Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’.
इंटरनेटच्या मायाजालाशी ज्यांचा नियमित संबंध येतो, त्यांना एव्हाना 14vidya_64kala हा याहूग्रुप परिचित झाला आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा १४ विद्या आणि ६४ कलांनी बहरलेली आहे. ‘श्री गणेशाला’ या १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानलं जातं. अशा या याहूग्रुपवर भारतीय कला आणि संस्कृतीशी निगडित अनेक विषयांचा ऊहापोह होत असतो. इथे नवनवीन गोष्टींची माहिती मिळत असते. देवाणघेवाण होत असते. या ग्रुपच्या एक दाक्षिणात्य सदस्य, कविता कल्याण यांना एक प्रश्न पडला आणि तोही एक कुतूहल म्हणून!
त्यांचा प्रश्न होता ‘अवघं विश्व शिवाजी महाराजांना जनतेचा लोकप्रिय राजा, एक उत्तम प्रशासक म्हणून ओळखतात. मात्र मराठी माणूस या राजाला ‘देवत्व’बहाल करतो, देव मानतो. जनतेच्या प्रती प्रेम दाखवणाऱ्या, जनतेचं कल्याण करणाऱ्या माणसाला ‘मखरात’ बसवायलाच हवं का? शिवाजी महाराज हे राजा की देव?
बापरे! कविताबाईंनी भलतंच धाडस केलं, हा प्रश्न विचारून! या ग्रुपवर इतर वेळी इतरांची मतं वाचून गप्प बसणाऱ्यांनी अचानक आपले की बोर्डस सरसावले. उत्तरांचा नुसता भडिमार! कोणी म्हणालं हाच तर आपल्या हिंदू धर्माचा विशेष गुण आहे की, इथे ३३ कोटी देवसुद्धा कमी पडतात आणि मग आपण वंदनीय, पूजनीय माणसांनाही देव मानून देवांच्या संख्येत भर वाढवतो. तर कोणी म्हणते त्यांचं व्यक्तिमत्त्व उमदं होतं, त्यांच्या मुत्सद्देगिरीचं करावं तेवढं कौतुक कमीच पडेल. कोणीतरी एका सदस्येनं तर जास्त श्रम न घेता, विकीपीडियाचं एक संकेतस्थळच भिरकावलं. घे बाई ही माहिती, कर काथ्याकूट!
पण खरंच या दाक्षिणात्य बाई म्हणतात, त्याप्रमाणे बहुतांश मराठी माणसे शिवाजी महाराजांना ‘देव’ मानत असतील? या देशात,

 

ज्यांच्या घरात गणपती, राम किंवा कृष्ण असतील त्यांना हिंदू म्हणून ओळखलं जातं. ज्यांच्या घराला हिरवा रंग असतो त्यांना मुस्लिम समजलं जातं, ज्यांच्या घरात येशू ख्रिस्त असतो आणि सरसकट सर्व बायका फ्रॉकमध्ये वावरतात, त्यांना ख्रिश्चन समजलं जातं. घरात बाबासाहेबांची तसबीर दिसली तर तो दलित आणि घरात शिवाजीमहाराजांचं चित्र किंवा प्रतिकृती दिसली, तर तो मात्र शिवसैनिक? असं का? शिवाजी महाराज म्हणजे कोणत्याही एका राजकीय संघटनेचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ नाहीत. मग इतरांना या जनकल्याण राजाच्या प्रतिमा बाळगायला संकोच का वाटावा?
बहुधा बऱ्याचशा बाबतीत आपण ग्लोबलायझेशनच्या नावाखाली आपली माणसे, आपली संस्कृती, आपला इतिहास यापासून थोडेसे बाजूला सरकून, ग्लॅमरायझेशनकडे वळतोय. मग ते आपलं राहणीमान असो किंवा शिक्षण! या ग्लॅमरायझेशनपायी शहरी वातावरणातली नवीन पिढी, शिक्षणाच्या बाबतीत तीन भागात विभागली गेली. एक आपलं मराठमोळं मराठी माध्यम, दुसरं आपलं नेहमीचं S.S.C. बोर्ड आणि आता मुलीपेक्षा पालकांनीच जास्त धसका घ्यावा, पण तरीही हवंहवंसं वाटावं असं I.C.S.E. किंवा C.B.S.E. बोर्ड! शिक्षण तेच. पण शिकण्याच्या तीन तऱ्हा!!
अशाच एका शाळेत इतिहासाच्या तासाला विद्यार्थ्यांला विचारलं जातं की, शिवाजी महाराजांची जन्मतारीख कोणती? ते पोरगं बिचारं, घरात शिवरायांची तसबीर, ठळकपणे भिंतीवर लावणाऱ्या कुटुंबातलं. त्याने उत्तर दिलेलं ‘फाल्गुन कृष्ण तृतीया’ पण त्याने स्वीकारलेली शिक्षण पद्धती म्हणते, ‘राँग! आन्सर शुड बी नाईन्टीन फेब्रुवारी!’ दिल्लीवरून ठरलेली तारीख आहे. शिक्कामोर्तब!!
झालं! शिवरायांच्या जन्मतारखेवरून वादळ..! मग अशा बातम्या देशभर पसरतात. आपल्या कर्तृत्वाने, मुत्सद्देगिरीने, कुशल संघटन कौशल्याने, प्रजेच्या हिताचाच सतत विचार करणाऱ्या शिवाजी महाराजांची दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत विपरीत ओळख झाली. मुळात हिंदू दिनदर्शिकेनुसार, तिथीप्रमाणे असलेल्या दिवसाची इंग्रजी तारीख शोधून काढून सरकारने काय साध्य केलं? त्यासाठी ठराविक मंडळींची कमिटी बनवून, कागदपत्रांचं विश्लेषण विच्छेदन करून, काथ्याकूट करून, इंग्रजी तारीख शोधण्यात वेळ आणि पैसा घालवून काय साध्य झालं? आज या देशातले अनेक नागरिक अजूनही आपली जन्मतारीख, तुळशीचं लग्न किंवा दसरा किंवा पानशेतचं धरण फुटलं तो दिवस असं सांगतात. ग्रामपंचायतीच्या आणि तलाठय़ाच्या दफ्तरी असेच उल्लेख असलेले किती तरी जन्मदाखले अजूनही सापडतील.
शिवरायांची इंग्रजी जन्मतारीख उकरून काढणं; किंवा जिथं कायम अतिरेक्यांच्या हल्ल्याची भीती बाळगली जाते, अशा विमानतळांना किंवा रेल्वे स्थानकांना नावं देऊन शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवणं याशिवाय सरकार अनेक गोष्टी करू शकतं. महाराष्ट्राचा पर्यटन व्यवसाय रोडावला आहे, अशी सतत रडकथा ऐकवण्याऐवजी पर्यटन महामंडळातर्फे, सामान्य जनतेसाठी शिवरायांच्या महाराष्ट्रातील किल्लेदर्शन अशी वेगळीच टूर काढून, सामान्य नागरिकांना शिवाजी महाराजांची महती, त्यांची शौर्यस्थळे दाखवून महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं ज्ञानप्रबोधन पर्यटनाच्या माध्यमातून करायला काय हरकत आहे?
मिलिंद वेर्लेकर नावाचा पुण्याचा एक तरुण गेली नऊ वर्षे शिवरायांची सर्वागीण माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल अशी वेबसाइट बनवण्यासाठी झटतोय. शिवकालीन घटनांवर आधारित २५०० पेक्षा जास्त रेखाचित्रं, १ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त अशी २८० किल्ल्यांची छायाचित्रं, या सर्व किल्ल्यांपर्यंत जाता येईल अशा रस्त्यांचे नकाशे अशी बरीच माहिती एकाच वेबसाइटवर मिळू शकणार आहे. आज मिलिंद वेर्लेकरबरोबर वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रातील १२८ जणांची टीम अहोरात्र झटते आहे. त्यात अनेक संशोधक, इतिहासतज्ज्ञ, विविध भाषातज्ज्ञ, गिर्यारोहक, छायाचित्रकार, कलाकार, संगणकतज्ज्ञ समाविष्ट आहेत.
खरं तर हे सरकारच्या पुरातत्त्व विभागानं जतन करून ठेवावं इतकं मोलाचं काम आहे. पण सरकारकडे बहुदा निधी उपलब्ध नसणार. जे कितीही मनात आलं तरी होण्यासारखं नाही, त्यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे? मग मिलिंद वेर्लेकर या तरुणाला काय गरज पडली या नसत्या उठाठेवी करायची? तो काही शिवरायांचा वारसदार नक्कीच नसावा. आणि ही माहिती संपूर्ण जगाला उपलब्ध करून देण्यासाठी त्याला या वेबसाइटचा व्यावसायिक वापरही करायचा नाही. कारण तो बनवत असलेल्या www.rajashivaji.com या वेबसाइटवर चक्क असं नमूद केलंय की एकदा का ही वेबसाइट तयार झाली, सर्व संग्रह जमा झाला की सामान्यातला सामान्य माणूस यातला कुठलाही फोटो, कुठलीही माहिती अगदी हक्कांने, फुकट मिळवू शकतो.
या मुलखातला प्रत्येक नागरिक हा शिवाजी महाराजांचा वारस आहे आणि त्याला त्यांच्याबद्दल प्रेम, आत्मियता वाटणं साहजिक आहे. अभिमानास्पद आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती मिळवणं हा त्याचा अधिकार आहे आणि तीही विनामूल्य!!!
श्रीमती कविथा कल्याण या अमराठी भाषिक अभ्यासू बाईंनी विचारल्याप्रमाणे इथे किती मराठी माणसं किंवा किती राजकारणी लोक शिवाजी महाराजांना देव मानतात ते सांगता येणार नाही. पण एखादा निस्सीम भक्त आपल्या देवाचं जसं देऊळ बांधतो तसा हा शिवरायभक्त मिलिंद वेर्लेकर जो संग्रह जतन करून ठेवतोय तो कुठल्याही देवालयाइतकाच पवित्र आणि सद्हेतूपूर्ण आहे हे नक्की!
आता गरज आहे ती त्याला हातभार लावायची. उत्सुकतेपोटी का होईना, सरकारी फाईलीतून किंवा आपल्या नेहमीच्या रामरगाडय़ातून मान वर करून www.rajashivaji.com च्या प्रगतीचा आलेख बघायलाच हवा.
Hatts off to मिलिंद वेर्लेकर आणि त्याचे सहकारी!
sanjaypethe@yahoo.com