Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

वैदिक पद्धतीने विवाह करावा की नोंदणी पद्धतीने? यावर अनेकदा चर्चा होते. तरुण पिढी फक्त आचाराने आधुनिक आहे की विचारानेही? जून्या परंपरा काही प्रमाणात तरी बदलल्या पाहिजेत असं त्यांना वाटतं का? याचा आढावा घेणारं हे ‘ओपन फोरम’

मृण्मयी कानिटकर (एचआर)
वैदिक पद्धतीने विवाह करताना ज्या प्रथा पाळल्या जातात त्या आता कालबाह्य झाल्या असल्याने नोंदणी पद्धतीने विवाह करणं हे जास्त व्यावहारिक आहे असं मला वाटतं. वैदिक पद्धतीने विवाह करताना पैशाचा खूप अपव्यय होतो, त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाह व नंतर छानसं रिसेप्शन असं जर केलं तर त्यातून वाचणारे पैसे आपल्या भविष्यातील गुंतवणूक म्हणून साठवता येतात. ते दानच केले पाहिजेत असं नाही. नोंदणी पद्धतीने विवाह करताना मजा येत नाही, असं नेहमी म्हटलं जातं. पण वैदिक पद्धतीतील सर्व विधी पार पडेपर्यंत सगळे पाहुणे आणि स्वत: पती-पत्नी खूपच थकून गेलेले असतात. लग्न ही आयुष्यातील मोठी आणि आनंददायी घटना

 

असतेच, पण साधेपणाने ते साजरं करुनही त्यातून आनंद घेता येतोच ना!

मानसी चंदावरकर (एचआर)
वैदिक पद्धतीनेच विवाह करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. पण त्याचबरोबर वैदिक पद्धतीने लग्न म्हणजे खर्च असं जे समीकरण झालं आहे, ते मात्र मला पटत नाही. आपल्या संस्कृतीचा एक भाग म्हणून अशा प्रकारे लग्न करावं, पण त्याचबरोबर खर्चाला मर्यादा येतील हा देखील विचार व्हायला हवा. घरगुती छोटासा समारंभ करुन, अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांना बोलावून असा समारंभ करणं मला जास्त प्रशस्त वाटतं. खर्च कमी करुन ते तुम्ही गुंतवले पाहिजेत किंवा काही प्लॅनिंग केलंच पाहिजे असं नाही. पण लग्नाच्या निमित्ताने पैशाची जी उधळपट्टी होते, ते मात्र आपण नक्कीच थांबवू शकतो.

केदार केरकर (प्रोग्रॅमर)
वैदिक पद्धतीने विवाह करावा असं मला वाटतं. महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रथा व परंपरा जपल्या जातात. त्याचबरोबर नोंदणी पद्धतीने विवाह म्हणजेच कोर्टात जाऊन सह्या करताना आपल्याबरोबर काही मोजकेच जवळचे नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणी असतात. हेच आपण जेव्हा विधींनुसार लग्न करतो, त्यावेळी आपल्या जवळची अनेक माणसं त्या ठिकाणी उपस्थित असतात. कोणत्याही घरात लग्न समारंभ असताना त्या घरात एक वेगळंच उत्साहाचं वातावरण असतं. त्यात या पाहुण्यांची भर पडून उत्साह वाढतो. ही मजा नोंदणी पद्धतीने विवाह करुन नंतर रिसेप्शन करणं यात येत नाही.

सागर देशपांडे (उद्योजक)
मुलं आणि पालक यांच्या इच्छेचा मेळ घातला गेला पाहिजे. नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा पर्याय चांगला आहे. पण अनेकदा लोकांच्या इच्छेचा विचार करावा लागतो. मला स्वत:ला वैदिक पद्धतच आवडते. कारण आपण तेच लहानपणापासून बघत आल्याने तो संस्कार मनावर झालेला असतो. शिवाय लग्न कोणत्याही पद्धतीने केलं तरी पती आणि पत्नी एकत्र आल्यावर ते कशा प्रकारे राहतात हे जास्त महत्त्वाचं आहे.

लीना गोखले (एमडी - विद्यार्थिनी)
मला असं वाटतं की वैदिक पद्धतीने विवाह करणंच योग्य. लग्नासारखा कार्यक्रम काही पुन्हा पुन्हा येत नाही. त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र येतात. दरदूरचे नातेवाईक काही दिवसांसाठी एकत्र येतात. ही मजा, हा आनंद एकदाच जर करायची असेल तर ती का करु नय? त्यानिमित्ताने आपल्या परंपराही पाळल्या जातात.