Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

व्यक्तिवेध

कॅप्टन डी. बोस. खरे तर सामान्य माणसाला हे नाव माहीत असण्याचे तसे काहीच कारण नाही. मात्र एअर इंडियामध्ये त्या वेळेस म्हणजे तब्बल ३८ वर्षांपूर्वी कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला हे नाव पक्के ठाऊक होते. आता हे नाव आठवण्याचे कारणही तसे विशेषच आहे. कारण १८ एप्रिल रोजी म्हणजेच बरोब्बर आजपासून ३८ वर्षांपूर्वी भारतीय विमानसेवेत एक नवा अध्याय रचला गेला. त्याची सुरुवात केली ती कॅप्टन डी. बोस यांनी. पहिले बोईंग ७४७ भारतीय धावपट्टीवर उतरले, त्यावेळेस त्याचे सारथ्य करणारे वैमानिक होते, कॅप्टन डी. बोस. बोईंग भारतात उतरणे ही त्यावेळेस

 

विकसनशीलतेच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या भारतासारख्या देशासाठी खूपच मोठी बाब होती. भारतातील त्याआधीची हवाई क्षेत्रातील मोठी घटना घडली होती ती १९३२ साली जे. आर. डी. टाटांनी केलेला कराची ते मुंबई प्रवास ही. त्यासाठी त्यांनी हलक्या वजनाचे पुस मॉथ विमान वापरले होते. ती भारताच्या हवाई प्रवासाची नांदी ठरली होती. त्यानंतरच्या मोठय़ा घटनेसाठी मात्र बराच काळ जावा लागला. योगायोग म्हणजे कॅप्टन डी. बोस सारथ्य करत असलेले हे बोईंग ७४७ धावपट्टीवर उतरले तेव्हा स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्यांमध्ये स्वत: जेआरडी जातीने हजर होते. विमान उतरल्यानंतर त्यांनी पुढे होऊन कॅप्टन बोस यांचे हस्तांदोलन करत स्वागत केले. त्यावेळेस झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये बोस यांनी आपल्या १७ जणांच्या केबिन क्रूची नावे सांगितली. आणि सर्वांची नावे ओठावर कशी काय? याचे आश्चर्यही टाटांना वाटले होते. पण तीच तर खासियत होती बोस यांची. हाती घेतलेल्या कामामध्ये नेमकेपणा, हा त्यांचा विशेष गुण होता. किंबुहना म्हणूनच तर पहिले बोईंग भारतात आणण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्या पहिल्या बोईंगचे आपण केलेले नामकरण होते, सम्राट अशोक. १९६९ साली पहिले बोईंग उडाले आणि त्यानंतर दोन वर्षांंतच भारतात पहिले बोईंग उतरले. बोईंगच्या कॉकपीटमध्ये बसण्यापूर्वी कॅप्टन बोस यांनी अनेक विमाने यशस्वीरित्या हाताळली होती. १९४६ साली डाकोटापासून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर ७०७ पिस्टन इंजिन. मात्र बोईंग ७४७ ची मजा काही वेगळीच होती, असे कॅप्टन बोस आजही सांगतात. तत्कालीन विमानांपेक्षा बोईंग अडीचपट मोठे होते. बोईंगचा भारतीय हवाई हद्दीतील प्रवेश आठवला की, कॅप्टन बोस आजही थरारून उठतात. भारतीय हद्दीत त्यांचे स्वागत भारतीय हवाई दलाच्या दोन मिग विमानांनी केले. बोईंगला दिलेला तो आगळा मान होता. आणि स्वागताला स्वत: टाटा हजर होते. जेआरडी त्यावेळेस एअर इंडियाचे चेअरमन होते. बोईंग हे त्यावेळचे जगातील सर्वात मोठेच नव्हे तर सर्वात वेगवान विमानही होते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या ८५ टक्क्यांएवढा होता. आंतरखंडीय झेप घेऊन शकणारे आणि न थांबता सलग प्रवास करणारे असे ते त्यावेळचे एकमेव विमान होते. त्यामुळेच त्याला जेट युगाची सुरुवात करून देणारे विमान असेही म्हणतात. महाकाय विमानाच्या वरच्या बाजूस एक उंचवटा असल्याने त्याचा आकार व्हेल माशासारखा दिसत होता. त्यामुळे त्याला त्यावेळेस आकाशातील व्हेल असेही म्हटले जात होते. बोईंगचा विषय निघाला की, कॅप्टन बोस आजही गहिवरून येतात. ते म्हणतात. बोईंगच्या कॉकपीटमधील प्रवेशाचा तो क्षण आजही आठवतो. अतिशय आरामदायी आणि नव्या यंत्रणेने सुसज्ज असे ते कॉकपीट होते. पण हे विमान चालविणे हा देखील एक वेगळाच अनुभव होता. आकाराने अडीचपट असलेल्या या विमानासाठीचे गणितच पूर्णपणे वेगळे होते. पण हे सारे आपण करू शकतो, असा विश्वास वरिष्ठांना वाटला आणि म्हणून आपली निवड करण्यात आली. ती निवड नव्हती तर तो मान होता, असे आजही कॅप्टन बोस यांना वाटते. सम्राट अशोकनंतर शहाजहान, राजेंद्र चोला, विक्रमादित्य आणि अकबर असे नामकरण केलेली विमानेदेखील एअर इंडियाच्या सेवेत दाखल झाली. यातीलही काही बोईंग भारतात आणण्याचा मान बोस यांना मिळाला. मात्र तरीही त्यांना सर्वात महत्त्वाचे वाटते ते बोईंगचे पहिले उड्डाणच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच कॅप्टन डी. बोस यांना नंतर एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक होण्याचाही मान मिळाला.