Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

विशेष लेख

युगप्रवर्तक डार्विन

गेल्या शतकात असाधारण बुद्धिमत्तेचे जे दोन महापुरुष झाले, त्यांच्यापैकी चार्ल्स डार्विन हे एक होते. कार्ल मार्क्‍सचे सहकारी फ्रेड्रिक एंगल्स यांनी एके ठिकाणी लिहिले आहे की, डाíवन व मार्क्‍स हे आजच्या काळातील दोन क्रांतिकारक आहेत. डार्विन यांनी सजीव निसर्गसृष्टीच्या विकासाचा सिद्धांत मांडला तर मार्क्‍स यांनी मानवी इतिहासाच्या विकासाचा सिद्धांत मांडला!
२७ डिसेंबर १८३१ रोजी बिगल बोटीवरून चार्ल्स डार्विन निसर्गवादी म्हणून जगप्रवासास निघाले. डार्विन यांच्याकडे पाहून कॅप्टन फिट्झरॉय म्हणाले, ‘या माणसाच्या नाकाचा आकार असा आहे की त्यावरून चांगला संशोधक होण्यास आवश्यक ती मनोवृत्ती असल्याचे दिसत नाही.’ पुढे कॅप्टन फिट्झरॉय यांनी आपले मत बदलले आणि डार्विन यांना आपल्या बोटीवर घेतले. अन्यथा जग मानववंशाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतासारख्या युगप्रवर्तक कार्याला मुकले असते!

 


डार्विन यांचे वडील रॉबर्ट पेशाने डॉक्टर तर आई गृहिणी होती. चार्ल्स चिंतनशील होते. सभोवतालच्या वातावरणाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची त्यांना सवय होती. लहानपणापासूनच ते निसर्गातील दगड, गारगोटय़ा, शंख, पक्ष्यांची अंडी, फुले वगैरे गोळा करून त्यासंबंधी विचार करीत. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण चार्ल्स यांना डॉक्टरकीत अजिबात रस नव्हता. विशेषत: शस्त्रक्रिया पाहण्याचे त्यांना धाडस होत नसे. एकदा एका लहान मुलावर शस्त्रक्रिया चालू असताना ते खोलीबाहेर पसार झाले. आपल्या मुलाला डॉक्टर होण्यात रस नाही, हे कळल्यावर रॉबर्ट डार्विन यांनी चार्ल्सना धर्मोपदेशक करण्याचे ठरविले. स्वत: चार्ल्ससुद्धा लहानपणी धार्मिक वृत्तीचे होते. दररोज शाळेला जाण्यापूर्वी ते प्रार्थना करीत. त्यांनी सुमारे तीन वर्षे केंब्रिज येथील ख्राइस्ट कॉलेजमध्ये धर्मशास्त्राचा अभ्यासही केला. त्यांची प्रख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक हेन्स्ली यांच्याशी तिथेच भेट झाली. त्यांच्या शिफारशीमुळे डार्विन यांना बिगल बोटीवरून निसर्गवादी म्हणून प्रवास करण्याची संधी मिळाली होती.
बिगल बोटीने डार्विन यांनी पाच वर्षे प्रवास केला. या काळात त्यांनी जगातील अनेक नैसर्गिक रहस्ये व जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचे अवलोकन केले. इतकेच नव्हे, तर परत येताना त्यांनी निसर्गातील अनेक गोष्टींचा उत्कृष्ट संग्रह आणला. तसेच, या प्रवासामुळे भूगर्भशास्त्र व प्राणिशास्त्राविषयी त्यांना बरीच माहिती मिळाली. या प्रवासासंबंधी स्वत: डार्विन एकदा म्हणाले, ‘या प्रवासामुळे माझे जीवनच बदलून गेले. मला खरेखुरे शिक्षण मिळून माझ्या निरीक्षणशक्तीत खूप सुधारणा झाली.’
सन १८४२ मध्ये डार्विन यांनी नैसर्गिक उत्क्रांतीच्या सिद्धांतासंबंधी ३५ पृष्ठांचा प्रबंध तयार केला. पुढे त्यांनी त्यात आणखी भर घालून एकंदर २३० पृष्ठांचे हस्तलिखित तयार केले. सन १८५६ मध्ये त्यांचे भूगर्भशास्त्रज्ञ मित्र लायल यांनी डार्विन यांना आपल्या पाहणीचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्याची सूचना केली. डार्विन यांनी त्यांचे म्हणणे मान्य करून आपल्या प्रबंधाच्या प्रसिद्धीची तयारी सुरू केली. त्यानुसार, २४ नोव्हेंबर १८५९ रोजी डार्विन यांनी आपला सिद्धांत ‘ओरिजिन ऑफ स्पिसिज’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १२५० प्रतींची होती आणि या सर्व प्रती प्रसिद्धीच्या दिवशीच संपल्या. प्राण्यांची प्रत्येक जात कशी बदलत गेली व त्यांचा नैसर्गिक रीतीने कसा विकास होता गेला, हे डार्विन यांनी या पुस्तकात विशद केले आहे. तोपर्यंत अनेकांचा असा समज होता की, मानव व इतर सर्व प्राणी परमेश्वराने वेगवेगळे निर्माण केले असून, त्यांचे वेगवेगळे अस्तित्व आहे. तसेच, प्राण्यांच्या या सर्व नैसर्गिक जाती अपरिवर्तनीय आहेत. डार्विन यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले की, एका नैसर्गिक जातीची उत्क्रांती दुसऱ्या जातीत होते व हा विकासाचा एक सामान्य नियम आहे.
‘ओरिजिन ऑफ स्पिसिज’नंतर डार्विन यांनी १८७१ मध्ये आपले ‘डिसेंट ऑफ मॅन’ हे दुसरे पुस्तक प्रसिद्ध केले. अनेकांचा असा समज आहे की, मनुष्य प्राणी हा वानराचा वंशज आहे, असा सिद्धांत डार्विन यांनी मांडला. वस्तुत: डार्विन यांनी असे कधीच म्हटले नव्हते. त्यांनी एवढेच सांगितले की, मनुष्य व वानर हे आता नामशेष झालेल्या इतिहासपूर्व काळातील एका सचेतन प्राण्याचे वंशज आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, वानर हा माणसाचा पूर्वज नसून, त्याचा दूरचा भाऊबंद आहे. डार्विन यांच्या मते मनुष्य प्राणी हा पृथ्वीवरील प्राणिजीवनाचा सर्वोच्च आविष्कार आहे. मनुष्य प्राण्याने ‘सर्वात लायक तोच टिकाव धरतो’ या सिद्धांतानुसार इतर प्राण्यांवर वर्चस्व मिळविले आहे. अर्थात सर्वात ‘लायक’ याचा अर्थ सर्वात ‘समर्थ’ असा नव्हे; तर ‘जगण्याची कुवत असलेला’ असे डार्विनच्या सिद्धांतात अभिप्रेत आहे.
डार्विन यांच्या सिद्धांतामुळे खळबळ उडाली व वादंग माजले. सर्व प्राणीमात्र परमेश्वराने स्वतंत्रपणे निर्माण केले आहेत, असे मानणाऱ्या धार्मिक लोकांनी डार्विन यांच्यावर जोरदार आक्षेप घेतला, तर वैज्ञानिकांनी डार्विन यांना जोरदार पाठिंबा दिला. अखेर या दोन्ही पक्षांनी संयुक्त सभा घेऊन आपापली बाजू मांडली. या सभेला स्वत: डार्विन हजर नव्हते. धार्मिक लोकांची बाजू मांडण्याचे काम ऑक्सफर्डचे बिशप विल्बरफोर्स यांच्याकडे होते, तर डार्विन यांच्या बाजूने हुकर व हक्सले हे दोघे वैज्ञानिक हजर होते. या सभेला स्त्रियाही मोठय़ा संख्येने हजर होत्या.
प्रथम धार्मिक लोकांची बाजू मांडण्यासाठी बिशप विल्बरफोर्स उठले. त्यांनी बायबलमधील वचनांचा आधार देत सांगितले की, हे जग व जगातील प्राणी परमेश्वराने निर्माण केले आहेत. पण एकंदरीत त्यांनी आपले भाषण पाठ केले होते आणि त्यांना जगाची अद्ययावत माहिती नव्हती, हे उघड होते. परंपरावाद्यांचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी एक्सले यांना व्यंगोक्तीपूर्ण आवाजात विचारले, ‘काय महाशय, तुम्ही पितामहांच्या बाजूने की मातामहांच्या बाजूने की माकडाचे वंशज आहात?’
डार्विन यांच्या सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी वैज्ञानिक हक्सले उभे राहिले. ते म्हणाले, ‘केवळ विज्ञानावरच्या प्रेमामुळे व विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी मी बोलत आहे. बिशप यांनी डार्विन यांचा सिद्धांत खोडून काढणारा एकही मुद्दा मांडलेला नाही. एकंदरीत अशा चर्चेत भाग घेण्याची बिशप यांची पात्रता नाही. ज्याने आपली संस्कृती व वक्तृत्व पूर्वग्रह व असत्य यांच्या कारणी लावले आहे, अशा माणसाचे वंशज होण्यापेक्षा एखाद्या माकडाचे वंशज होणे मी जास्त पसंत करीन!’ हक्सले यांच्या भाषणाचा सभागृहावर प्रभाव पडला. सभा संपण्याच्या सुमारास बिगल बोटीचे कॅप्टन फिट्झरॉय उभे राहिले. आपल्या कपाळावर हात मारून ते म्हणाले, ‘या सगळ्या प्रकाराला मीच जबाबदार आहे. मी जर डार्विन यांना बिगल बोटीवरून नेले नसते तर त्यांचा सिद्धांत तयार होण्याचा प्रश्नच आला नसता.’
अशात डार्विन मात्र शांतपणे आपल्या घरात बसले होते. ‘मी जर या वादविवादात भाग घेतला तर लागलीच मरण ओढवले असते.’ असे ते यावर म्हणाले. डार्विन यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना किंचितही गडबड सहन होत नसे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या कामासाठी शांतता व मानसिक स्वास्थ्य आवश्यक वाटायचे.
कादंबऱ्या वाचणे हा त्यांच्यासाठी विरंगुळा होता. ते स्वभावाने अत्यंत नम्र होते. एकदा ब्रिटनचे पंतप्रधान ग्लॅडस्टन त्यांना भेटायला गेले. ते परत गेल्यावर डार्विन म्हणाले, ‘ग्लॅडस्टन यांना आपण किती थोर आहोत याची कल्पना आहे, असे वाटत नाही. एखाद्या सामान्य माणसासारखे ते माझ्याशी बोलत होते.’ ग्लॅडस्टन यांच्या कानावर हे शब्द गेले तेव्हा ते म्हणाले,‘डार्विन यांची माझ्याविषयी जी भावना आहे तीच माझी त्यांच्याविषयी आहे.’
१९ एप्रिल १८८२ रोजी या महापुरुषाचे निधन झाले. आपला दफनविधी साध्या रीतीने व्हावा, अशी इच्छा त्यांनी मरणापूर्वी व्यक्त केली होती, पण त्यांचा दफनविधी त्यांच्या कीर्तीला साजेशा रीतीने करण्यात आला. त्यांच्या शवपेटीला हक्सले, वॉलेस, जेम्स रसेल यांच्यासारख्या थोर वैज्ञानिकांनी खांदा दिला होता. खगोलशास्त्रज्ञ सर ऐझ्ॉक न्यूटन यांच्या शेजारीच त्यांचे दफन करण्यात आले. ‘निर्मितीची सारी कल्पनाच बदलून टाकणारा महान विचारवंत’ अशी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
धार्मिक क्षेत्रातील लोकांनी मात्र ‘हा माणूस नरकात जाणार’ अशी ग्वाही दिली. इंग्लंडमधील एक म्हातारी म्हणाली, ‘परमेश्वराचे अस्तित्व डार्विनने नाकारले असले तरी परमेश्वर दयाळू आहे. तो डार्विनला क्षमा करेल.’
संजय चिटणीस