Leading International Marathi News Daily
गुरुवार, १९ फेब्रुवारी २००९
  नव्या युगाचा नवा गुरू : टॉपर
  ओपन फोरम : नोंदणी विवाह की वैदिक?
  थर्ड आय : देवालयाइतकच पवित्र : राजा शिवाजी डॉट कॉम
  कट्टा : कुटुंबव्यवस्थेतील बदल
  दवंडी : राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ एकता..
  लँग्वेज कॉर्नर
  यंगअचिव्हर : आवाज एक अंदाज अनेक
  क्रेझीकॉर्नर : आमच्याकडंही तेच असतं..
  इव्हेंट कॉर्नर
  अवती भवती

माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..
असं म्हणतात की, माणसाची प्रगती व्हावी.. पण लोकांच्या नजरेत भरेल एवढय़ा वेगाने होऊ नये. कारण मग शत्रू वाढतात आणि दुसरं असं की, आपली चौकट मोडून बाहेर पडण्याची महत्त्वाकांक्षा बऱ्याच वेळा मार्गातला काटा बनते. उदाहरणार्थ असं बघा.. एखादा चांगला कलाकार असतो.. तो अचानक निर्माता बनतो.. बनू पाहतो.. मग तो चांगला कलाकार असूनही त्याला तशी कामं मिळणं बंद होतं.. एखादा कलाकार निर्माता दिग्दर्शकही बनतो.. मग त्याला दुसऱ्याचे सिनेमे दिग्दर्शित करायला क्वचितच बोलावलं जातं.. मराठीतली उदाहरणं सांगतोय. आजूबाजूला नजर फिरवलीत तर अशी उदाहरणं सापडतील.. बालाजी टेलिफिल्म्सच्या सिरीयलचं साम्राज्य आता आतापर्यंत सगळीकडे पसरलं होतं. एकता कपूर ही अनभिषिक्त सम्राज्ञी होती छोटय़ा पडद्याची.. मग अचानक असं काय झालं की, तिच्या सगळ्या सीरियल्सना अचानक ओहोटी लागली? कथा इंटरेस्टिंग आहे.
जितेंद्रची मुलगी एकता ही तिची ओळख होती.. ‘इतिहास’ आणि कुठली तरी फ्लॉप मालिका तिच्या नावावर होती. मुलगी काहीतरी

 

करू पाहतेय.. करू दे, असं म्हणून जितेंद्रने तिला मोकळी सोडली आणि मग एक दिवस ‘हम पाँच’ नावाचा एक जॅकपॉट तिच्या हाताला लागला. पाच-एक वर्ष ही मालिका चालली.. तिथून मग धडाका सुरू झाला. साम्राज्याची एक एक वीट रचली जात होती. ‘क्यों की साँस भी कभी बहू थी..’ या मालिकेने स्टारला तिसऱ्या नंबरवरून एकदम पहिल्या नंबरवर उडी मारू दिली. मग काय एकता म्हणेल तसं.. ती म्हणेल ते. बाकीच्या निर्मात्यांना चॅनेलच्या भिंतीवर अनेक धडका द्याव्या लागत असताना एकताकडे चॅनेलवाले जात होते. तिच्या ऑफिसात बैठका व्हायच्या. करार तिथे साईन व्हायचे आणि यशही तिला मिळत होतं. तिला सर्वसत्ताधीश करणारी खेळी स्टारच खेळले.
कोणे एके काळी, २००४ साली स्टारचे मालक रुपर्ट मडरेक भारतात आले तेव्हा एका समारंभात स्टारच्या एक्झिक्युटिव्हनी एकता कपूरची ओळख त्यांच्याशी हिच्याच सीरियल जवळपास आपलं चॅनेल चालवितात, अशी करून दिली. मडरेक तेव्हा काहीच बोलले नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांनी तिला लंचला बोलावलं आणि तिच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. बालाजी एंटरटेनमेंटमध्ये पार्टनरशिपचा. २५.९९ टक्के पार्टनरशिप. एकताने ते स्वीकारले. मडरेक काकांचा पैसा मिळाला आणि मग ती उधळलीच. आपलीच पार्टनर म्हटल्यावर स्टारवर एकामागोमाग एक तिच्या मालिका येणे हे स्वाभाविकच होते. ती कष्टही करत होती. ते कुणीच नाकारू शकणार नाही.. पण भस्मासुराला वर देऊन झाला होता. मडरेक काकांनी चाल तर अप्रतिम केली होती. स्टारवर केलेल्या मालिकांबद्दल तिला जे पैसे मिळत होते त्यातून त्यांचा वाटा त्यांना मिळत होताच पण इतर चॅनेलवर एकता ज्या मालिका करत होती.. त्या पैशातही पार्टनरशिप मिळत होती.. बीस उंगलीया घी में अशी परिस्थिती.
मग झालं काय? अचानक स्टार एकतावर रुसले का? टीआरपी रेटिंग येत नाही वगैरे मुलामा आहे. तो त्या आधीही पडे.. मग पुन्हा वर येई.. तेव्हा हे तकलादू कारण आहे. ‘क्यों की..’ बंद झाली.. ‘कहानी..’ बंद झाली.. का बरं? मी वर म्हटलं ते कारण आहे. तुम्ही मोठे व्हा.. पण चौकट सोडून बाहेर येऊ नका. एकताने स्वत:चे चॅनेल काढायची घोषणा केली, त्याने सगळे गाडे बिघडले आहे. भस्मासुर जर शंकराच्याच डोक्यावर हात ठेवू पाहील तर त्याला मारावे लागेलच. त्यातूनही २००७ मध्ये एक वेगळा मार्ग काढायचा प्रयत्न झाला होता. एकतासोबत इतर भाषिक चॅनेल काढावी पण एकताला हिंदीवरच राज्य करायचं होतं. ते कसं जमणार? त्याची परिणती ही झाली आहे. तोपर्यंत एकता एवढी मोठी झाली होती की, आता तिच्या महत्त्वाकांक्षांना पंख फुटले होते.
आता स्टारने ‘कयामत’, ‘करम अपना अपना’ आणि ‘कस्तुरी’ या मालिका बंद केल्या आहेत. तर ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ आणि ‘किस देशमें है मेरा दिल’ या आणखी दोन बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
ज्या बालाजी फिल्म्सची २००७-०८ ची मिळकत ३२८.९७ कोटी होती आणि निव्वळ फायदा ८१.२६ कोटी होता त्याची २००८-०९ च्या पहिल्या सहामाहीत मिळकत १९४.९३ कोटी आणि निव्वळ फायदा ४०.३८ कोटी झालाय.
दुसऱ्या चॅनेलवरील तिच्या शोजनाही उतरती कळा लागली. गाजावाजा करीत केलेले महाभारत कधी कोणी पाहिलेच नाही.
स्टारने त्यांचा हिस्सा विकायला काढला आहे. त्यांनी एकतालाच बाय बॅकची ऑफर दिली. ती तिने स्वीकारणे शक्यच नव्हते. आता परिस्थिती अशी आहे की, कोणीही बालाजीचा पार्टनर बनायला तयार नाही. बुडणाऱ्या जहाजावर कोण चढेल?
कोणे एके काळी सहाशे रुपयांवर गेलेला बालाजीचा शेअर आज ३०-३२ रुपयांच्या आसपास घोटाळतो आहे. दोन हत्तींच्या टकरीत कोल्ह्या-कुत्र्यांनी पडूच नये हा धडा त्यातून घ्यायचा. वपुंचं एक सुंदर वाक्य आहे. आयुष्य केवळ ज्योतीलाच असतं, असं नाही.. आयुष्य झंझावातालाही असतं.. तोही कधी तरी संपणार असतो. नो बडी इज इन्डिस्पेन्सिबल. सिमेट्री इज फुल ऑफ सच पीपल हू थॉट देमसेल्वज इन्डिस्पेन्सिबल.. आमेन!
asparanjape1@gmail.com