Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

डिप्लोमसी
ही आहे व्हिवा सोसायटी. या सोसायटीमधली वेगवेगळी कुटुंब, त्यातील सदस्य वाचकांच्या भेटीस येतील, ‘घरोघरी’ मधून..

नीरज : हॅलो मानसी, कशी आहेस?
मानसी : ..
नीरज : मानसी, फोन ठेवू नकोस, प्लीज.. मला बोलायचय.
मानसी : सॉरी, पण मला बोलायचं नाहीये.
नीरज : का पण? मी केव्हाचा फोन करतोय तुला आणि तू फोन उचलतच नाहीयेस.
मानसी : ते पुरेसं नव्हतं का तुला कळायला- मला तुझ्याशी बोलायचं नाहीये.
नीरज : अगं, पण का? काय झालंय ते सांगशील का नाही?
मानसी : जसं काही तुला माहितीच नाहीये.
नीरज : नाही कळत मला. तू सांगितलंस तर काही बिघडेल का?
मानसी : नाही नां तुझं तुला कळत? वाटलंच होतं मला. कुठलीही गोष्ट सीरियसली घेताच येत नाही तुला.
नीरज : बोंबला म्हणजे परवा जे घडलं, तेच अजून तुझ्या डोक्यात आहे हो!
मानसी : म्हणजे? जे झालं ते सीरियस नव्हतं? काय गरज होती रे तुला, माझी चूक जाहीर करण्याची!
नीरज : I am sorry Manasi...
मानसी : खरं तर तू बोलला नसतास ना, तर कुणाच्या लक्षातही आलं नसतं.
नीरज : मानसी, सॉरी..
मानसी : माझी चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मी लगेच तुला ‘सॉरी’ म्हटलं होतं. स्वत:हून. याचाच अर्थ माझी चूक मला मान्य होती. खरं तर हा विषय तिथंच संपायला हवा होता. मग परवा सगळ्यांसमोर मुद्दाम परत कशाला काढायला हवा होता?
नीरज : हेच लॉजिक लावायचं तर परवापासून मी किती वेळा तुला ‘सॉरी’ म्हणालो, म्हणतोय, मग तू का हा विषय संपवत नाहीयेस?
मानसी : ‘सॉरी’च्या पाश्र्वभूमीत फरक आहे. म्हणजे माझ्या हातून अनवधानानं चूक घडली होती. ती क्षम्य असते, पण मुद्दाम केलेली चूक ही अक्षम्य असते. कळलं?
नीरज : मान्य आहे मला, पण त्याच्यावरून अशीच भांडत राहणार आहेस का?
मानसी : भांडायचं मलाही नाहीये, पण परवाच्या तुझ्या वागण्यात मी इतकी अपसेट झालेय की, मला normal self ला येताच येत नाहीये.
नीरज : ..
मानसी : आणि नीरज, हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाहीय. या आधीही घडलंय. चार लोकं जमले ना की, तुला जरा चेवच येतो. काय बोलतोय, कुठे बोलतोय, याचं काही भानच राहत नाही तुला.
नीरज : असं काही नाहीय हं!
मानसी : तस्सच आहे, अनुभवलं आहे म्हणून इतक्या ठामपणे सांगते आहे. आपल्या दोघांमधल्या गोष्टी तू कसा काय रे असा चारचौघात डिस्कस करू शकतोस?
नीरज : त्यात काय एवढं? सगळ्यांच्या घरी तेच असतं. ते बोलत नाहीत. मी बोलतो.
मानसी : करेक्ट. आता तुझं तूच मान्य केलंस की, ते बोलत नाहीत. मी बोलतो. त्यालाच माझं ऑब्जेक्शन आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर बोलूच नयेत. मला नाही आवडत.
नीरज : अग, पण.. आता कुठली गोष्ट चारचौघात बोलायची आणि कुठली नाही, ते कसं ठरवायचं?
मानसी : त्यासाठी ना फक्त डिप्लोमसी लागते. मॅच्युरिटीही लागते. तीच नेमकी नाही तुझ्याजवळ. खरं तर जगात एवढे विषय आहेत, ते सोडून पर्सनल गोष्टींचा कशाला रे एवढा ढिंढोरा पिटायचा?
नीरज : माझे आई.. बस कर ना आता.. चुकलो म्हटलं ना मी!
मानसी : बरं, हा विषय आता वाढवू नकोस म्हणून तुला डोळ्यांनी खुणा करतेय, तर तिकडेही तुझं लक्ष नाही.. सगळेजण चेष्टेत सामील झाल्यावर तर तू जास्तच चेकाळला होतास.
नीरज : चुकलो! चुकलो!! चुकलो!!! आता परत अशी चूक होणार नाही.
मानसी : कुणास ठाऊक? तीन वेळा तर माझ्यासमोर झालंय. माझ्या मागे काय बडबडतोस कुणास ठाऊक?
नीरज : मानसी, हे आता अती होतय हं!
मानसी : का रे, स्वत:वर बाजू उलटल्यावर अती झालं का? आता कळलं, कसा त्रास होतो ते. तरी आता आपण दोघंच आहोत. अजून चारजणं असले की, हाच त्रास चौपट होतो. कळलं ना?
नीरज : कळलं.
मानसी : आणि काय रे, माझ्या चुकांची- स्वभावाची एवढी जाहीर खिल्ली उडवतोस, जसा काही तू कधी चुका करतच नाहीस. स्वभावानंही अगदी सद्गुणाचा पुतळाच आहेस.
नीरज : असं कुठे म्हणतोय मी?
मानसी : म्हणायला कशाला हवं? आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो ना, तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात. या तीन बोटांचा ज्याला विसर पडलो तोच दुसऱ्यांकडे बोट दाखवतो.
नीरज : ..
मानसी : आणि याच तीन बोटांचं भान ठेवणारा इतरांच्या चुकांना सांभाळून घेतो. त्यामुळेच आतापर्यंत तुझ्या हातून झालेल्या चुकांना मी कायम सांभाळून घेत आले. दोघांच्या पलीकडे कळलंही नाही कुणाला. अगदी आई-बाबा-मधुरालासुद्धा. आणि तू?
नीरज : समजा, मी बोललो सगळ्यांच्या समोर तर त्याचा एवढा गहजब कशाला?
मानसी : हो? मग मीही आता तुला सांभाळून घेणार नाही. तुझी सगळी अंडीपिल्ली बाहेर काढेन.
नीरज : ह्या.. त्यात काय एवढं! काढ ना! मला नाही काही वाटत! आपलं सगळं कसं खुल्लमखुल्ला असतं. एकदम ट्रान्सपरन्ट.
मानसी : हो ना! ठरलं तर मग. यापुढे आपण सगळ्या गोष्टी ‘खुलेआम’ करूयात. अशी ‘खुली किताब’ लोकांसमोर वाचायला ठेवली तर त्यांना काय? चवीचवीनं वाचतील. त्यांना असं काही तरी ‘स्कॅण्डल’ हवंच असतं. ते आपण पुरवूया. नाही का? कशी काय वाटतेय कल्पना? नीरज अ‍ॅण्ड मानसी स्कॅण्डल सप्लायर..
नीरज : मानसी, वाकडय़ात शिरते आहेस आता तू. मला असं नव्हतं म्हणायचं.
मानसी : तुझ्या मनात काहीही असलं तरी लोकं त्याचा अर्थ त्यांना हवा तसाच लावतात. त्यांना दुसऱ्यांबद्दल, दुसऱ्यांच्या चुकांबद्दल, दोषांबद्दल बोलायला आवडतंच. It's a human tendency आणि त्यांची ती हौस तुमच्यासारखे बकरे पुरवतात.
नीरज : आता यापुढे माझ्या हातून अशी चूक होणार नाही, promise.
मानसी : असं नुसतं म्हणून होतं का? हे तुझं नेहमीचंच झालंय. तू असं काही तरी वेडय़ासारखं वागायचंस, जे मला पटत नाही. मग मी रागवते, तू माझा राग काढायचा प्रयत्न करतोस..
नीरज : अरे रानी, तुम कितना भी घुस्सा हो जाओ. हम मना लेंगे.
मानसी : नीरज, उगीच फालतू फिल्मी डायलॉग टाकू नकोस. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहतोय.
नीरज : मानसी, मला काय वाटतंय, हा वाद नुसतं फोनवर बोलून संपणार नाही. त्यापेक्षा आपण भेटू या.
मानसी : त्यानं काय होईल?
नीरज : काय होईल? अग, भेट तर खरी. मग बघ. खूप दिवस झाले नाही आपल्याला भेटून?
मानसी : खूप दिवस? परवाच भेटलो होतो ना आपण?
नीरज : आणि तेव्हाच तर ते ‘रामायण’ घडलं ना. मग आख्खा एक दिवस म्हणजे २४ तास म्हणजे १४४० मिनिटं म्हणजे ८६,४०० सेकंद एवढा वेळ गेला मध्ये. अगं, तुझ्याशिवाय घालवलेला एकेक क्षण म्हणजे एकेक दिवस असतो गं..
मानसी : नीरज..
नीरज : मग, कुठे भेटतेस?
मानसी : वहीं.. जहाँ कोई आता जाता नहीं..
shubhadeyagmail.com