Leading International Marathi News Daily                               गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९

राज्यात शिवसेनेशी युती नाही
शरद पवार यांचे स्पष्टीकरण
सांगली, १८ फेब्रुवारी / प्रतिनिधी
महाराष्ट्रात समविचारी पक्षांना बरोबर घेऊनच आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी करावी लागेल, असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच काँग्रेसने देशपातळीवर यूपीएतील घटक पक्षांशी आघाडी करावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचा राहील. तरीही काँग्रेसने आपल्या धोरणात बदल न केल्यास महाराष्ट्र वगळता अन्य राज्यात स्थानिक पक्षांशी आघाडी करण्याचा मार्ग मोकळा असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

काँग्रेस संभ्रमात
मुंबई, १८ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांची पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर केल्यापासून काँग्रेस नेतृत्व अधिकच सावध झाले असतानाच समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग व त्यापाठोपाठ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पवारांची भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये पवारांबद्दल संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या भेटीच्या वेळी राज्यातील राजकीय परिस्थितीबरोबरच राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल आढावा घेतला.

भाजपला घटस्फोट देण्यास शिवसेना तयार!
संदीप प्रधान
मुंबई, १८ फेब्रुवारी

शिवसेना-भाजपचे नाते पती-पत्नीचे आहे. नवरा सकाळी बायकोला मारतो आणि संध्याकाळी सिनेमाला घेऊन जातो. तसेच युतीमधील या पक्षांचे आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. परंतु आता शिवसेना-भाजपमधील संबंध अधिकच बिघडले असून घटस्फोट होण्याची चिन्हे दिसत आहेत. अर्थात यापूर्वी चिमूरची पोटनिवडणूक आणि राष्ट्रपती निवडणूक यावेळी अशीच परिस्थिती निर्माण होऊनही युती तुटली नव्हती. मात्र आता प्रश्न सत्तेचा आहे.

भाजप नेत्यांची मोदींच्या दरबारात हजेरी
मुंबई, १८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

शिवसेनेच्या वाघाने युती तोडण्याच्या डरकाळ्या देण्यास सुरूवात केल्यावर महाराष्ट्रातील भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे यांनी गुजरातमधील भाजपचे हिंदुह्रदयसम्राट नरेंद्र मोदी यांच्या दरबारात हजेरी लावून चर्चा केली. भाजपची शिवसेनेबरोबर निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. परंतु काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर कोणते नवे मित्र जोडता येतील, यावर बैठकीत उहापोह करण्यात आला.

घातपाती कारवायांसाठी तयार होताहेत ‘महिला फिदाईन’!
निशांत सरवणकर
मुंबई, १८ फेब्रुवारी

मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाती कारवाया घडविण्यासाठी लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेकडून आता महिला फिदाईन तयार केल्या जात आहेत. यापैकी पाच महिलांचा एक गट भारतात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात असलेल्या सबाउद्दीन अन्सारी या ‘लष्कर’शी संबंधित अतिरेक्याने दिली आहे. मात्र याबाबत तो अधिक तपशील पुरवू शकलेला नाही. त्यामुळे या माहितीबाबच भारतीय गुप्तचर विभागामार्फत देशातील सर्वच पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. या महिलांवर तूर्तास भारतातील काही महत्त्वाच्या आणि संवेदनाक्षम ठिकाणांची माहिती काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अफगाणिस्तान ओबामांचे व्हिएतनाम ठरू शकेल
बिल क्लिंटन यांचा इशारा
वॉशिंग्टन, १८ फेब्रुवारी/वृत्तसंस्था
गेल्या शतकात ब्रिटन अथवा रशियाने अफगाणिस्तानात जे काही केले तसाच काही प्रकार बराक ओबामा यांनी आता करण्याचा प्रयत्न केला तर अफगाणिस्तान हे त्यांचे ‘व्हिएतनाम’ ठरू शकेल, असा इशारा ओबामांचे पूर्वसुरी बिल क्लिंटन यांनी दिला आहे. सीएनएन या वृत्तवाहिनीवर लॅरी किंग यांनी घेतलेल्या मुलाखतीत बिल क्लिंटन यांनी हा इशारा दिला आहे. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी अथवा १९८० मध्ये रशियाने अफगाणिस्तानमध्ये जे काही केले तसे काही ओबामांनी केले तर तेथे ‘ओबामांचे व्हिएतनाम’ होईल, असे क्लिंटन म्हणाले.

‘लोकसत्ता’तील ‘संग्रहचित्र’मुळे मिळाला नगरच्या वस्तूसंग्रहालयास आधार
नगर, १८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीतील ‘संग्रहचित्र’ मालिकेत नगरच्या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयावर लेख प्रकाशित होताच या संस्थेचे दुर्दैवाचे दशावतार दूर व्हायला सुरुवात झाली. संग्रहालयाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनेकांनी लगेच मदतीचा हात पुढे केला. लेख वाचून नगरच्या एका महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे संग्रहालयात येऊन पडेल ते काम करण्यास आम्ही तयार आहोत, असे म्हणत आपला सहभाग देऊ केला. दि. ८ फेब्रुवारीच्या अंकात नगरच्या वस्तूसंग्रहालयाविषयी लेख प्रसिद्ध झाला. संग्रहालयातील विविध दुर्मिळ वस्तू, दस्तऐवजांची श्रीमंती आणि दुसरीकडे संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे सुरू असलेली परवड याविषयी या लेखात नेमकेपणाने प्रकाश टाकण्यात आला आहे.

वृद्ध माता-पित्याची जबाबदारी टाळणाऱ्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास; मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई, १८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांना वृद्धापकाळी सामान्य जीवन जगता यावे व त्यासाठी त्यांची मुले आणि नातेवाईक यांनी जबाबदारी स्वीकारावी या बाबीचा समावेश असलेला, आई-वडील, ज्येष्ठ नागरिक यांचा चरितार्थ व कल्याण अधिनियम महाराष्ट्रात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय येत्या १ मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींवर ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे त्या व्यक्तीने ही जबाबदारी टाळली तर त्याला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा किंवा पाच हजार रुपये दंड अशा दोन्ही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकारचे गुन्हे दखलपात्र आणि जामीनपात्र करण्यात आले आहेत. यासंदर्भातील खटले न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे चालविले जातील. चरितार्थाची व्याख्या यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा यांचा समावेश करण्यात आला आहे. पालकाच्या व्याख्येत आई-वडील तसेच मुलांना दत्तक घेतलेले आई-वडील यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या व्याख्येत ज्याचे वय ६० वर्ष आहे अशा व्यक्तींचा समावेश आहे. नातेवाईक या व्याख्येमध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांना मूलबाळ नाही परंतु कायदेशीर वारस आहे व ज्या ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती वारसा हक्काने मिळण्याचा हक्क असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

‘जिओ’ वाहिनीच्या पत्रकाराची स्वात खोऱ्यामध्ये हत्या
इस्लामाबाद, १८ फेब्रुवारी/पीटीआय

तालिबान्यांचे वर्चस्व असलेल्या पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात दोन धार्मिक नेत्यांदरम्यानच्या चर्चेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या ‘जिओ’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अज्ञात हल्लेखोरांनी आज गोळ्या घालून ठार मारले. ‘जिओ’ वृत्तवाहिनीच्या या पत्रकाराचे नाव मुसा खान खेल असून तो २८ वर्षे वयाचा होता. पाकिस्तान सरकारने एका तालिबानी गटाबरोबर शांती करार केल्याने स्वात खोऱ्यात वादळ निर्माण झाले आहे. तालिबानचा नेता मौलाना फझलुल्लाह व त्याचे सासरे मौलाना सुफी मोहम्मद यांनी वायव्य सरहद्द प्रांताच्या सरकारशी शरियत कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत करार केला होता. त्यासंदर्भात दोन धार्मिक नेत्यांमधील चर्चेचे वृतांकन करण्यासाठी गेलेल्या ‘जिओ’ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची आज अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.

कसाबला हवाली करा; पाकिस्तानच्या डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरलची भारताकडे मागणी
इस्लामाबाद, १८ फेब्रुवारी/पी.टी.आय.

मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्यांपैकी एकमेव जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल अमीर कसाब याला भारताने पाकिस्तानच्या हवाली करावे अशी मागणी पाकिस्तानचे डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल सरदार मोहम्मद गाझी यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. मात्र अशी मागणी पाकिस्तानने औपचारिकरित्या भारताकडे केली नसल्याचे पाकिस्तानने आज स्पष्ट केले. या म्हणण्याला भारतानेही पुष्टी दिली.मुंबईवर झालेल्या हल्ल्यांप्रकरणी संशयितांवर खटले चालविण्यासाठी नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील आणि डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल सरदार मोहम्मद गाझी यांनी कसाबला पाकिस्तानच्या हवाली केले न गेल्यास या हल्ल्यांमधील इतर संशयितांवर खटले चालविणे मुश्किल होईल असे म्हटले आहे. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना भारताकडून या मागणीचा सकारात्मक विचार होईल, कारण कसाबच्या ताब्याशिवाय इतर संशयितांवर खटले चालविणे अवघड जाईल. त्यामुळे भारत या मागणीकडे विचारपूर्वक लक्ष देईल असे गाझी यांनी म्हटले आहे. गाझी यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना पाकिस्तानी परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, कसाबाला हवाली करावे अशी मागणी औपचारिकरित्या भारताकडे करण्यात आलेली नाही. दरम्यान पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या प्रवक्त्यानेही सांगितले की, कसाबला हवाली करण्यासंदर्भात पाकिस्तानने भारताकडे औपचारिक मागणी केलेली नाही.

अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणखी १७,००० सैनिक पाठविणार
वॉशिंग्टन, १८ फेब्रुवारी/पी.टी.आय.

अफगाणिस्तानच्या पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेनजिकच्या स्वात खोऱ्यात पाकिस्तानने केलेला शस्त्रसंधी आणि तालिबान्यांशी केलेला करार आणि तालिबान्यांनी हा आपला विजय असल्याचे मानून काढलेली विशाल ‘विजय यात्रा’ या सर्व घटनांनी चिंतीत झालेल्या अमेरिकेने अफगाणिस्तानात आणखी १७ हजार अमेरिकी सैनिक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. अल- काइदा आणि तालिबानी अतिरेक्यांना संपविणे आणि दहशतवादाचा प्रसार रोखणे ही आपली दोन मुख्य उद्दिष्टे असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या निमित्ताने म्हटले आहे. युद्धाने जर्जर झालेल्या अफगाणिस्तानातील स्थिती अद्याप ‘विजय मिळवता येईल’ अशी असल्याचे विश्लेषण ओबामा यांनी केले आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच लष्करी निर्णयात त्यांनी अफगाणिस्तानात आणखी सैन्य पाठविण्याचे ठरविले आहे. अफगाणिस्तानातील ढासळती परिस्थिती सावरण्यासाठी हे सैन्य उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती झपाटय़ाने अमेरिकेच्या हातून निसटत असल्याचा अहवाल ओबामा यांच्या लष्करी सल्लागारांनी दिला आहे. या पाश्र्वभूमीवर आपण पाठविलेले सैन्य तेथील युद्धस्थितीची दिशा बदलतील, असे ओबामा यांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानमध्ये जेवढे हवे तेवढे लक्ष अमेरिकेने अद्याप दिलेले नाही. मात्र आता अधिक सैन्य तेथे पाठविल्याने अफगाणिस्तानातून अल -काइदाला हद्दपार करता येईल, आणि दहशतवाद आणखी पसरणार नाही तर कमीकमी होत जाईल, असे ते म्हणाले.

 


प्रत्येक शुक्रवारी