Leading International Marathi News Daily

बुधवार, १८ फेब्रुवारी २००९

विविध

संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराज!
कोल्हापूरकर म्हणून अभिमानाने ऊर भरून यावा, असा हृद्य कार्यक्रम आज दिल्लीत झाला. अनेक प्रतिष्ठेचे मानले जाणारे सरकारी कार्यक्रम त्यातल्या पोकळपणामुळे अतिसुरक्षेच्या जाचक नियमांमुळे मी टाळू लागलो आहे. अशा पाश्र्वभूमीवर या कार्यक्रमाला मात्र मी मुद्दाम उपस्थित राहिलो.कोल्हापुरात शिक्षण झाल्याने आणि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जगभर घेऊन वावरत असल्याने या कार्यक्रमात भाग घेतल्याचा मला विशेष आनंद होतो आहे. आज सकाळी दहा वाजता भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते संसदेच्या प्रांगणात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आणि नकळत डोळ्यात आनंदाश्रू झाले. डोळ्यांचे पारणे फिटले आणि मनाचेही पारणे फिटले.

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या १२ फूट उंच ब्रांझच्या पुतळ्याचे आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दिमाखदार अनावरण करण्यात आले. समारंभाला देशातील आणि महाराष्ट्रातील तमाम अग्रगण्य नेते उपस्थित होते. गेट क्रमांक सहाच्या हिरवळीवर आज सकाळी बरोबर दहा वाजता राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कळफलकावरील बटण दाबून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले.

बेळगावातील मराठी भाषिकांवर अत्याचार थांबवा
चिदंबरम यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
बेळगावात मराठी भाषिकांवर सुरु असलेला अत्याचार तात्काळ रोखण्यात यावा तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत आधीच धगधगत असलेल्या सीमाप्रश्नावर कन्नडिगांना नवा वाद उकरून काढण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी आग्रही मागणी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेऊन केली.महाराष्ट्र आणि कर्नाटक हे एकाच देशातील दोन राज्ये आहेत.

मुंबई हल्ल्यातील सहभागी आरोपींना पाकने दडवू नये-मुशर्रफ
इस्लामाबाद, १७ फेब्रुवारी/पी.टी.आय.

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी नागरिक तथा आरोपींचा सहभाग असेल तर त्यांना दडवून ठेवण्यात येऊ नये असे मत पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तान सर्व जगाला अंधारात ठेवून फसवू शकत नाही, असाही शेरा त्यांनी ओढला. मुख्य मुद्दा हा आहे की राष्ट्राने व राष्ट्राच्या नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाच्या दहशतवादाला विरोध केला पाहिजे.

‘महात्मा गांधींच्या वस्तूंचा लिलाव थांबवा’
दुबई, १७ फेब्रुवारी/पी.टी.आय.

अमेरिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या महात्मा गांधींच्या खासगी वस्तूंचा लिलाव तातडीने थांबविण्यात येवून, या वस्तू भारताने आपल्या ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी बाहरिनमधील भारतीय संघटनेकडून करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांचा चष्मा, चपला, ताट- वाटय़ा आणि काही वस्तूंचा पुढील महिन्यात खासगी संग्रहकांकडून लिलाव केला जाणार आहे. त्याबाबत या संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

स्वात खोऱ्यामध्ये शरियत लागू करण्याबाबत एकमत
इस्लामाबाद, १७ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

सध्या तालिबान पुरस्कृत दहशतवादाने गांजलेल्या स्वात खोऱ्यामध्ये इस्लामी शरियत कायदा लागू करण्याबाबत सोमवारी पाकिस्तानी सरकार आणि तालिबानींमध्ये झालेल्या कराराचा आदर करण्याचा निर्णय पाक लष्कराने घेतला आहे. लष्कर हे सरकारच्या आदेशावर काम करते. सरकारनेच स्वात खोऱ्यामध्ये लष्कराच्या कारवायांना लगाम घालण्याचे आदेश दिले.

जी-७ बैठकीच्या वेळी मद्यप्राशन; जपानच्या अर्थमंत्र्यांचा राजीनामा
टोकियो, १७ फेब्रुवारी/पीटीआय

रोम येथे झालेल्या जी-७ देशांच्या बैठकीच्या वेळी मद्यप्राशन केल्याच्या प्रकरणी जपानचे अर्थमंत्री शोईची नाकागावा यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी कावरू योसानो यांची नेमणूक केली आहे.पंतप्रधान तारो असो यांचे सरकार आधीच डळमळीत असताना आता हा आणखी एक हादरा बसला आहे.

मोबाईलवर नग्न छायाचित्रांमुळे मलेशियात महिला मंत्र्याचा राजीनामा
कौलालंपूर १७ फेब्रुवारी/पीटीआय

मलेशियातील प्रमुख विरोधी विधिमंडळ सदस्य असलेल्या महिलेने आज पदाचा राजीनामा दिला. तिची नग्नावस्थेतील छायाचित्रे मोबाईलवरून प्रसारित झाल्याने तिने राजीनामा दिला आहे. आपल्याला व पक्षाला बदनाम करण्याचा हा कट आहे, असे एलिझाबेथ वॉंग यांनी सांगितले. त्या सीलंगर प्रांताच्या कार्यकारी मंडळ सदस्य व ब्युकिट लांजन येथील विधिमंडळ सदस्य आहेत. या दोन्ही पदांचा राजीनामा देताना त्यांना अश्रू आवरले नाहीत. वॉँग या मलेशियातील आघाडीच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां आहेत. सध्याचे सरकार घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही हे त्यांच्या पीपल्स जस्टीस पार्टीचे पदाधिकारी ठरवतील.एलिझाबेथ वॉँग यांची ही छायाचित्रे त्या नग्नावस्थेत झोपल्या असताना घेण्यात आली असून ती मोबाईलवर प्रसारित झाली आहेत. वृत्तपत्रांनी मात्र ही छायाचित्रे प्रसिद्ध केलेली नाहीत. त्यांच्या या छायाचित्रांमुळे मलेशियात राजकीय वादळ निर्माण झाले आहे.वृत्तपत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ही छायाचित्रे त्यांच्या माजी मित्राने घेतली असावीत. वॉँग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मी काहीच चूक केलेली नाही. स्त्री म्हणून व एकटी व्यक्ती म्हणून या कृत्याविषयी मला काही वाटत नाही. मी कायदे मोडलेले नाहीत. प्रत्येकाला खासगी आयुष्य जपण्याचा अधिकार आहे.

मुंबई हल्ल्यातील आरोपीविरुद्ध पाकिस्तानची कारवाई
इस्लामाबाद, १७ फेब्रुवारी / पी. टी. आय.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि ‘जमात-उद दवा’ या दहशतवादी संघटनेचा नेता नझीर अहमद याला रावळपिंडी येथून लाहोरला हलविण्यात आले असल्याचे वृत्त आहे. नझीर अहमदला डिसेंबरपासून त्याच्या राहत्या घरामध्येच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तान सरकारने जमातविरुद्ध केलेल्या कारवाईत पाकिस्तान लष्करामधील निवृत्त कर्नल असणाऱ्या अहमदला ५० इतर नेत्यांसोबत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला त्याच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सोमवारी काल त्याला कडेकोट बंदोबस्तात लाहोरला हलविण्यात आले. याखेरीज त्याच्यावरील कारवाईबद्दल कोणतेही अधिक वृत्त मिळालेले नाही. मुंबईवरील हल्ल्याशी संबंधित नऊ संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाईल, असे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी गेल्या आठवडय़ात म्हटले होते. त्यानुसारच ही कारवाई केली गेली आहे.

सपा-काँग्रेसची युती तुटल्यास दिग्विजयसिंग हे दोषी -अमरसिंह
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी / पी. टी. आय.

काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची युती तुटली तर त्याला काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनाच जबाबदार धरावे लागेल, असे सांगून समाजवादी पार्टीचे सरचिटणीस अमरसिंह यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसला १५ पेक्षा अधिक जागा देण्यास स्पष्ट नकार दिला.ते म्हणाले, काँग्रेसला कठीण काळात समाजवादी पार्टीने मदत केली, त्याबद्दल आमच्या पक्षाचे ऋण व्यक्त करण्याऐवजी काँग्रेसचे नेते बेजबाबदार वक्तव्येच करीत सुटले आहेत. काँग्रेस कटोरा गेऊन समाजवादी पार्टीच्या दारात भीक मागण्यासाठी गेलेली नव्हती, असे वक्तव्य गेल्या आठवडय़ात दिग्विजयसिंग यांनी केले होते. त्यावर अमरसिंह यांनी आज संताप व्यक्त केला. ते काँग्रेस व समाजवादी पार्टीत दरी निर्माण झाली तर दिग्वीजयसिंग दोषी ठरतील. ते भिकारी आहेत, असे मी म्हणत नाही आणि मीसुद्धा भिकारी नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात डाव्यांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मात्र सपानेच संयुक्त पुरोगामी आघाडीला पाठिंबा देऊन सरकार तारले.