्या शतकाने आली. अँटिगा रिक्रिएशन मैदानावर काल (सोमवार) दुसऱ्या दिवशी कॉलिंगवूडने कारकिर्दीतले आठवे शतक झळकावले आणि पाहुण्या इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ९ बाद ५६६ धावांची भक्कम मजल गाठत पहिला डाव सोडण्याचा निर्णय घेतला. काल निर्धारित खेळातील पंधरा षटकांचा खेळ शिल्लक असताना इंग्लंडने पहिला डाव घोषित केल्यानंतर यजमान वेस्ट इंडिजने दिवसअखेर कर्णधार ख्रिस गेलला गमावून १ बाद ५५ धावांची मजल मारली होती.

विंडिज ५ बाद २०१
रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार वेस्टइंडिजची ५ बाद २०१ अशी अवस्था होती. त्यावेळी रामनरेश सारवान (नाबाद ५४) खेळत होता. तर शिवनारायण चंद्रपॉल एक धाव काढून बाद झाला होता.

विनोद घाडगे यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे एक लाखांचे सहाय्य
मुंबई, १७ फेब्रुवारी / क्री. प्र.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते जलतरणपटू विनोद रामचंद्र घाडगे यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनातर्फे एक लाख रुपयांची मदत करण्यात आली व कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी घाडगे यांनी धरमतर ते गेटवे असे जलतरण करण्याचे ठरविले होते. पण दुर्दैवाने ही मोहीम पार पाडताना त्यांचा मृत्यु ओढविला. क्रीडामंत्री अनिस अहमद यांच्या हस्ते घाडगे यांच्या पत्नी उमा घाडगे यांना एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यावेळी नागपूर क्रीडा विभागाचे उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे व मुंबई क्रीडा विभागाचे उपसंचालक मोटे उपस्थित होते.

पाकिस्तानच्या आणखी सहा क्रिकेटपटूंवरील बंदी उठविली
कराची, १७ फेब्रुवारी / पीटीआय

इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळणाऱ्या पाकिस्तानच्या आणखी सहा क्रिकेटपटूंवरील बंदी सिंध उच्च न्यायालयाने उठविली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील स्थानिक क्रिकेट स्पर्धात येथील एकूण १७ खेळाडू आता खेळू शकतील. इम्रान फरहात, इम्रान नझीर, हुमायून फरहात तौफिक उमर, रियाझ आफ्रिदी व अर्शद खान हे खेळाडूही आता स्थानिक क्रिकेट खेळू शकतील. त्याआधी, ११ खेळाडूंवरील बंदी या न्यायालयाने उठविली होती. पाकिस्तानच्या इन्झमाम, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद व अझह मेहमूद यांनी अद्याप स्थानिक क्रिकेटमधील आपल्या बंदीविरोधात आव्हान दिलेले नाही.

दुबई टेनिस : सानिया पराभूत
दुबई, १७ फेब्रुवारी / पीटीआय

भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीत दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. जागतिक महिला टेनिस क्रमवारीत २४व्या स्थानावर असलेल्या इस्टोनियाच्या काया केन्पीने सानियाची झुंज ७-५, ६-२ गुणांनी मोडून काढली.सानियाने पहिल्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी मिळवली होती पण, त्यानंतर केन्पीने चमकदार कामगिरी करत ७-५ गुणांनी सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये केन्पीने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवत ६-२ गुणांनी सेटजिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, सानियाने रशियाच्या एक्टेरिना माकारोव्हाचा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानियाने माकारोव्हाचा ७-५, ६-२ गुणांनी पराभव केला.

राष्ट्रीय शालेय बॅडमिंटनमध्ये अभिषेक, वल्लरी, धीरज यांना रौप्यपदक
मुंबई, १७ फेब्रुवारी / क्री. प्र.
आंध्र प्रदेशमधील विशाखापष्णम येथील सुवर्णा इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय वयोगट शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अभिषक कुलकर्णी, वल्लरी बुकाणे, धीरजकुमार गौरव या तीन ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी रौप्यपदकांची कमाई केली. हे तिघेही खेळाडू ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षार्थी असून या स्पर्धेतील सांघिक स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या तिन्ही खेळाडूंनी हे यश सांघिक स्पर्धेमध्ये मिळविले आहे. धीरजकुमार व अभिषेक कुलकर्णी यांनी १७ वर्षांखालील मुलांच्या संघात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी उपान्त्य फेरीत कर्नाटक संघाचा २-१ असा पराभव केला, मात्र त्यांना अंतिम फेरीत आंध्र प्रदेशकडून पराभूत व्हावे लागले. वल्लरी बुकाणेने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात राज्याचे प्रतिनिधित्व केले व उपान्त्य फेरीत महाराष्ट्राच्या संघाने प. बंगालला हरविले ते २-१ अशा फरकाने तर अंतिम फेरीत आंध्र प्रदेशकडून ०-२ असे पराभूत झाल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.या संघाबरोबर संजय सोनावणे व विशाल गरजे यांनी प्रशिक्षक व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. या प्रतिष्ठापूर्ण स्पर्धा स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये १४, १७, १९ असे तीन वयोगट मुला-मुलींच्या विभागात होते व त्यात २७ राज्यांमधून १ हजारहून अधिक खेळाडू देशभरातून सहभागी झाले होते.

नाशिक येथे राज्यस्तरीय एरोबिक्स शिबीर
नाशिक, १७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
येथील सागरमल मोदी प्राथमिक विद्यामंदीरच्या आवारात येत्या रविवारी एरोबिक्सच्या राज्यस्तरीय तांत्रिक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एरोबिक्स असोसिएशनच्या माध्यमातून सहा सदस्यांचा भारतीय संघ नुकताच एफआयएसएएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रशिया येथून यशस्वीरित्या परत आला. त्या पाश्र्वभूमीवर, देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे एरोबिक्स शिबीराचे आयोजन एफआयएसएएफ या जागतिक फेडरेशन व भारतीय एरोबिक्स महासंघाच्या संयुक्त विद्यमाने येत्या मार्चमध्ये बालेवाडी येथे होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये जागतिक फेडरेशनच्या तांत्रिक समितीच्या सदस्या मिस ओडोलिया (इस्त्राईल) या उपस्थित राहून प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत. या शिबीरात सहभागी होण्यासाठी पूर्वतयारी म्हणून प्रस्तुत शिबीर उपयुक्त ठरेल. एरोबिक्सचा समावेश येत्या शैक्षणिक वर्षांत शालेय क्रीडा प्रकारात होत आहे. तसेच शासनाच्या मुलींकरिता स्वयंसिद्ध प्रशिक्षण वर्गामध्येही एरोबिक्सचा समावेश आहे.त्यादृष्टीने या खेळाचा प्रसार व प्रचार नाशिक जिल्हा तसेच राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये व्हावा आणि जिल्हस्तरीय खेळाडूंचा राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र एरोबिक्स असोसिएशनच्या मान्यतेने प्रथमच महाराष्ट्र एरोबिक्स असोसिएशनने नाशिकमध्ये अशा प्रकारच्या सेमिनारचे आयोजन केले आहे. अधिक माहिती व प्रवेशाकरिता ९८५०१६६८००, अथवा ९८८१८६६८०० क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महापौर चषक योगासने स्पर्धा चेंबूरमध्ये
मुंबई, १७ फेब्रुवारी / क्री. प्र.

तिसरी महापौर चषक योगासने स्पर्धा गुरुवार, १९ फेब्रुवारीला होणार असून, चेंबूर हायस्कूल, चेंबूर नाका, (अकबर अलीजजवळ) येथे होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, रायगड, पुणे, सांगली, रत्नागिरी येथील खेळाडूही सहभागी होणार आहेत. बृहन्मुंबई योग संघ, चेंबूर क्रीडा प्रबोधिनी आणि चेंबूर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघात पाच खेळाडू, एक प्रशिक्षक व एक व्यवस्थापक असतील. मुले व मुली यांच्यासाठी १७ वर्षांखालील आणि १७ वर्षांवरील अशा दोन वयोगटांत स्पर्धा खेळविण्यात येईल. शालेय क्रीडा महासंघ आणि राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या सिलॅबसप्रमाणे खेळाडूंना योगासनांची प्रात्यक्षिके सादर करावी लागतील. सदर स्पर्धेसाठी गिरीश कुलकर्णी यांची स्पर्धा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, मानाजी मश्चिंद्र हे त्यांना सहाय्य करतील. १९ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता चेंबूर हायस्कूल येथे योगासने स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, या वेळी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष सतिश प्रधान, चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अविनाश तांबे, क्रीडा व युवकसेवा संचालनालयाचे संचालक एम. बी. मोटे उपस्थित राहणार आहेत.

गुरुवारपासून सबज्युनिअर कॅरम
मुंबई, १७ फेब्रुवारी / क्री. प्र.

आयडियल स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीतर्फे मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन मान्यतेने क्रीडाप्रेमी चारुशिला गोविंदराव मोहिते स्मृती चषक सबज्युनिअर कॅरम स्पर्धेस गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुरुवात होणार आहे. जिल्हा अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक साधणारा कॅरमपटू राहुल गायकवाडविरुद्ध सॅब्रियन नादर यामधील उद्घाटनीय लढतीने क्षात्रय्य समाजाचे क्रीडागृह, वनमाळी हॉल, दादर (प.) येथे या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेमध्ये एकूण आठ पुरस्कार असून, अंतिम विजेत्यास रोख रुपये एक हजार व चारुशिला गोविंदराव मोहिते स्मृतिचषक दिला जाईल. स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविण्यासाठी राहुल गायकवाड, परेश हडियाल, शुभम् पालंदे, वरुण गोसावी, ओमकार खामकर, राहुल चौरसिया आदी कॅरमपटूंमध्ये चुरस असेल.

उचाट मंडळाची कबड्डी स्पर्धा २१ फेब्रुवारीपासून
मुंबई, १७ फेब्रुवारी / क्री. प्र.

वाडा तालुक्यातील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या उचाट गावातील तरुण मंडळाच्या वतीने २१ व २२ फेब्रुवारी दरम्यान, दिवंगत राष्ट्रीय खेळाडू संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहीद शशांक शिंदे क्रीडानगरीत रंगणाऱ्या या स्पर्धेत पुरुष गटात १२ तर महिला गटात नऊ संघांना सहभाग देण्यात आला आहे. स्पर्धेतील दोन्ही गटांतील विजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असून, स्पर्धेदरम्यान, एकंदरीत ५४,००० रुपयांची रोख पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत.