Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

ठाणे जिल्ह्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक पाऊलखुणा जपणारे भव्यदिव्य असे ‘ठाणे कलाभवन’ महापालिकेच्या वतीने उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन बुधवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

करवाढ नसल्याने ठाणेकर सुखावले
ठाणे/प्रतिनिधी :
कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेला आणि चालू प्रकल्पांना प्राधान्य देणारा तसेच ठाणेकरांच्या डोक्यावर २३१ कोटींचे कर्ज लादणारा तसेच महिला आणि गरिबांसाठी विशेष तरतूद असलेला ठाणे महापालिकेचा २००९-१० चा १४२६ कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समितीस सादर केला. महापालिकेचा गेल्या वर्षीचा मूळ अर्थसंकल्प ११९९ कोटींचा मांडण्यात आला होता. मात्र आर्थिक मंदीमुळे जकात, अग्निशमन आणि शहर विकास विभागास अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने आणि जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गतही अपेक्षित अनुदान न आल्याने सन २००८ व ०९ चा सुधारित अर्थसंकल्प १०५२ कोटींचा झाला असून, पालिकेस १४७ कोटींचे कमी उत्पन्न मिळाले आहे. त्यात पालिकेने १०० कोटींचे कर्ज न उचलल्यामुळे प्रत्यक्षात ४७ कोटींचे कमी उत्पन्न मिळाले आहे.

नगरसेवकांचा देखील पेव्हर ब्लॉकला विरोध
शशिकांत कोठेकर

प्रभाग समितीनिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीत सहायक पालिका आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला, प्रभाग अधिकाऱ्याला त्याच्या खर्च करण्याच्या मर्यादेत पेव्हर ब्लॉकचे काम करून घेता येते. ठाण्यासारख्या मुंबईला लागून असलेल्या महापालिकेत १० लाखापर्यंतच्या खर्चाच्या फाईल्स महासभेकडे, पालिका मुख्यालयात चर्चेसाठी येत नाही. संबंधित अधिकारी त्याच्या अधिकारात १० लाखापर्यंत नागरी कामांच्या फाईल्स मंजूर करू शकतो. मुंबई महापालिकेत देखील हाच प्रकार सुरू आहे.

वाहतूक व्यावसायिक कामगार संघटनेच्या मुख्यालयाचे उद्घाटन
ठाणे/प्रतिनिधी : शिवसेनाप्रणीत जय महाराष्ट्र वाहतूक व्यावसायिक कामगार संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार योगेश पाटील, शिवसेनेचे मीरा भाईंदर सहसंपर्क प्रमुख प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.संघटनेची मध्यवर्ती मुख्य शाखा जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर उभारण्यात आली आहे. कामगारांच्या अडी-अडचणी, तसेच त्यांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी या कार्यालयाची उभारणी करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यास कामगार संघटना अध्यक्ष संतोष गावंड, कार्याध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष पुष्पलता सावंत, चिटणीस राजू धवल, बाबू सोनार आदी उपस्थित होते.

आनंदवन स्नेही मंडळाने उलगडला बाबा आमटेंचा जीवनप्रवास
ठाणे/प्रतिनिधी :
बाबा आमटे म्हणजे स्वप्ने आणि साहस यांचा सौदागर, अनंताला कवेत घेऊ पाहणारा गरुड, साक्षात् मृत्यूशीही दोन हात करणारा योद्धा, जमिनीशी घट्ट नाते राखणारा निर्माता, करुणेचा महासागर, वंचितांचा सखा, समरसून जीवन जगणारा एक कलासक्त कलंदर व्यक्तिमत्व होते. अशी बाबा आमटेंची अनेक रूपे ठाण्यातील आनंदवन स्नेही मंडळाचे श्रीराम नानिवडेकर यांनी उलगडविली.ठाण्यातील आनंदवन स्नेही मंडळातर्फे आचार्य अत्रे कट्टय़ावर पद्मभूषण बाबा आमटे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त बाबा आमटेंसोबत काम केलेल्या भाऊ नानिवडेकर यांनी बाबांच्या कार्याचा परिचय ‘मला उमजलेले बाबा’ या शीर्षकाखाली करून दिला.

‘हावडा ब्रिजवरून’चे प्रकाशन
ठाणे/प्रतिनिधी

ज्या महानगरीच्या जनजीवनावर साहित्य, संगीत आणि कला यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो त्या ‘कोलकाता’ नगरीत, ‘महाराष्ट्र निवास’च्या पंचाहत्तराव्या वर्धापनदिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात ‘हावडा ब्रिजवरून..’ या प्रवीण कारखानीसलिखित छोटेखानी पुस्तकाचे प्रकाशन झाले.पश्चिम बंगालचे भूतपूर्व मुख्यमंत्री सिद्धार्थशंकर रे, ज्यांनी महाराष्ट्र निवासचा जन्मसोहळा प्रत्यक्ष पाहिला होता, ते याही सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. आज त्यांनी आपल्या वयाची नव्वदी पार केलेली आहे. ‘हावडा ब्रिजवरून..’ या पुस्तकात त्यावेळचा तो दुर्मिळ फोटो पाहून सिद्धार्थशंकर रे आणि ब्याऐंशी वर्षांच्या माया रे यांना गतकाळच्या आठवणी दाटून आल्या. ‘पंचवीस वर्षांपूर्वी मी कोलकात्यात असताना,पुण्या-मुंबईच्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या आणि कोलकाता व बंगाल हा केंद्रबिंदू ठेवून लिहिलेल्या माझ्या या लेखसंग्रहाचे प्रकाशन प्रत्यक्ष कोलकात्यातच व्हावे हा माझ्या दृष्टीनं दुग्धशर्करायोगच आहे’, असे कारखानीस याप्रसंगी म्हणाले. ठाण्यातील अरुण फडके यांनी अंकुर प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक बाजारात आणले आहे.

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे/प्रतिनिधी :
विद्यार्थी वाहतूक संघटना, ठाणे आयोजित तृतीय वर्धापनदिनानिमित्त स्नेहसंमेलन , रक्तदान शिबीर तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड, माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर, नगरसेवक संजय भोईर, काँग्रेस ठाणे शहर माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, नगरसेवक मधुकर पावशे, पत्रकार शशिकांत कोठेकर आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची एक प्रकारे आपण सेवा करत असून, त्यांच्या प्रगतीमध्ये एक प्रकारे हातभार लावत आहोत, असे आव्हाड यांनी सांगितले. वाहतूक संघटना अध्यक्ष मनोज पावशे, उपाध्यक्ष विश्वास पाटणे, सरचिटणीस गिरीधर फुलोरे, सचिव गणेश कदम, खजिनदार दिलीप पाटील, कार्यवाहक शाम नाईक, शहाजी सटाळ आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

मोटारसायकल चोरणारी टोळी गजाआड
भिवंडी/वार्ताहर
: शहरातून मोटारसायकल चोरणाऱ्या प्रतिष्ठित घराण्यातील पाच तरुणांच्या टोळीस निजामपूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दोन लाख किमतीच्या सहा मोटारसायकल जप्त केल्या आहेत. पकडण्यात आलेल्या पाचही प्रतिष्ठित घराण्यातील तरुणांमध्ये प्रसाद गुरव, सगीर अहमद, रिझवानउल्ला अन्सारी, श्रीनिवास पवार, अस्लम महम्मद खान, साजीद अक्तर, मोहम्मद उस्मान अन्सारी अशा आरोपींची नावे असून, प्रसाद हा रचिरा व्हेंचर्स सिटी फायनान्समध्ये थकबाकीदार मोटारसायकल मालकांच्या गाडय़ा जप्त करण्याचे काम करतो. साजिद हा कोटक महेंद्रामध्ये इन्शुरन्स एजंट आहे, तर सगीर हा हॉटेल व्यावसायिक असून, अस्लम हा मोटारसायकल मॅकॅनिक आहे. श्रीनिवास हा पॉवरलूम व्यावसायिक असून हे पाच जण शहरातील पाचही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकल चोरून त्या अस्लम याच्या मोटार गॅरेजमध्ये आणून त्यांचे भाग जुन्या मोटारसायकलीस बसवून त्यांची विक्री करीत असत. याबाबतचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी सापळा रचून या पाचही आरोपींना मोठय़ा शिताफीने अटक केली.

वीज चोरांवर महावितरणचा ‘हल्लाबोल’
ठाणे/प्रतिनिधी :
वीज चोरांवर परत एकदा महावितरणने हल्लाबोल केला असून, कल्याण पश्चिम विभागातील वलीपीर उपविभागाने आज वलीपीर, गांधी चौक, बैल बाजार आणि रोहीदास वाडा येथे धडक देत सुमारे २२ वीज चोऱ्या उघडकीस आणल्या असून, त्यांनी दोन लाखांची वीज चोरी केली आहे. महावितरणच्या सुमारे ४० अधिकारी व कर्मचारी यांनी आज सकाळी १० च्या सुमारास पोलीस बंदोबस्तात आपली मोहीम सुरू केली. मुख्य अभियंता चंद्रशेखर येरमे आणि अधीक्षक अभियंता प्रकाश रंगदळ यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत उपकार्यकारी अभियंता कादी तसेच इतरही उपविभागातील अभियंते व कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत एकूण १७५ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात येऊन २२ ठिकाणच्या वीज चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.

रंगेहाथ पकडलेल्या दारू विक्रेत्यांना पोलिसांनी सोडले
शहापूर/वार्ताहर -
तालुक्यातील भातसानगरजवळील शेंडेपाडा परिसरातील महिलांनी गावठी दारूधंदा करणाऱ्यांना शहापूर पोलिसांकडे सुपूर्द करूनही त्यांच्यावर कठोर कारवाईऐवजी सोडून दिले. त्यामुळे संतप्त महिलांनी पोलीस उपनिरीक्षकालाच दारू विक्रेत्यांचे काय केले, असा सवाल करून भंडावून सोडले. शेंडेपाडा येथे महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन व दारूबंदीसाठी उपाययोजनांबाबत शिबीर आयोजित केले होते. यावेळी दीडशे महिलांनी दारूबंदी करण्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यास पोलिसांचेच असहकार्य असते. गावठी दारू धंदे करणाऱ्यांना पकडून देऊनही त्यांचे काय झाले, असा संतप्त सवाल उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक शरद चिनवले यांना केला. महिलांना केलेल्या प्रश्नांची सरबत्तीमुळे थातूरमातूर कारण सांगून त्यांनी कशीबशी सुटका करून घेतली.

फार्मासिस्ट असोसिएशनचे अधिवेशन साजरे
ठाणे/प्रतिनिधी

एनकेटी महाविद्यालयात पार पडलेल्या अधिवेशनामध्ये फार्मासिस्टच्या कल्याणासाठी शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या. अधिवेशनाचे उद्घाटन डॉ.बी. सुरेश यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणामध्ये डॉ. बी. सुरेश यांनी फार्मसी व्यवसायाच्या भवितव्यासाठी परिषदेतर्फे करण्यात येणाऱ्या विविध उपायांची माहिती दिली. अन्न व औषध प्रशासनाचे माजी सहआयुक्त व महाराष्ट्र फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बी.ई. खोमणे यांनी आपल्या भाषणामध्ये संघटनेने शासनाकडे केलेल्या विविध मागण्यांचा ऊहापोह केला. त्यामध्ये फक्त फार्मासिस्टनाच औषधी परवाने मंजूर करणे, औषधी उत्पादकांमध्ये वितरक म्हणून तालुका पातळीवरील अनुभवी फार्मासिस्टना वितरण एजन्सीचे अधिकार मिळणे, जे औषधी दुकान मालक स्वत: फार्मासिस्ट आहेत त्यांचे नफ्याचे प्रमाण वाढवून द्यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे मुखपत्र ‘आम्ही फार्मासिस्ट’ या अंकाचे प्रकाशन डॉ.आर.एस. गौड यांच्या हस्ते करण्यात आले. फार्मसी व्यवसायात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविणाऱ्यांचा एमपीए अ‍ॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. संघटनेचे सचिव व्ही.डी. पाटील यांचेही यावेळी भाषण झाले.